आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा



सद्गुरु


ज्ञानसंपादनाचे अनेक मार्ग माणूस अवलंबत असतो. सुशिक्षित व्यक्ती मुख्यतः पुस्तके, ग्रंथ आदि वाड़मयीन प्रकार ज्ञान मिळण्यासाठी अधिक उपयोगी असे मानतात. काही माणसे श्रवण, कीर्तनातून ज्ञानप्राप्ती करण्याचा प्रयत्न करीत असतात. जेथे ज्ञान ह्या शब्दाचा अर्थ *माहिती* एवढाच मर्यादित असतो तेथे ही साधने उपयोगी असतात. पण जेव्हा प्रत्यक्ष अनुभवयुक्त ज्ञानाची आवश्यकता वाटते तेव्हा ग्रंथ, पुस्तक आणि कीर्तने ह्यामधून मिळणारे शाब्दिक ज्ञान पुरेसे होत नाही. अशा वेळी योग्य अशा व्यक्तींकडून प्रत्यक्षात मार्गदर्शन मिळणे नितांत गरजेचे असते, मग ते ज्ञान व्यवहारिक असो अथवा पारमार्थिक. नुसते पुस्तक वाचून पोहता येणार नाही. तसेच उत्तम पोहणा-याचे पोहणे बघूनही पोहता येणार नाही. पण हे दोन्ही करुन मार्गदर्शकाच्या हजेरीत पाण्यात उडी मारल्यावरच प्रत्यक्ष सरावाने पोहणे शिकता येते.

एखाद्या पदार्थाची चव हे इंद्रियज्ञान आहे.साखरेची चव कितीही शब्दात सांगितली तरी प्रत्यक्ष साखर खाल्ल्याशिवाय तिच्या चवीचे वास्तविक ज्ञान होत नाही. अध्यात्मज्ञान हे तर बुद्धिपलीकडील आहे त्याचे हुबेहुब वर्णन शब्दात कसे करता येईल? म्हणून सद्गुरुंची आवश्यकता प्रकर्षाने अध्यात्ममार्गात असते.

'गुरु' हे तत्त्व आहे. गुरुतत्त्वाचे वर्णन करावयास सहाजिकच शब्द तोकडे पडतात. पण त्याची कल्पना येण्यासाठी गुणात्मक वर्णन करता येते, ते गुण थोडक्यात सांगायचे म्हणजे ज्ञान, विवेक आणि वैराग्य. असे गुण ज्या व्यक्तीमध्ये असतील ती व्यक्ती निश्चितपणे सद्गुरुपदी आरुढ असते. अशा व्यक्ती दुर्मिळ आणि दुर्लभ असतात. परंतु त्या अस्तित्वात असतात हे निश्चितच.
अशा सद्गुरुंची निकड व निर्माण करण्याची कामगिरी शाब्दिक ज्ञान थोड्याफार प्रमाणात करते. परमेश्वराच्या इच्छेने काही माणसांना सद्गुरुंचे दर्शन आणि सहवास मिळतो. सद्गुरु हे दयाळू असल्याने त्यांना शरण आलेल्या भक्तांवर सतत कृपा करत असतात. पण भक्ताच्या दृष्टीने पहावयाचे झाल्यास, भक्तामध्ये सद्गुरुंनी केलेल्या कृपेचा आणि दिलेल्या आशीर्वादांचा स्विकार करण्याची शक्ती असावी लागते. म्हणून बरेचदा असे दिसते की एखादा माणूस सद्गुरुंच्या दर्शनाला वर्षानुवर्षे जात असतो, परंतु त्याच्यामध्ये विशेष अध्यत्मिक उन्नती झालेली आढळत नाही. प्रत्येक भक्ताने ह्याबाबतीत सतत वस्तुनिष्ठ दृष्टीने आत्मनिरीक्षण करणे जरुरीचे असते. सद्गुरुंचे आशीर्वाद स्वीकारण्याची आपली कुवत वाढवण्याचा प्रत्येक भक्ताने प्रयत्न करणे महत्वाचे असते. सद्गुरुदर्शन, सत्संग आणि सद्गुरुसेवा या तीनही गोष्टींचा उपयोग प्रत्येक भक्ताने आत्मोन्नतीसाठी करावयाचा असतो.


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy