आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


"स्थितप्रज्ञ, परमद्रष्टे श्रीगुरुदेव !"


-श्री. राजा भागवत,पुणे

(परमपूज्य श्री गुरुदेवांच्या महानिर्वाणानंतरचे अनुभव कथन)

परमपूज्य श्रीसद्गुरु अनंतात विलीन झाले, यावर विश्वासच बसेना. “हे असं अचानक घडलं कसं?” आम्ही गोंधळून गेलो. पण सद्गुरूंची एकेक कृती, एकेक उद्गार, एकेक विधान ध्यानी येताच, हे सर्व योजनापूर्वक घडलं आहे, हे लक्षात येत गेलं.
परमपूजनीय सद्गुरुंचं कुठलंही कार्य नियोजनबद्ध असे, मग सदेह अवस्थेतील अवतार कार्य त्याला अपवाद कसं असणार! श्रीसद्गुरुंनी त्यांच्या आयुष्यात वेळेला फार महत्व दिलं होत. कुठल्याही कर्माची योजलेली वेळ चुकलेली त्यांना आवडत नसे, मग ती कशाचीही असो- उठायची, स्नानाची, दर्शनाची, प्रवासाची, प्रवासाला बरोबर येणाऱ्या कितीही जणांना घेऊन ते बरोबर वेळेतच बाहेर पडत असत. त्यासाठी मग गुरुदेव एकाजागी बसून सर्वांकडून वेळे आधी तयारी करून घेत असत. आणि इतकं करूनही जो वेळेवर पोहोचणार नाही, तयार होणार नाही, त्याला चक्क तिथंच सोडून पुढं जात असत.
अर्थात आपण ब्रह्मलीन व्हायचं आहे, हा देह विसर्जित करायचा आहे, हे एकदा ठरल्यानंतर त्याची वेळ आपणच निश्चित केल्यावर, गेली काही वर्षे गुरुदेव शांतपणे निरनिराळ्या योजना राबवत राहिले. त्यांची योजकता इतकी श्रेष्ठ दर्जाची होती की, अमुक गोष्ट ही मुद्दाम घडवलेली आहे हे कोणालाही खरं वाटू नये. इतकी स्वाभाविक असायची., याबाबतीत भगवान श्रीकृष्णांचा उल्लेख अपरिहार्य आहे. अशी योजकता भगवंताची पाहायला मिळायची, मिळते.
ही योजकता सर्व बाबतीत बघायला मिळते; मग एखादे कार्य असो, दुसऱ्यांच्यात घडवून आणायचे बदल असोत, कोणाला एखादी गोष्ट मिळवून द्यायची असो किंवा स्वतःच्या देहावस्थेतील बदल असोत. माझ्यामते श्रीसद्गुरु हे पूर्णब्रह्म परमेश्वर होते- आहेत. यापूर्वी त्यांनी ‘श्रीकृष्ण’ महाभारत घडवून दाखवलं आहे. त्यामुळं त्यांना काहीच अशक्य नव्हतं. पण असा अधिकार त्यांनी स्वतः कधी दाखवला नाही त्यामुळं माझं हे म्हणणं कदाचित पटणार नाही. *श्रीगुरू याबाबतीत- “मी जन्मानं ‘आठवा’ आहे” एवढचं विनोदाने म्हणायचे.
तेव्हा एकदा ही देहावस्था सोडण्याचा काल ठरल्यानंतर कार्याकरता लागणारे धन, जागा, वस्तू, सुवर्ण, मनुष्यबळ वगैरे सर्व आपणच करतो आहोत असं कुठंही न दाखवता, निःस्पृहपणे पण वेळेवर जमा केलं. आपल्या देखत त्या सर्व गोष्टींची योग्य व्यवस्था केली. पुढील कार्याच्या, व्यवस्थेच्या दृष्टीने निरनिराळ्या भक्तांच्या नेमणुका केल्या. श्रीगुरुंनी नियोजित मंदिराकरिता व कार्यासाठी लागणारं धन, सुवर्ण जमा केलं. तेही आपल्या नियमात राहून. कुणालाही तू अमुक दे, वा तमुक कर असं न सांगता वैदिक परंपरेला अनुसरून अगदी अयाचित वृत्तीने, अगदी स्वाभाविकपणानं तसंच जो कोणी दाता असेल त्याला कृतार्थतेचा आनंदही दिला. आवश्यक तेवढंच जमा होऊ दिलं आणि म्हणाले आता मुख्यत्वे प्रसार आणि प्रचार करा. पुढची व्यवस्था आपोआप होत राहील. जे जमा झालं ते सगळं कायद्याच्या चौकटीत ठेऊन सुरक्षित केलं. त्यातून दैनंदिन खर्चासाठी आणि पुढील योजनांसाठी खर्च कसा चालवा, याचाही आराखडा करून तोही आपल्यासमोर राबवून घेतला. नियोजित मंदिराचं छोटं प्रतिरूप स्वतःसमोर बनवून घेतलं, जागा ताब्यात आहेच. एकुणात मंदिराकरताची सर्व व्यवस्था परिपूर्ण रीतीनं करून ठेवली.*
वेदकार्य हे अखंडपणे युगानुयुग चालणारं कार्य आहे. त्यामुळं श्रीगुरुंनी आपल्या श्रीदत्त देवस्थान ट्रस्टतर्फे अभिप्रेत असलेलं कार्यं सतत चालू राहण्यासाठी व्यवस्था करून ठेवली आहे.
श्रीगुरुपौर्णिमा आणि परमपूजनीय गुरूदेवांचा वाढदिवस यांसाठी त्यांनी स्वतः उपस्थित असणं आवश्यक होतं. एवढे दोन उत्सव वगळता बाकी सर्व छोटे-मोठे उत्सव शेवटच्या वर्षात आपल्या प्रकृती अस्वास्थ्याचं अपरोक्ष कारण पुढं करून भक्तांकडून करून घेतलं. श्रीगुरू उत्सवाला प्रत्यक्ष नव्हते म्हणून भक्तांनी हळहळ व्यक्त केली. तर म्हणायचे इथून पुढं असंच चालायचं.
हे सर्व घडत असताना प्रकृतीत चढउतार चालूच होता. मधूनच एखादी वेळ अशी येई की ‘आता काही खरं नाही’ असं वाटे. पण अशावेळेला, ‘मार्ग दाखवावा’! अशी भक्तांनी प्रार्थना केली की गुरुदेव धीर देत असत व कठीण प्रसंगातून आपोआप मार्ग निघत असे. १५ एप्रिल ९८ , १२ डिसेंबर ९८ या दोन दिवशी केलेल्या प्रार्थनांना होकारार्थी उत्तर मिळालं. मात्र २२ ऑगस्टला अशीच प्रार्थना केली तर म्हणाले, “आता देहाची आवश्यकता नाही” काही वेळा अचानक प्रकृतीत गंभीर बिघाड घडत असे. पण सद्गृरू त्यातून बाहेर पडत असत व नंतर श्रीगुरू स्वतःच म्हणत- “मला वाटलं नव्हतं पुन्हा आपली भेट होईल,” त्यावर आम्ही सर्वजण एकमुखानं म्हणायचो की, “आपल्याला काहीच होणार नाही.” काही वेळेला म्हणायचे, “माझा धीर खचत चालला आहे,” पण त्यांच्या निरंतर खंबीर वृत्तीमुळे हे खरं वाटायचं नाही. आम्ही कधी मनानं मान्यच केलं नाही की, असा महानिर्वाणाचा प्रसंग इतक्या लवकर येईल! सन २००० च्या जूनपर्यंत श्रीगुरू पूर्ण बरे होतील आणि त्या दृष्टीनं त्यांच्या सान्निध्यात राहण्यासाठी, सेवेसाठी कोण कसं उपलब्ध होईल याच्या योजना आखल्या होत्या.
श्रीगुरुंना आपली देहावस्था संपल्यानंतर येणाऱ्या प्रसंगांवरच्या उपाययोजना करायच्या असायच्या, आणि आम्ही तर हे मान्य करायला तयार नव्हतो की, ‘अशी अवस्था येईल’. मग गुरुदेव म्हणायचे, “पण तसा प्रसंग आला, तर असं असं करा,” असं बराच वेळ चालायचं आणि असं करत श्रीगुरुंनी सर्व गोष्टी करून घेतल्या.
श्रीगुरुंनी सर्वांना भरभरून दिलं, देताहेत आणि ज्याच्या त्याच्या भक्तीप्रमाणे देतीलही. पण आपल्यासाठी दुसऱ्याला त्रास नको, हे सूत्र ठेवून ते वागायचे. आपल्यामुळं दुसऱ्यांना दुःख नको; आपण देहावस्थेत नसलो तरी शक्ती कायम राहणार आहे. त्यामुळे सर्वांवर त्यांनी माया पसरवली की,’तसं काही होत नाही.’ एकीकडे सर्व अपेक्षितांना जवळ आणलं, सर्व चीजवस्तू जागोजागी ठेवून घेतल्या, देहावस्थेत राहून आवश्यक असलेल्या गोष्टी करून घेतल्या, आणि मग विचारलं, “माझ्याकडून काही करायचं राहिलं आहे का?” त्यावर “नाही” असं उत्तर आल्यावर मग म्हणाले, “मी आता शांत झोपतो. मला हलवू नका.” असं सांगून गुपचूप शांतपणे धीरोदात्तपणे स्वेच्छेने अनंतात विलीन झाले. हे इतकं स्वाभाविक घडलं की खोलीत असलेल्या कुणालाच जवळच्यांनाही समजलं नाही. सर्व योजना आधीच झालेली असल्यानं वेगळं कुणालाच काही सांगाव लागलं नाही. सांगितलं नाही.
श्रीगुरू स्वतःबद्दल कधीच फारसं कधी बोलत नसत, आवश्यक असेल तेवढीच माहिती द्यायचे. त्यांनी स्वतःकरिता दुसऱ्याकडून काहीच घेतलं नाही. एखाद्याने दिलं तरी त्यातून त्या व्यक्तीचा उत्कर्ष कसा घडेल, हेच बघितलं. इतकंच नव्हे, त्या व्यक्तीला त्याच्या लौकिकदृष्ट्या परत दिलंच आणि त्याच्याबरोबर अलौकिक दुर्मिळ असं आत्मसुखही दिलं.
श्रीगुरुंनी आपले सर्व शब्द सांभाळले. श्रीगुरूंची प्रत्येक गोष्ट स्वाभाविक घडलेली असायची, त्यांनी अगदी सहजच सांगितलं – “शक्ती एकदा निर्माण झाली की ती विसर्जित होत नाही”, त्याचा प्रत्यय आपल्याला सतत येत असतो. तो नित्य येत राहणार आहे. श्रीसद्गुरु हे अनादि-अनंत, शाश्वत, नित्य ब्रह्मरूप आहेत.


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy