|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||


आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न: हर्षल ग्रहाचा मानवी जीवनावर काही परिणाम होतो का?


उत्तर: प. पू. महाराजांनी खुलासा केला की, कुंडली पाहताना हर्षल ग्रह कोणत्या घरात आहे हे पाहाणे फार महत्वाचे आहे. ज्या ग्रहांचा आपल्याला त्रास होतो त्याला पापग्रह म्हणण्याची पद्धत आहे. काही विशिष्ट घरात हा ग्रह असला तर व्यक्ती जीवनात सुखी होऊ शकत नाही. एक भक्त तरुण असताना त्यांच्या आई – वडिलांची फार इच्छा होती की, मुलाचे लग्न लवकर व्हावे. ही इच्छा असणे स्वाभाविक आहे ह्यात काही गैर नाही. परंतु अनेक प्रयत्न केले तरी मुलाचे लग्न काही होईना. कोणत्याही परिस्थितीत मुलाचे लग्न जमेना. मुलाचे वय वाढतच होते. शेवटी आई – वडिलांनी मुलाची कुंडली मला दाखविली. मी कुंडली तपासली असताना असे लक्षात आले की, मुलाच्या लग्न घरातच हर्षल ग्रह आहे. मी ताबडतोब सांगितले की, ह्या मुलाचा स्वभाव वैतागल्यासारखा राहणार आहे. दुसरे म्हणजे ह्याचे घरातील कोणाशी पटणार नाही. घरात सारखी भांडणे होतील. ह्या मुलाचे लग्न होणार नाही आणि जर बळजबरीने ह्याचे लग्न केले तर त्याच्या विचित्र स्वभावामुळे बायकोचे व ह्याचे जमणार नाही. आता तुम्ही ह्याच्या लग्नाच्या नाद सोडा. त्यांनी माझे ऐकले नाही. दुसरे म्हणजे मी त्या मुलाला सांगितले की, तुझ्या विचित्र स्वभावामुळे तुला बाहेर काडी इतकी किंमत मिळणार नाही. परंतु जर माझी सेवा करीत राहशील तर तुला कोणी त्रास देणार नाही व तुझे व्यवस्थित चालेल. त्या भक्ताने ऐकले. तो रोज सेवा करतो. आता त्याला कसलाच त्रास नाही. दुसरा एक भक्त आहे. त्याचे वडील सरकारी अधिकारी होते. आईचे समाजात मोठे नाव आहे. मुलगा दिसायला चांगला आहे. सरकारी संस्थेमध्ये कायमची नोकरी आहे. महिना तीन – साडेतीन हजार पगार आहे. परंतु त्याचे लग्नच होत नाही. वडिलांनी त्याच्या मुलाची पत्रिका दाखविली व विचारले की, मुलासाठी चांगल्या मुली सांगून येत नाहीत. बुटक्या, रंगाने काळ्या किवा स्थूल अशाच मुली येतात. मुलगा ह्यातून कोणालाही पसंत करीत नाही. अनेक प्रयत्न करून पाहिले परंतु मुलाचे लग्न काही जमत नाही. असे करता करता मुलाचे वय आता बेचाळीस झाले. काय करावे? मी त्या मुलाची कुंडली तपासली तेव्हा लक्षात आले की, त्याच्या सप्तमात हर्षल आहे. मी खुलासा केला की, हा ग्रह कधीच सुख देणार नाही. चांगल्या मुली सांगून येणारच नाहीत आणि इतकेही करून जर सक्तीने लग्न केले तर त्याचे वैवाहिक जीवन सुखी होणार नाही. सारखे खटके उडतील. तेव्हा आता तुम्ही त्याच्या लग्नाचा नाद सोडा.
बाहेरगावची एक मुलगी आहे. ती दिसायला सुंदर आहे, सडपातळ आहे, बुद्धिमान आहे. चांगल्या पगाराची सरकारी नोकरी आहे. ती हुशार असल्यामुळे सरकारतर्फे व बाहेर परदेशातही तिचा सन्मान झालेला आहे. ह्या मुलीचे लग्नच होत नाही. तिने सांगितले की, तिने अनेक मोठमोठ्या ज्योतिषांना पत्रिका दाखविली. त्यांनी प्रत्येक वेळेला सांगितले की, काही काळ अमुक ग्रह खराब आहेत ते बदलले की लग्न होणार. तुम्ही प्रयत्न करीत रहा. शेवटी कंटाळून ती कुंडली घेऊन माझ्याकडे आली. मी तपासली. तेव्हा लक्षात आले की तिच्या सप्तमातच हर्षल आहे. मी तिला स्पष्ट सांगितले की, तुमचे लग्नच होणार नाही. बाहेर ज्योतिषांना हे बारकावे माहिती नसतात. ते कधीही गिऱ्हाईकाला स्पष्ट कल्पना देत नाही. अमुक ग्रह बदलेपर्यंत वर्ष दोन वर्ष काढा असा खोटा आशावाद दाखवून प्रत्येक वेळेला स्वतःची फी मात्र घेत राहातात, तिला माझे म्हणणे पटले. शेवटी तिने विचारले की, उर्वरीत जीवन कसे जगावे? मी खुलासा केला की, आता माझ्याकडे पाहून गुरुसेवेत व देवांच्या सेवेत दिवस काढावेत. पस्तिस वर्षाचा एक इंजिनिअर माझ्याकडे आला व त्याने समस्या मांडली की, तो एका मोठ्या फॅक्टरीत नोकरीला आहे. पगारही चांगला आहे. दोन लग्ने केलीत. दोन्ही वेळेला पत्नीशी पटले नाही. दोन्ही सोडून गेल्या. अजून त्याचे वय झालेले नाही. परंतु असे का होते हे काही लक्षात येत नाही. मी त्याची कुंडली तपासली तेव्हा लक्षात आले की, ह्यालाही हर्षल ग्रहाचा त्रास आहे. मी त्याला स्पष्ट कल्पना दिली की, ह्या ग्रहाच्या त्रासामुळे तुम्हाला वैवाहिक सुख मिळणार नाही. आता लग्न होणे शक्य नाही. ह्याला उपाय एकच आहे की, रोज दर्शनाला येत जा व देव सेवा करीत राहावे. देवाला केव्हा दया येईल ते सांगता येत नाही. जर त्यांना दया आली तर ते केव्हा काय देऊन जातील हे सांगता येत नाही. चिकाटी मात्र पाहिजे.
नगरच्या एका भक्ताला पत्रिका पाहून खुलासा केला होता की, तुझ्या कुंडलीत साप्तमांत हर्षल आहे. लग्न करू नकोस आणि लग्न केले तर तू सुखी होणार नाहीस. त्याने माझे ऐकले नाही. आई-वडिलांच्या दबावाखाली त्याने लग्न केले. आता रोज त्याचे व त्याच्या बायकोचे भांडण होतात. शिवाय बायकोचे व आईचे पटत नाही. तो निराश होऊन माझ्याकडे आला व विचारले की, आता काय करावे? मी त्याला मागची आठवण करून दिली की, तुला लग्न न करण्याचा मी सल्ला दिला होता. परंतु त्यावेळी तू ऐकले नाहीस. आता तुला त्रास भोगल्याशिवाय पर्याय नाही. नामस्मरण करीत जा म्हणजे त्रासाची तीव्रता कमी होईल, ह्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही. बाहेरगावच्या एक सुशिक्षित गृहस्थाने त्याच्या मुलाचे लग्न करायचे नक्की केले. घरातल्या सगळ्यांना मुलगी पसंत पडली. फक्त माझी संमती घ्यायची बाकी होती. मुलीची पत्रिका दाखविली व मला विचारले, मी कुंडली तपासली तेव्हा लक्षात आले की, मुलीच्या लग्न घरातच हर्षल आहे. मी स्पष्ट शब्दात सांगितले की, ह्या मुलीशी लग्न नक्की करू नका. मुलाचे जीवन सुखी होणार नाही. त्यांनी खुलासा केला की, मुलगी शकलेली आहे, बुद्धिमान आहे, दिसायला सुस्वरूप आहे. सध्या मुलगा मोठ्या फॅक्टरीत नोकरीला आहे. शिवाय मुलगीही लग्नानंतर नोकरी करणार आहे, बाहेरगावी राहायला तयार आहे. मी त्यांना खुलासा केल की, आमच्या शास्रापुढे सौंदर्यवान व देखणेपणा वगैरे शब्द लक्षात घेतले जात नाहीत. फक्त सत्य काय आहे तेवढेच स्पष्ट व परखड भाषेत सांगणे आमचे काम आहे. एवढे ऐकूनही जर तुम्ही त्या मुलीशी लग्न केले तर आज त्रास झाला नाही तर पुढील एक-दोन वर्षात त्रास होईल. कुंडलीतले ग्रह स्वतःचे गुणधर्म दाखविल्याशिवाय राहाणार नाहीत.
नेहमी दर्शनाल येणाऱ्या एका मुलीने पत्रिका न दाखविता भावनावश होऊन एका सरकारी नोकरी करणाऱ्या मुलाशी लग्न केले. पुढे वर्षभरात मुलीला त्रास होऊ लागला. नवरा वेड्यासारखा वागू लागला. नोकरीवर न जाता काही कारण नसताना महिना, पंधरा दिवस घरीच राहू लागला. ती मुलगी त्रासली व शेवटी तिच्या नव-याची पत्रिका घेऊन माझ्याकडे आली. मी जेव्हा पत्रिका तपासली तेव्हा लक्षात आले की, मुलाला हर्षलचा त्रास आहे. मी त्या मुलीला मार्गदर्शन करताना सांगितले की, गुजरातमध्ये पोरबंदर जवळ हर्षल देवीचे मंदिर आहे. जर जमले तर तुम्ही दोघ जाऊन दर्शन घेऊन या व तेथे काहीतरी सेवा करा. तेथे गेल्यानंतर कमीतकमी एक श्रीफळ व सव्वा रुपया दक्षिणा ठेवा व देवीला विनंती करा की, त्रास कमी झाला तर अमुक अमुक सेवा करीन, असे कबूल करा. तेथे जाऊन दर्शन घेऊन आल्यानंतर मुलाचा वेडसरपणा कमी झाला व तीन दिवसांनी स्वतःहून शहाण्यासारखा नोकरीवर रुजू झाला. ज्या ज्या लोकांना हर्षल ग्रहाचा त्रास आहे ह्या सर्व लोकांना मी सल्ला देतो की, एकदा तेथे जाऊन या. तेथे काहीतरी अर्पण करा. देवीला संतुष्ट करा, चांगला परिणाम नक्की होईल. हे जगदंबेचे एक रूप आहे. कार्य कारणास्तव तिने निरनिराळ्या ठिकाणी व निरनिराळ्या काळामध्ये अनेक रूपे घेतलेली आहेत. त्यापैकीच हर्षला देवीचे एक रूप आहे. त्या रुपात तेथे जाऊन तिला संतुष्ट करावे लागते. परंतु आजकालच्या सुशिक्षित व शिकलेल्या पिढीला हे पटत नाही. तेथे जायचा कंटाळा करतात व विनाकारण त्रास सहन करीत बसतात. (खंड ११, पान नं. ६७-६९)


।। श्री गुरुदेव दत्त ।।