|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||


आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न: शास्त्रामध्ये ज्या वृक्षांना पवित्र व देववृक्ष मानले आहेत, ते तोडावे कां?


उत्तर: प. पू. महाराजांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, पिंपळ, वड, अश्वत्थ, औदुंबर वगैरे काही वृक्ष पवित्र मानलेले आहेत. या वृक्षांवर देवांचा वास असतो. अशी कल्पना केलेली आहे. नगरमधील एका गृहस्थाने अश्वत्थ हा देववृक्ष तोडला. तो शिकलेला होता. काही होत नाही या घमेंडीखाली त्याने हे कृत्य केले. ६/८ महिन्यातच या गृहस्थाला वेड लागले. डॉक्टर, हकीम वगैरे सर्व इलाज झाले. शेवटी तंत्र-मंत्र करणाऱ्यांकडे धाव घेतली. मी त्याला खुलासा केला की या बाबतीत तंत्र-मंत्राचा काही उपयोग नाही. नंतर त्याचा तो मांत्रिक पळाला. ही शिक्षा नियतीने केलेली असते. ती कोणालाही माफ करता येत नाही. एक जन्म भोगून संपत असती तर बरं, परंतु येथे तसे होत नाही. ही शिक्षा जन्म-जन्मांतरे भोगावी लागते. पुढील येणा-या पिढीलाही याचा त्रास होतो. देववृक्षांची जागा बदली करावयाची असेल तर किंवा कायमसाठी काढून टाकायचे असेल तर ते लहान रोपटे असताना काढता येते. एकदा मूळ धरल्यानंतर काढता येत नाही. अश्वत्थ वृक्ष तोडता येत नाही. या गोष्टी पुष्कळ लोकांना माहिती नाहीत. पुष्कळ सुशिक्षित लोकांना याची माहिती आहे, परंतु ते या गोष्टींवर विश्वास ठेवीत नाहीत. जे परंपरेतील गुरु असतील, त्यांचा याबाबतीत सल्ला घ्यावा व त्यांचेच ऐकावे. इतरांचे ऐकू नये किंवा स्वतःचा शहाणपणा चालवू नये. विनाकारण त्रास होण्याची शक्यता जास्त असते. नियतीवर फक्त भगवंताची सत्ता चालते. आपण त्यांना सरळ शरण यावे. माफी मागावी व मनोभावे सेवा करीत रहावे. जेव्हा त्यांना दया येईल, तेव्हाच यातून सुटका होऊ शकेल. याशिवाय दुसरा पर्यायच नाही. (खंड ३.४६)


।। श्री गुरुदेव दत्त ।।