आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न: परमार्थ आचरताना काय काळजी घ्यावी?


उत्तर: प. पू. महाराजांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, गुरु केल्याशिवाय परमार्थात प्रगती होत नाही. दीर्घकाळ चालण्यासाठी ज्यांनी सत्य विचारावरच परंपरा उभी केली असेल, व जे गुरु या सत्याचा पाठपुरावा करतात, अशाच व्यक्तींना गुरुस्थानी मानावे व त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आचरण ठेऊन स्वउद्धार करावा. ज्यांना या गोष्टी पटलेल्या आहेत, असे भक्त स्वत: लाभ घेतील. सत्पुरुषांचा सहवास घेतील. ज्यांना स्वत:च्या विचारांचे मलिनत्व घालवावयाचे असेल, असे भक्त जरूर आमचा उपदेश ऐकतील. त्यावर मनन, चिंतन करतील. दुसरी महत्वाची एक गोष्ट अशी की, परमार्थ करताना आपण एकटे आहोत हे लक्षात ठेवावे. कोणाची गरज नाही. याचा अर्थ बेपर्वाईही नाही. कोणासाठी अडून राहू नये असा अर्थ घ्यावयास हवा. इतर लोकांच्या प्रकारापासून दूर रहावे. हा येऊ दे, तो येऊ दे, याची मर्जी सांभाळा, त्याची मर्जी सांभाळा या गोष्टी परमार्थामध्ये नको. परमार्थ आपण स्वत: एकटेच करणार आहोत व हा प्रवास आपल्याला स्वत:ला एकट्यालाच करावयाचा आहे ही जाणीव झाली, म्हणजे मग मन एकाग्र होते. सर्वांनी एकत्र येण्याच्या भानगडीत पडू नये. फार तर त्यांनी आपल्या मागे यावे. सामान्य माणूस येथे चूक करतो व विनाकारण मनाचा मोठेपणा दाखविण्याचा प्रयत्न करतो. मनाची एकाग्रता प्राप्त करावयाची असेल, तर आपण एकटेच परमार्थ करणार आहोत. ही जाणीव सतत मनावर ठेवावी. परमार्थ करताना आपण स्वत: एकटे व ईश्वर हे दोघेच आहोत, ही भावना निर्माण झाली म्हणजे मन विचलित होत नाही.
जर रोज देवासाठी एक तास खर्च करण्याचे ठरविले असेल तर जेव्हा सामान्य व्यक्ती पूजेला बसली असताना फुलवात नसेल तर आरडाओरड करणे, फुलवात लवकर आणा, तसेच नैवेद्य आणला नसेल तर त्यासाठी धावपळ, गंध उगाळलेले नसेल, तर ते मागणे या सर्व वस्तूगोळा करताना पाऊण तास जातो व शेवटची १५ मिनिटे देवाची कशीबशी पूजा करतो. अशा रितीने देवाला आळवून पूजा केली तर मन एकाग्र होणार कसे? उपकरणे घासली नसली तर कटकट करणे, अशाने मन एकाग्र होत नाही. पूजेच्या वेळी कटकट नको, आरडाओरड, धावपळ नको. मन स्वस्थ व शांत पाहिजे. फालतू गोष्टीत वेळ वाया घालवू नका. स्वतंत्रपणे इतर काही करता आले नाही तरी देवाची सेवा जरूर करा. कोणासाठीही अडून राहू नका. वास्तविक, पूजा हा देवांच्या सेवेचा औपचारिक भाग आहे. जे औषध घेतात, त्यांच्यावरच परिणाम होतो व ते बरे होतात. औषध देणा-यावर परिणाम होत नाही. औषध घेणा-याने विचारपूर्वक औषध घेतले पाहिजे, हे महत्वाचे आहे. हे फक्त आपण आपल्यासाठीच आचरतो. ही भावना असावी. या गोष्टी शिकवून येत नाहीत तर या गोष्टी अगोदर व्यवस्थित समजून घ्याव्यात नंतर त्या आपोआप लक्षात येतात. आपण काय आचरतो, याचा बोभाटा किंवा प्रदर्शन नको किंवा अनेक लोकांना जाहीर करणे नको. कसली उपासना किती वेळ करतो केव्हा करतो, हे देखील इतरांना कळू देऊ नये. सामान्य मनुष्य सोळा सोमवारचा उपवास करीत असेल तर तो कितीतरी वेळा जाहीर करतो. आज हे खायचे नाही, ते खायचे नाही कारण उपवास आहे. संध्याकाळी जेवायला बसेपर्यंत तो लोकांना सांगत असतो की, माझा सोमवारचा उपवास आहे. जेवण झाल्यानंतर जर काही खायला दिले तर तोच पुन्हा आपल्याला आठवण करून देतो की, माझा सोमवारचा उपवास आहे. उपवास करताना विनाकारण जाहिरातबाजी नको. व्यवहार करीत असताना जमेल, त्यावेळेला देवाचे नामस्मरण करीत रहावे. शेवटी हेच उपयोगी पडणार आहे. (खंड ३.४९)


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy