|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||


आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न: धर्म कसा आचरावा?


उत्तर: प. पू. महाराजांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, धर्म हा मानवी जीवनासाठी उपयोगी कसा होईल हे पाहणे महत्वाचे आहे. धर्म आचरणाने मानवी जीवनात संकटे निर्माण होत नाहीत. त्रास होत नाही. प्रत्येक बाबतीत धर्मच कसा श्रेष्ठ ही बाजू प्रभावीपणे मांडणे महत्वाचे आहे. ज्यांना धर्माची मूळ तत्वे समजली नाहीत, परंतु धर्माबद्दल अर्धवट ज्ञान आहे. असे लोक धर्माबद्दल खूप बाऊ निर्माण करतात. धर्म आचरणासाठीं मधेमधे खूप अडथळे निर्माण करतात. हे लोक कर्मकांडात अडकून पडतात. म्हणून धर्म आचरताना विनाकारण शंका निर्माण करतात. कोणतेही काम करताना, घराबाहेर जाताना मांजर आडवी गेली किंवा कुत्रे उभे गेले की, यांना शंका येणार. यांच्यासाठी काय कुत्रा मांजराने स्वभक्ष शोधार्थ रस्त्यावर हिंडू नये काय? हे लोक कशाला शुभ मानतील व कशाला अशुभ मानतील ह्याचा पत्ता नाही. या विकृती सहसा जादूटोणा व मंत्र-तंत्र मार्गापासून निर्माण होतात. आपले मन ईश्वराविषयी परिपक्व असावे. नेहमी मनः शुद्ध ठेवावे. मनामध्ये विचारांचे काहूर नको. नेहमी देवाचे स्मरण ठेवावे. शुभस्य शीघ्रम हे महत्वाचे मानावे. नैसर्गिक नियमाने दोन कावळे एकत्र आले की, या अर्धवट ज्ञानी लोकांना शंका फार येतात. ज्यांनी हे पाहिले त्यांचे पती किंवा पत्नी या दोनपैकी कोणीतरी २ किंवा ३ दिवसांत जाणार, अशी त्यांना शंका येते व तीन दिवस घराच्या बाहेर पडणार नाहीत. तीन चार दिवसात दोघांपैकी कोणी गेले नाही तर दुसरीच शंका काढत बसतील व विनाकारण अयोग्य विचारांचे काहूर माजवतील.
पुष्कळ वेळेला पाल अंगावर पडते. उजव्या खांद्यावर पडली की, डाव्या खांद्यावर पडली, या विषयी अर्धवट ज्ञानी लोकांचा बराच काथ्याकुट होतो. भक्ष्य शोधार्थ पाल भिंतीवर भराभर चालते तशी छतावरही चालते, कारण निसर्गाने तिच्या पायाची रचनाच अशी केलेली आहे की, ती छतावर उलटी देखील चालू शकते. एखादेवेळी पाय निसटतो व पाल खाली पडते. हे अशुभ नाही. अंगावर पडणे हेही अशुभ नाही. ही निसर्गाची निर्मिती आहे. वाईट कशी असेल? ही मानवनिर्मिती नाही. अर्धवट ज्ञानी लोकांनी करून दिलेल्या चुकीच्या समजुतीमुळे विनाकारण मनाचे खच्चीकरण होते व मनात एक प्रकारचे भय निर्माण होते. यावर तोडगा म्हणून कुणीतरी बुद्धिमान व्यक्तिने गिरीबालाजीला सोन्याची/ चांदीची पाल निर्माण करून ठेवली आहे. ज्यांच्या अंगावर पाल पडली आहे, त्याने तेथे स्पर्श करावा, म्हणजे या बाबतीतले सर्व दोष नाहीसे होतात. त्यामागे अशी कल्पना केलेली आहे की, जेणेकरून मानवाने कच खाऊ नये. नेहमी स्वच्छ रहावे. यासाठी हे सर्व प्रयत्न केलेले आहेत. (खंड ३.४८)


।। श्री गुरुदेव दत्त ।।