आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न: देवांनी सृष्टी निर्माण केली ती मनुष्याच्या कल्याणासाठी निर्माण केली, तर काही वृक्षांचा पाला कडू कां?


उत्तर: प. पू. महाराजांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, मनुष्य हा देवांची शेवटची सर्वोत्कृष्ट कृती आहे व या मनुष्याच्या कल्याणाकरीताच सृष्टी निर्माण केलेली आहे. देवाचे काम फक्त निर्मिती करण्याचे आहे. कोणाचा कसा उपयोग करून घ्यावयाचा हे मनुष्याने ठरवावयाचे आहे. यासाठी त्याला बुद्धी दिलेली आहे. या गोष्टी ठरवण्यासाठी बुद्धिमान माणसांची जरुरी असते. उदा. कण्हेरीच्या मुळ्या अत्यंत विषारी असतात. त्या जर थोड्या उगाळून त्याचे पाणी घेतले, तर तात्काळ मृत्यू येतो. निसर्गाचे एक तत्व आहे की, ज्यांच्या मुळ्या विषारी, त्या झाडांची फुले कधीही सुगंधी नसतात. कागदीफुले व ही फुलेसारखीच. कागदी फुले सुकत नाहीत परंतु ही फुले सुकतात. कोणता वृक्ष कशासाठी निर्माण झालेला आहे याचा सृष्टीचा नियम ठरलेला आहे. जमिनीतील सर्वच पाणी गोड किंवा चांगले नसते. एके ठिकाणी एका विहिरीच्या पाण्याचा उपसा इलेक्ट्रीक मोटरने चालू होता. एका भक्ताला फार तहान लागली होती. म्हणून त्याने अगोदर चव घेण्यासाठी गुळणा भरला. त्याने ते पाणी ताबडतोब फेकून दिले. कारण ते पाणी खराब होते. त्याने तोंड वेडेवाकडे केले. काही ठिकाणी जमिनीतून निघणारे पाणी हे खारट मचूळ किंवा इतर चवीचेही असते. जमिनीतून वर येणा-या पाण्यात कोणत्या प्रकारचे क्षार मिसळतात, यावर पाण्याची चव अवलंबून असते. कडुलिंबाची कडू पाने व कडू फुले का निर्माण केली? तर नैसर्गिकरीत्या हवा शुद्ध ठेवण्यासाठी याचे प्रयोजन केलेले आहे हे लक्षांत येते. जसे कडुलिंबाचा पाला औषध म्हणून प्रमाणात घेतला तर शरीराला उपयोगी असतो. तसेच लिंबोळी पासून निर्माण होणा-या कडू औषधानेही लवकर गुण येतो. कडुलिंबामुळे दूषित हवा स्वतःकडे शोषली जाते व जास्त प्रमाणात ऑक्सिजन वायू वातावरणात मुक्त केला जातो. म्हणून वातावरणात प्रसन्नता राहते व वाढते. (खंड. ३.४७)


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy