आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न: जगातील अदृश्य शक्तीचे वाईट परिणाम होऊ नयेत म्हणून कोणती काळजी घ्यावी?


उत्तर: प. पू. महाराजांनी खुलासा केला की, जशी दृश्यमान सृष्टी अस्तित्वात आहे तशीच अदृश्यमान सृष्टीही अस्तित्वात आहे. सामान्य माणसांना डोळ्यांनी हे दिसत नाही म्हणून त्याचे नावही अदृश्यमान सृष्टी ठेवण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी आपल्या एक क्षत्रिय भक्ताच्या मुलाचे लग्न झाले. लग्नाचा कार्यक्रम रात्री अकरा वाजेपर्यंत चालला. नंतर रात्री बारा वाजता घरातील देवांच्या फोटोला व मूर्तीला पाया पडण्याचा कार्यक्रम सुरु झाला. त्यावेळी एक फोटोग्राफर तेथे हजर होता. नवरा व नवरी दोघेही ओणवे होऊन देवाच्या पाया पडताना फोटो काढला गेला. दुसऱ्या देवांच्या फोटोपुढे पाय पडताना दोन मिनिटांच्या अंतराने पुन्हा फोटो काढला. त्यातील एक फोटो बिघडल्यासारखा वाटला. तरीही त्यांनी ते सर्व फोटो मला दाखविले. त्यांच्या दृष्टीने जो फोटो बिघडला होता तो मी हातात घेतला. त्या फोटोमध्ये एक पांढरी आकृती दिसत होती. मी त्यांना विचारले की ह्या बाजूला कोण उभे होते? व ही कोणाची सावली आहे? त्यांनी सांगितले की, ह्या कार्यक्रमाच्या वेळी तेथे फक्त नवरा-नवरी व फोटोग्राफरच उपस्थित होते. दुसरे म्हणजे त्या बाजूला टेबल होते. इतर कोणतीही व्यक्ती तेथे नव्हती. शिवाय जर तेथे कोणी उभे असते तर फोटोग्राफरने त्या व्यक्तीला बाजूला जायला सांगितले असते व नंतर फोटो काढला असता. परंतु तसे काहीच घडले नाही. तेथे कोणीही नव्हते. फोटोग्राफरने नेहमीप्रमाणे फोटो काढले. परंतु हा फोटो बिघडला म्हणून आम्ही बाजूला काढून ठेवला. मी खुलासा केला की, हा फोटो बिघडलेला नाही. फोटो बरोबर व योग्य आहे. ही जी पांढरी आकृती दिसत आहे तो पिशाच्चाचा फोटो आहे. नवरा-नवरी ओणवी झाल्यानंतर ते पण ओणवे होऊन दोघे काय करतात हे पाहात असताना फोटोग्राफरने फोटो घेतला त्यात त्यांचा पण फोटो आलेला आहे.
आम्ही तुम्हाला ह्या अगोदर अनेक वेळा सांगितले आहे की, शुभ अशुभ दिवस मानावयाचे असतात. परंतु तुम्ही हे पाळीत नाही म्हणून असे घडते. शास्राचे नियम किती विचारपूर्वक व अचूक आहेत हे ह्या घटनेवरून लक्षात येते. तुम्ही क्षत्रिय आहात. तुमच्या कुटुंबामध्ये कुलधर्म व कुलाचार पाळण्याची पद्धत आहे. तो तुम्ही पाळता कां? कुलदैवताच्या पाय पडायला गेल्यानंतर तुमच्या पद्धतीप्रमाणे बळी देता कां? त्यांनी सांगितले की, पूर्वी घराण्यांत अडाणी लोक फार होते. ते देवाला बळी देत होते. परंतु, जेव्हापासून आमच्या घरात शिक्षण वाढले तेव्हापासून ही जुनी रूढी बंद केली. पाच-दहा वर्षातून एकदा तेथे फक्त पाय पडायला जातो. फार पूर्वीपासून ह्या जगामध्ये सुष्ट व दुष्ट शक्तीचे अस्तित्व मान्य केलेले आहे. राम-रावणांच्या युद्धाच्या वेळेस देखील ह्या गोष्टी मानल्या होत्या. युद्ध शिगेला पोहोचले होते व दररोज रावणाचे मोठमोठे दैत्य मारले जात होते. तेव्हा रावण पुत्राने हमखास जय मिळविण्यासाठी गुप्तपणे एका गुहेत एक मोठा यज्ञ चालू केला. हा यज्ञ पूर्ण होऊ नये म्हणून बिभीषण व लक्ष्मण काळजीत होते, लंकेतील ती जागा बिभीषणनाने दाखविली व लक्ष्मणाने तो यज्ञ उध्वस्त केला. यज्ञामध्ये पाणी टाकून अग्नि विझवून टाकला. म्हणून त्या दुष्ट शक्तीची देवता प्रकट होऊ शकली नाही. आम्ही अनेक वेळा सूचना करतो की, अवेळी जेवण करू नका. अयोग्य जागी किंवा बाहेर उभे राहून खाऊ नका. परंतु तुम्ही ऐकले नाही. वेळ सांभाळायला पाहिजे. ह्या फोटोमध्ये भिंतीवर माझा फोटो लावलेला दिसतो. तेथे माझा फोटो होता म्हणून तुम्ही वाचलात. फोटोमुळे ते पिशाच्च स्थिरावले नाही. ताबडतोब पळाले. वेळ रात्री १२ ची होती. रात्री १२ च्या वेळेला काळरात्र म्हटली जाते. आजकाल ह्या गोष्टी कोणाला समजत नाहीत. पिशाच्च हे वायुरूप असतात. त्यांना आवाज व वाणी नसते. फोटोमधील पिशाच्च हि आकारावरून स्त्री असावी असे वाटते. स्वतःचे केस दिसू नयेत म्हणून डोक्यावरून पदर घेतलेला दिसतो. जिवंतपणी त्या मुलीवर तिचा जीव जडला असेल. मुलीबरोबर ते पिशाच्च माहेरून आले असेल. कोणावरही केव्हाही अतिप्रेम करू नका. नाहीतर मनुष्य त्यापासून लवकर मुक्त होऊ शकत नाही.
पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे काही कुलदैवतांना मांसाचा नैवेद्य चालतो म्हणून तेथे कोंबडी, बकरे किंवा बोकड कापले जात. ते हेच खातात. देव जरी खात नसले तरी देवांचे हे गण फस्त करून टाकतात. फोटोतील ती पांढरी आकृती पिशाच्चाची आहे हे ऐकल्याबरोबर ती मुलगी व तिची आई फार घाबरली. आता कसे होणार? मी सांगितले, तुम्ही काळजी करू नका. ते तुम्हाला त्रास देणार नाही. स्रिया फक्त बोलायला शूर असतात. परंतु तशा त्या फार भित्र्या असतात. ह्या गोष्टीला मनुष्य तोंड देऊ शकत नाही. तसे म्हटले तर दोन पायाच्या मनुष्यामध्ये शक्ती किती? घरातील प्रत्येक खोलीत लाईटची व्यवस्था ठेवा. बाहेर जाताना घरात व घराबाहेर लाईट ठेवा. झिरो बल्ब का असेना परंतु प्रकाश असू द्या. बाहेरून घरात येतांना अंधारात प्रवेश करायला लागू नये म्हणून ही काळजी घ्या. सकाळ संध्याकाळ घरात सुगंधी उदबत्ती लावा. सुगंधाचे व ह्या अदृश्य शक्तीचे फार वाकडे असते. त्यामुळे हे घरात प्रवेश करीत नाहीत. घरात तुपाचा दिवा लावा त्यामुळे घरातील घाण हवा व प्रदूषण नाहीसे होते. जेथे ज्योत आहे, प्रकाश आहे, तेज आहे, तेथे ह्या गोष्टी प्रवेश करीत नाहीत. जर घरामध्ये अस्वच्छता असेल, खराब वातावरण असेल, अंधार असेल तर ह्या गोष्टी केव्हा घरात प्रवेश करतील सांगता येत नाही. घरामध्ये वातावरण पवित्र ठेवीत जा. म्हणून आम्ही तुम्हाला ज्या सूचना देतो त्याप्रमाणे वागा व जीवन आनंदात जागा. (खंड ११, पान नं. ६२-६३)


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy