|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||


आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न: घरामध्ये साप, विंचू सारखे विषारी प्राणी निघाले तर मारावे का? ह्यांना मारल्याने पाप लागते का?


उत्तर : प. पू. महाराजांनी खुलासा केला की, विषारी प्राण्यापेक्षा मनुष्य जगणे महत्वाचे आहे. तेव्हा काही वेळा धर्मतत्व बाजूला ठेवून व्यवहारी निर्णय घ्यावा लागतो.
विषारी प्राणी घरात आले असताना त्यावेळची परिस्थिती पाहून जर विषारी प्राणी चावणार असतील व त्रासदायक ठरणार असतील तर अशा वेळी त्यांना मारणेच योग्य होईल. अशावेळी पाप पुण्याचा विचार करावयाचा नाही. जर तो विषारी प्राणी घराबाहेर बाजूने किंवा बाहेरील मोकळ्या जागेत, रस्त्यात किंवा शेतात निघून जात असेल तर मुद्दाम त्याचा पाठलाग करू नये. अशावेळी सोडून देणे हे उत्तम होय.
विषारी प्राण्याची त्रास देणे ही प्रवृत्ती आहे. ते जेव्हा आपल्या घरात प्रवेश करतात तेव्हा आपण बेसावध राहू नये. मनुष्य अशा वेळी विचार करतो की चुकून आपल्या घरात आलेला असेल, जाऊद्या. सोडून द्या. परंतु प्राण्याची ही बुद्धी नसते. ते इतरांचा फायदा घेऊन आपल्याला सोडून देणार नाहीत. संशयाचा फायदा घेऊन फक्त कोणाला सोडावे? विषारी प्राणी मूळ प्रवृत्ती सोडत नाहीत. नांगी तरी वर करतील. वेळ पाहून दंशही करतील. अशावेळी त्यांना मारून आपण संकटमुक्त होणे महत्वाचे हे लक्षात ठेवावे. (खंड ३, प्रश्न १७)


।। श्री गुरुदेव दत्त ।।