प्रश्न: कोणत्याही क्षेत्रात व्यवसाय किंवा इतर उद्योग यशस्वी होण्यासाठी ईश्वराच्या
कृपेची आवश्यकता आहे का? आणि व्यवसायात राहून अध्यात्म कसे आचरता येईल?
उत्तर: परम पूज्य महाराजांनी खुलासा केला की, मनुष्याच्या शक्तीवर मर्यादा आहे. जेव्हा
त्याला त्याचे व्यवसायात घवघवीत यश मिळू लागते तेव्हा त्यांनी नक्की समजावे की, ईश्वराच्या
कृपेनेच यश मिळू लागले आहे. सामान्य मनुष्य नेमका येथेच चूक करतो. अशा वेळेला त्याला
स्वतःचे कर्तृत्व आठवू लागते.
मनुष्य स्वतः जास्त काही करू शकत नाही. जेव्हा तुम्ही देवांचे आभार मानून फल देवार्पण
करता तेव्हा दोष तुमचेकडे राहत नाही. ह्याचा अर्थ व्यवसायात राहून आपोआप तुमचेकडून
अध्यात्म आचरण घडते. आम्ही जसे कडक आचरण, सोवळे व दिवसभर अध्यात्म आचरतो तसे तुम्ही
करण्याची जरूर नाही. आम्ही अध्यात्म आचरतो ते कर्तव्य समजून आचरतो. देवांनी जसे
प्रत्येक वर्णाला कर्तव्य नेमून दिलेली आहेत त्याचा एक भाग म्हणून आम्ही अध्यात्म आचरतो.
तुम्ही वैश्य जातीचे आहात. तुम्हाला नेमून दिलेले कर्तव्य पैसे कमविणे व धनाढ्य बनणे.
मग तो कशाही तऱ्हेने मिळवा. व्यवसाय करा किंवा इतर नितीशास्त्राने मान्य असा उद्योग
करा. पैसे कमविणे हा दोष तुम्हाला लागत नाही. उलट जर तुम्ही तुमचे कर्तव्य बजावले नाही
तर दोष लागेल. मनुष्याला जेव्हा स्वत:चा, कर्तृत्वाचा अहंकार चढतो तो काही केल्या लवकर
जात नाही. अहंकार हा मनुष्याचा सर्वात मोठा दोष आहे. रामदास स्वामी स्वतः समर्थ असून
हातात झोळी घेऊन भिक्षा का मागत होते? अहंकार कमी करण्यास काही तरी कारण असावे लागते.
म्हणून झोळी घेऊन भिक्षा मागत होते. जर मोठ्या माणसांना देखील अहंकार कमी करण्यासाठी
इतके प्रयत्न करावे लागतात तर सामान्य माणसाची काय कथा?
कर्तृत्व व यश ईश्वराकडे सोपवा. केवळ ईश्वरकृपेमुळेच हे सर्व होऊ शकले, असा मनात भाव
ठेवला म्हणजे मनुष्य निरंकारी होऊ लागतो आणि जसजसे तुम्ही निरहंकारी होऊ लागता तसे
देव तुमचे बाबतीत अधिक काळजी घेतात. अहंकार हा मनुष्य स्वभावाचा फार मोठा दुर्गुण आहे.
परंतु मनुष्याला अहंकाराचा फार मोठा अभिमान असतो. मनुष्य प्रत्येक वेळी म्हणतो की,
मी असे केले, मी तसे केले, म्हणूनच मला यश मिळाले. वास्तविक देवांच्या कृपेमुळेच यश
मिळालेले असते हे तो सोयीस्कररीत्या विसरतो. अहंकाराचे एक वैशिष्टय आहे ते म्हणजे जसे
तुम्ही अहंकार काढायचा प्रयत्न केला की तो जास्त चिकटतो. यासाठीच संत किंवा सत्पुरुषांची
भेट होणे आवश्यक आहे. अहंकार कमी करण्यास सत्पुरुषांचा सहवास हेच उत्तम साधन आहे. जोपर्यंत
अहंकार घालवू सहकार नाही तोपर्यंत प्रगती सामान्यच राहील. मनुष्य कर्तृत्व केव्हा गाजवू
शकेल? केवळ ईश्वर कृपेमुळेच, ईश्वर आधारानेच.
निसर्ग व नियतीचा असा नियम आहे की, काही लोकांचा अहंकार जेव्हा ठराविक मर्यादेच्या
बाहेर जाऊ लागला की, तो आपोआप कमी केला जातो. जसे पाण्याची काही धरणे असतात. जेव्हा
पाणी जास्त प्रमाणात गोळा होते तेव्हा त्यांच्या प्रेशरने धरणाची दारे अपोआप उघडतात
व प्रेशर कमी झाल की धरणाची दारे अपोआप बंद होतात, तसा हा प्रकार आहे. देवाचीच ही योजना
आहे. जेव्हा मनुष्य मर्यादेपेक्षा वर गेला की तो आपोआप खाली आणला जातो व नेहमीच्या
पातळीवर आणून ठेवतात. काही लोक याला अवकृपा म्हणतात. परंतु ही अवकृपा नसून योग्य न्याय
आहे असे समजावे. ऐश्वर्य भोगावयासही पात्रता पाहिजे. काही लोकांना पैसे मिळतात, परंतु
ते उपभोग घेऊ शकत नाही. कोणी शरीराने अपंग, कोणाला मधुमेह किंवा आणखीन काही जर्जर रोग
होतात. त्रास व यातना सहन करीत राहतात. काही लोकांना अचानक पैसे मिळतात. ते वेडे बनतात.
कारण त्यांनी कधीही इतके पैसे, वैभव व ऐश्वर्य पाहिलेले नसते म्हणून त्यांच्यावर असा
परिणाम होतो. जेव्हा तुम्हाला ईश्वराचा, सत्पुरुषांचा आधार मिळतो तेव्हाच तुम्ही संपत्तीचा
उपभोग घेऊ शकता. सामान्य माणसांना अहंकार नेहमी चिकटलेला असतो. त्यांना क्षुद्र क्षुद्र
कारणांवरून अहंकार निर्माण होतो. कोणत्या किरकोळ कारणावरून अहंकार निर्माण होईल, भरवसा
देता येत नाही.
तुम्ही जेव्हा ईश्वर उपासना करता, गुरु सेवा करता तेव्हा नैसर्गिकरित्या अहंकार व इतर
दोष कमी होतात. तुम्ही पैसे व कीर्ती मिळवलीच पाहिजे. उलट जर पैसे व कीर्ती मिळवली
नाही तर दोष निर्माण होईल. तुम्ही पैसा हा मिळविलाच पाहिजे. तुम्ही धनाढ्य झालेच पाहिजे
हेच तुमचे प्रमुख कर्तव्य आहे. हीच भगवंताची कृपा आहे असे समजा. अहो पात्रतेप्रमाणे
मिळणे हे सामान्य लक्षण आहे, परंतु जेव्हा पात्रतेपेक्षा जास्त पैसे मिळतात तेव्हा
समजावे की, ही ईश्वरकृपाच आहे. पैशाने पैसा कमवून दानधर्म हा केलाच पाहिजे. ब्राह्मणाचे
कर्तव्य ज्ञान प्राप्त करणे व याचकवृत्ती बाळगणे. उद्या जर आम्ही झोळी घेऊन बाहेर पडलो
तर दु:ख वाटायचे कारण नाही. कारण आमची परंपरा आम्हाला तसेच सांगते. क्षत्रियाचे कर्तृत्व
म्हणजे त्याने पराक्रम गाजविलाच पाहिजे. जर तुम्ही धर्म सोडला नाही तर, ईश्वर कृपा
निश्चित होते. जसजसा दानधर्म जास्त कराल तसतसा तो तुम्हाला जास्त देईल. हे त्याचे लक्षण
आहे. जर तुम्ही दानधर्म करण्याचे थांबविले व स्वत:च्या मनाची समजूत करून घेतली की,
दानधर्म पुष्कळ झाला तर तो तुम्हाला देणार नाही. तसा तो फार हुशार आहे. जर तुम्ही रु.
१० दानधर्म केले तर तो तुम्हाला कितीतरी पटीने अधिक देतो. याची खात्री आपल्या पुष्कळ
भक्तांना आली आहे. (खंड ३.११)