आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न: एका कॉलेजमध्ये मी प्रोफेसर आहे. धर्म वगैरे मी पाळतो. आमचे प्रिन्सिपॉल फारच नशीबवान आहेत. परंतु पुष्कळ बाबतीत मी उणा आहे. कोणत्याही गोष्टीत त्यांनी हात घातला तर त्यांना यश मिळते. परंतु ते नास्तिक असून असे का घडते?


उत्तर: प. पू. महाराजांनी खुलासा केला की, तुम्हाला कॉलेजपर्यंतचे शिक्षण मिळाले, तुम्ही पदवीधर झालात. त्यामुळे तुम्हाला ही बिनत्रासाची प्रोफेसरची नोकरी मिळाली हे तुमचेवर देवांचे उपकार आहेत म्हणून मिळाली हे समजा. प्रत्येक गोष्टीत यशस्वी करण्याची ईश्वराची योजना नाही. आजकाल कॉलेजमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात, त्या प्रत्येकाला प्रोफेसरची नोकरी मिळत नाही. कोणी लहान लहान व्यवसाय काढतो, कोणी साध्या क्लार्कची नोकरी स्विकारतो, कोणी प्यून म्हणूनही गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये लागतो, कोणी बेकार राहतो. ह्या सर्वांपेक्षा देवांनी तुम्हाला कितीतरी चांगल्या स्थितीत ठेवले आहे.
शेवटी तुमचे दैव उणे आहे हे तुम्हाला मानावेच लागेल. तुम्ही स्वत:ला दुर्भाग्यशाली व कमनशीबवान का मानता? दुस-याचे सुख पाहून आपण दु:खी होऊ नये. दुसरे म्हणजे ज्याचे त्याचे नशीबाचा म्हणजे पूर्वसुकृताचा भाग आहेच ना. त्याप्रमाणे प्रत्येकाला ह्या जीवनामध्ये बरं वाईट फळ मिळणारच.
कोणीही ईश्वरावर टीका करू नये व ईश्वराविषयी शंका व्यक्त करू नये. सर्वसामान्य भक्तांची तक्रार असते की देव आमच्या इच्छा पूर्ण करीत नाही वगैरे. तुम्ही अशी टीका केल्यावरही तो तुमच्या जीवनात आवश्यक अशा गोष्टी कळत नकळत उपलब्ध करून देतोच हे तुमचे लक्षात येत नाही. तुमचा केवळ समज असतो की तुमचेवर देवतांची कृपा नाही. एवढेच की, ज्याचे त्याचे कर्माप्रमाणे कुणाचे पूर्व आयुष्य सुखी असते तर कुणाचे उत्तर आयुष्य सुखी असते.
काही लोक पूर्व आयुष्यात भरपूर सुखी असतात, भरपूर ऐश्वर्यात लोळत असतात परंतु उत्तर आयुष्यात दारिद्रयात खितपत पडतात. दोन वेळच्या जेवणाचा बंदोबस्त होऊ शकत नाही. पूर्व आयुष्यात दु:खी व उत्तर आयुष्यात सुखी असणे हे सर्वात चांगले. कारण पूर्व आयुष्यात वय लहान असते. शरीरात शक्ती असते. दु:ख सहन करण्याची ताकद असते. अशावेळी सर्व भोग भोगून पूर्ण करावेत व उत्तर आयुष्यात ज्यावेळी शरीर थकलेले असेल त्यावेळी सुख मिळावे हे खरे यशाचे गमक आहे.
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात उदयकाल निश्चित येतो. हा केव्हा येईल हे नक्की नाही व किती वेळ राहील ह्याचेही नियम नाहीत. हा काळ आपण जास्त वेळ टिकवावा लागतो. ह्याविषयी मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आपला एक भक्त चांगल्या सरकारी नोकरीत होता. त्याला ३ ते ४ हजार पगार होता. ऑफीसमध्ये काम विशेष नव्हते. केवळ १-२ तास काम करून बाहेर पडत असे. आयुष्यात भरपूर पैसा मिळत होता. मी त्याला त्याचवेळी सूचना केली की हा उदयकाल ठराविक वेळेचा असतो. ह्यावेळी जो पैसा मिळेल, तो इकडेतिकडे न उधळता व्यवस्थित नियोजन करा म्हणजे उत्तर आयुष्यात आयुष्य व्यवस्थित व आनंदाचे घालविता येईल. तो भक्त फार फॉर्ममध्ये होता. कोणाचेही ऐकण्याचे मन:स्थितीत नव्हता. मी सरकारी नोकरीत आहे. नशीब जोरात आहे. आपल्याला पैशाची काही कमी नाही. मी माझ्याकडून एकदा सावधगिरीचा इशारा दिला होता. पुन्हा पुन्हा सूचना देत नाही. तो जाणे व त्याचे नशीब जाणे. निवृत्तीच्या ४-६ वर्ष अगोदर त्या भक्ताचा अपघात झाला. २-३ महिने हॉस्पिटलमध्ये व एक दीड वर्षे घरी बसून काढली. हे संपते न संपते तो त्याला एक हृदय विकाराचा झटका येऊन गेला. मुलाला पुण्याला चांगली नोकरी होती. वडिलांचेवर आलेले संकट पाहून त्याला काय दुर्बुद्धी झाली की चांगल्या सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन तो घरी परत आला. ह्या गोष्टीला अडीच ते तीन वर्षे झाली. आता ते लोक त्याला कामावर घ्यायला तयार नाहीत. कारण त्या जागी इतरांची नेमणूक झाली. आज परिस्थिती अशी आहे की, सूनबाई नोकरी करते व घराचा निम्मा भाग भाड्याने दिला आहे. त्याचे भाडे येते त्यावर घरखर्च चाललेला आहे. घरात एक अविवाहित २८-३० वर्षांची मुलगी आहे व इतर ४ माणसे आहेत. आजकालच्या काळात रोजचा खर्च म्हणून रु.२५-३० मुश्किलीने पुरतात. तो फक्त आज तक्रार करतो की, मी कधीही कोणाचे वाईट केले नाही. देवांनी माझी अशी स्थिती का केली? देवांनी तुम्हाला भरपूर दिले. तुम्ही सांभाळले नाही. त्यात त्याचा दोष नाही. दुसरे म्हणजे जाणून बुजून कोणी कोणाचे वाईट करीत नसतो. काही गोष्टी सहज अशा काही घडून जातात, कळत नकळत कोणाचे न कोणाचे नुकसान झालेले असते किंवा अतिशय मने दुखावली गेलेली असतात हे त्यावेळी लक्षात येत नाही. मी कधीही कोणाचे वाईट केले नाही हे सर्टीफिकेट जोडण्याचे कारण नाही. देवांना सर्व कळत असते. ज्यावेळी तुम्ही जीवनाच्या अत्युच्च शिखरावर होता, त्याचवेळी तुम्हाला सूचना केली होती की, येणाऱ्या पैशाचे नियोजन व्यवस्थित करा म्हणून. त्यावेळेला तुम्ही सूचनांचा अव्हेर केला आणि आता देवाला दोष देण्यात काय अर्थ आहे? त्या गृहस्थाने साडेतीन चार हजार रुपये महिने कमविले व खर्चही केले त्या गृहस्थाला घरात कोणी पाहुणा आला असेल व त्याला चहा पाजावयाचा असेल तर सूनबाईची परवानगी घ्यावी लागते. इतकी वाईट परिस्थिती आलेली आहे. ज्यावेळेला आपल्या जीवनाचा उदयकाळ आलेला असतो किंवा ज्यावेळी आपले चांगले दिवस येतात तेव्हा नेहमी हे सर्व ईश्वर कृपेनेच घडते ही सर्व देवांची कृपा आहे म्हणून देवांचे आभार मानावे म्हणजे अशावेळी योग्य बुद्धी सुचून व्यवस्थित पावले पडतात. फालतू खर्च अपोआप टाळले जातात. आपण देवांसाठी व धर्मासाठी काही न काही खर्च करीत राहावे म्हणजे पुढील आयुष्यात चांगले दिवस येतील. (खंड ३.१५)


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy