आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न: यज्ञ करताना वातावरण शुद्ध कसे होते?


उत्तर: प. पू. महाराजांनी खुलासा केला की, यज्ञात आहुती टाकताना मंत्रोच्चार केला जातो. मंत्रोच्चारामुळे वातावरण पवित्र होते. अग्नीमध्ये अपवित्र वस्तू अापोआप जळतात. वातावरणातील दूषित वायू अग्नी भक्षण करतो. म्हणून धूर निर्माण होतो. यज्ञकर्म चालू असताना आजूबाजूस असलेले खराब वायू नाश पावतात व त्यांची जागा ऑक्सिजन घेतो. ऑक्सिजन वायू प्रज्वलनास मदत करतात. या ऑक्सिजन वायुमुळे मनुष्याला उत्साह वाटतो व वातावरण प्रसन्न बनते. आपले कोणतेही धार्मिक कार्यक्रम किंवा यज्ञक्रिया ह्याचे बरोबर विज्ञानाचा विचार केलेला आहे हे लक्षात येते. विज्ञान धर्मापेक्षा कमी नाही आणि आपणही विज्ञानाला कमी लेखत नाही. आपल्या पूर्वजांनी ज्या धार्मिक क्रिया निश्चित केल्या त्या आत्तापर्यंत करताना आपल्या मंत्र सामर्थ्यावर विश्वास ठेवला व श्रद्धेच्या जोरावर करीत आलो. विज्ञानाचा विचार आता सुशिक्षित लोक करू लागले. विज्ञानाच्या दृष्टीकोनातून विचार करताना यज्ञ कर्म व इतर धार्मिक कार्य कसे योग्य आहेत याचा कार्यकारण संबंध सिद्ध करता येतो. सुशिक्षित लोकांनी धर्मकार्य करताना विज्ञानाचा विचार सोबत करावयास पाहिजे. आपण विज्ञानाचे विरोधक नाहीत. जी वस्तू पूर्वीपासून अस्तित्वात होती परंतु अंधारात होती. धर्मावर विश्वास ठेवून लोक त्याप्रमाणे आचरण करीत होते व त्या लोकांना त्याचा अनुभवही येत होता. ती वस्तू प्रयोगानेही सिद्ध करता येते. त्याचा कार्यकारण भाव सिद्ध करून विज्ञानाने ती वस्तू उजेडात आणली. हा नवीन शोध नाही. अंधारात असलेली गोष्ट उजेडात आणली एवढेच होय. विज्ञान व धर्म एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
धर्म जाणणारी माणसे कुठल्याही ध्वनिमुद्रित टेपचे मंत्रोच्चार मान्य करीत नाहीत. मंत्रोच्चार योग्य त्या व्यक्तीचे मुखातूनच व्हायला पाहिजे म्हणून आग्रह धरतात. हे बरोबर आहे. जर योग्य व्यक्तीच्या मुखातून रुद्राचा, वेदवाणीचा उच्चार होत असेल तर त्यासोबत त्या व्यक्तीची तळमळ व अध्यात्मिक शक्तीच्या जोरावर, योग्य मंत्रोच्चारामुळे भगवान शंकराची आकृती निर्माण होते. अशा वेळी यज्ञात आहुती अर्पण केल्या, तर योग्य परिणाम होतो. गणपतीचे मंत्र उच्चारताच गणपतीचे स्वरूप समोर आले पाहिजे व त्यांना अर्पण म्हणून यज्ञात आहुती टाकल्या पाहिजेत. मंत्र उच्चारण्याच्या प्रभावाने अंकित होऊन वस्तू यज्ञकुंडात पडल्यानंतर शक्ती निर्माण व्हायला पाहिजे व अशी शक्ती निर्माण होते हे अनुभवाने सिद्ध झालेले आहे.
जर फक्त यज्ञकुंड बांधून त्यात लाकडे आहुती म्हणून अर्पण केली व मंत्रोच्चार केला नाही तर काहीही शक्ती निर्माण होणार नाही व कसलाच चांगला परिणाम दिसणार नाही. त्याला फक्त शेकोटीच म्हटली जाईल. वातावरण निर्मीती मंत्राशिवाय निर्माण होत नाही. ह्याला शास्त्रीय आधार आहे. सत्य हे नेहमी सत्यच रहाते. अध्यात्मात ध्वनीला फार महत्व दिलेले आहे. ह्यामुळेच योग्य मुखातून मंत्रोच्चार झाल्यानंतर शक्ती निर्माण होते.
जर आचार चांगले असतील तर विचार चांगले होतील व विचार चांगले असतील तर उच्चार चांगले होतील. हे सर्व एक दुस-यावर अवलंबून आहे. म्हणून प्रथम आचार सुधारणे आवश्यक आहे हे लक्षात घ्या. (खंड ३, प्रश्न २६)


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy