|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||


आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


सद्गुरुप्राप्ती


परमार्थात प्रगती करण्याची प्रचंड तळमळ असणऱ्या व्यक्तीस कधीना कधी ज्ञानी, विवेकी आणि वैराग्यशील सद्गुरूंची भेट होतेच होते. आयुष्याच्या कोणत्या क्षणी होईल हे त्याच्या कर्मावर आणि परमेश्वराच्या इच्छेवर अवलंबून असते.
अशा “सद्गुरूंचे” दर्शन झाले म्हणजेच “सद्गुरुंप्राप्ती” झाली असे म्हणता येईल का? ह्या प्रश्नावर विचार करण्याची गरज आहे.

ह्याबाबतीत आपण एक व्यवहारातील उदाहरण घेऊ या. समजा,एखाद्या व्यक्तीला ठराविक सुवास घेऊन आनंद मिळवण्याची इच्छा झाली, म्हणून ती व्यक्ती बाजारात गेली आणि अत्तराची बाटली विकत घेतली. ती अत्तराची बाटली खिंशात घालून ती व्यक्ती घरी यावयास निघाली. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला अत्तरप्राप्ती झाली असे म्हणता येईल का? एका अर्थाने तसे म्हणता येईल, कारण केव्हाही बाटली उघडून अत्तराचा सुवास ती व्यक्ती आता घेऊ शकते. परंतु अत्तराचा वास घेता येण्याची शक्यता आणि प्रत्यक्ष वास घेणे ह्यामध्ये बरेच अंतर असू शकते. म्हणजेच रस्त्यातच एखाद्या मित्राने ती बाटली घेतली किंवा ती बाटली कुठे चुकून विसरून राहिली किंवा फुटली तर काही काळ खिशात अत्तर प्राप्त झाले असे म्हणता येणार नाही. कारण व्यक्तीचे खरे उद्दिष्ट किंवा ध्येय आनंद मिळवणे हे होते. त्यातही त्याला अत्तराच्या सुवासाची गरज भासली म्हणून त्याने अत्तराची बाटली विकत घेतली.

सद्गुरूंप्राप्तीच्या संदर्भातही हेच विचार लागू पडतात. प्रत्येक मानवाचे अंतिम ध्येय “मोक्षप्राप्ती” हेच असते. ज्यांना ह्याची जाणीव झालेली असते तेच परमार्थ मार्ग स्वीकारतात. अशा व्यक्तींमधील काहींना सद्गुरूंच्या भेटीचा योग येतो. पण ती भेट म्हजे फक्त सुरुवात असते. सद्गुरूंची भेट होऊन सुद्धा आणि वारंवार दर्शन घेऊन सुद्धा त्या माणसात परमार्थमार्गात प्रगती होण्यासाठी लागणारे गुण निर्माण होत नसतील तर त्याला “सद्गुरूंप्राप्ती” झाली असे म्हणता येणार नाही.
ह्या उलट सद्गुरूंची भेट झाल्यानंतर एखाद्या माणसाची आसक्ती कमी होऊ लागली, अहंकार आणि राग वगैरे दोष कमी होऊ लागले तर सद्गुरूप्राप्ती झाल्याची कच्ची पावती आहे. कच्ची पावती एवढ्यासाठीच की तो माणूस “सत्शिष्य” झाला आहे असे सद्गुरू जेंव्हा सांगतील ती “सद्गुरूंप्राप्तीची” पक्की पावती असेल.

।। श्री गुरुदेव दत्त ।।