|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||


आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न: भगवान श्री दत्तात्रेयांचे फोटोत चार कुत्रे का दाखवले जातात?


उत्तर: प. पू. महाराजांनी खुलासा केला की, श्री दत्तात्रेय ही वैदिक देवता आहे. फोटोमध्ये जे नसेल ते त्यांना हवे असते. तुकाराम महाराजांनी अभंग रचले. त्यामध्ये एका अभंगात त्यांनी कवी कल्पनेने उल्लेख केलेला आहे की, भगवान श्री दत्तात्रेयांजवळ एक गाय व चार कुत्रे उभे आहेत. हे अभंग मराठी सोप्या भाषेत आहेत. त्यामुळे पुष्कळ लोक वाचतात. तसे चित्रकारही वाचतात. श्री दत्तात्रेयांचे चित्र काढताना चार कुत्रे व एक गाय काढल्याशिवाय चित्र पूर्ण होत नाही, असे त्यांना वाटते. काही लोकांची कल्पना आहे की, चार वेदांचे प्रतीक म्हणून चार कुत्रे दाखवले आहेत. ही कल्पना चुकीची आहे. कारण आपल्या शास्त्रात कुत्रा ही कनिष्ठ जात मानलेली आहे. जर देवांना वेदांचे प्रतीक दाखवायचे असते, तर पुस्तकाचे रूपाने दाखवले असते. कुत्र्यांसारख्या कनिष्ठ प्राण्यांच्या रूपाने दाखविले नसते. म्हणून सामान्य लोकांची कल्पना चुकीची आहे हे लक्षात येते. दुसरे म्हणजे काही लोकांची कल्पना आहे की, भगवंताने मनुष्य स्वरूपात वामन अवतार घेण्याअगोदर ४ अवतार घेतले. ते श्वान रूपाने फोटोत दाखविले आहेत. ही कल्पना पण चुकीची आहे. देवांना जर अवताराचे प्रतीक दाखवायचे असते, तर मासा, कासव असे स्वरूप दाखविले असते. कनिष्ठ कुत्र्यांचे स्वरूप का दाखवतील? वास्तविक पाहता भगवान श्री दत्तात्रेय ही वैदिक देवता आहे व त्यांनी दिगंबर अवस्थेमध्ये दर्शन दिले आहे. ज्यांनी चारही दिशा हेच वस्त्र मानलेले आहे व ज्यांना वस्त्राचीही आवश्यकता नाही त्यांना कुत्रा किंवा गायीची काय आवश्यकता? वास्तविक ज्यांना देवांचे दर्शन झालेले आहे, त्यांना त्यांचे सोबत काहीही नाही असेच दर्शन झालेले आहे. चित्रकारांनी श्री दत्तात्रेयांचे फोटोत गाय व कुत्रे दाखविलेलेच आहेत, तर आपण ह्याचा असा अर्थ घ्यावयाचा की, प्राणीमात्रात श्रेष्ठ गाईपासून कनिष्ठ कुत्र्यांपर्यंत देखील भगवान श्री दत्तात्रेय समान दृष्टीने पहात आहेत. (खंड ३.२९)


।। श्री गुरुदेव दत्त ।।