आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


॥ समाधी॥


।। श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ।।


'मनुष्य हा भक्तीच्या माध्यमातून समाधी-अवस्थेपर्यंत जाऊ शकतो. समाधी-अवस्था ही परिपूर्ण अवस्था आहे. मानवी देहामध्ये एकाग्रता निर्माण होणं, मानवी देहात ईश्वराची जी शक्ती आहे त्या शक्तीशी आपण एकरूप होणं, याला “समाधी-अवस्था” म्हणतात. तसा ईश्वर पहायचा ठरवला तर अत्यंत कठिण परिस्थिती असते, तेव्हा ईश्वर जाणण्याचं साधन म्हणजे समाधी-अवस्था प्राप्त होणं. समाधी-अवस्थेत मनुष्य त्या रुपाला एकाग्र चित्तानं पाहू शकतो, एकरूप होऊ शकतो. भक्तिमार्गातूनही ईश्वराचं सहाय्य लाभू शकतं, परंतु त्यास अनंत काळ द्यावा लागतो. पण ध्यानाच्या माध्यमातून समाधी-अवस्थेपर्यंत जर एखादी व्यक्ती पोहोचली, तर त्या व्यक्तीला इहजन्मामध्ये ईश्वर-दर्शनाची गोष्ट साध्य होऊ शकते. या सर्व गोष्टीला मात्र गुरूंची आवश्यकता असते. गुरू हे परमपदाला पोहोचले असतील आणि गुरू हे जर या मार्गातले श्रेष्ठ पुरूष असतील तर शिष्याला ते समाधी-अवस्थेचा लाभ आणून देऊ शकतात आणि त्या अवस्थेद्वारे त्याची ईश्वराची भेट होऊ शकते. 'गुरूंच्याच मार्गदर्शनातूनच ह्या मार्गाकडे जावं लागतं.' (सद्गुरूसंवाद: समाधी-साधना आणि श्रीगुरूकृपा)

समाधी-अवस्थेत व्यक्ती ही शून्यावस्थेत असते. शून्यावस्था येणे म्हणजेच तेजोमय होणे, अहंकार गळून पडणे, मानवी देहाच्या आठवणी विसरणे. 'तो' मी आहे अशी भावना देहाला यावी लागते, ही भावना आली की तो देह त्या अनुभवातच राहतो. स्वतःच्या ठिकाणी त्या परमेश्वराला साक्षित्वात अनुभवणे ह्याला 'समाधी-अवस्था' म्हणतात. समाधी-अवस्थेत देह आहे तसाच राहतो. त्यात काहीही फरक पडत नाही. जे लोक समाधी अवस्थेत जातात त्यांचा देह फक्त श्वासोश्वासावर जगतो, त्यांना अन्न-पाणी कशाचीही गरज लागत नाही. कोणत्याच क्रियेचं भान नसतं, आपण कुठ आहोत याच भानसुद्धा नसतं. म्हणजेच तो परमेश्वराशी एकरुप झालेला असतो. जे लोक समाधी घेतात त्यापैकी काही लोक अशी जागा निवडतात की जवळपास नदी असेल व कंदमुळ असेल, भरपूर हवेची सोय असेल. काही लोक समाधी-अवस्थेत असताना अन्न घेत नाहीत, पाणी देखील पीत नाहीत म्हणून मलमुत्र विसर्जन होत नाही. ही स्थिती प्राप्त करायला फार मोठी योग्यता लागते. ह्या लोकांचे मन एकदम स्थिर असते म्हणून त्यांचा देह स्थिर राहतो. स्थिर अवस्था म्हणजेच समाधी अवस्था. 'आमचा देह त्यापैकी एक आहे' (रामकृष्णउवाच: समाधी)


॥ समाधी-अवस्थेची पूर्वतयारी ॥

'शिष्याची या अवस्थेकडे जाण्याची इच्छा असणं एवढीच पूर्वतयारी आवश्यक असते. शिष्याला जर ईश्वर भेटीची इच्छा किंवा ओढ असेल आणि त्यानं गुरूंकडे तशी प्रार्थना केली असेल, तर समाधी-अवस्थेपर्यत गुरू त्याला नेऊ शकतात. (सद्गुरूसंवाद: समाधी-साधना आणि श्रीगुरूकृपा)

अष्टांगयोग साधनेमध्ये ‘यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी' यांसारख्या पाय-या आहेत, त्या पाय-यांनीच या समाधी-अवस्थेपर्यत जावं लागतं. धारणा, ध्यान आणि समाधी या अवस्थांचा आंतरीक संबंध असतो. 'धारणा म्हणजे विचार करणे', 'ध्यान म्हणजे साम्यावस्था येते' आणि या दोन्ही अवस्थांची अनुभूती म्हणजे समाधी; असा ह्याचा क्रम आहे.

समाधी-अवस्थेस सुखासनापासून प्रारंभ होतो. देह हा निश्चल राहावा यासाठी सुखासनाची गरज असते आणि चित्त एकाग्र रहावं यासाठी धारणेची गरज असते. प्राणायाम व प्रत्याहार यातून हे साधलं जातं. मग ध्यान-समाधी अवस्था योगानेच येतात. समाधीचा अभ्यास भल्या पहाटे उठून करावा लागतो, त्याचा कालावधी व्यक्तिसापेक्ष असतो. गुरूकृपेने, गुरूआशीर्वादाने, गुरू मार्गदर्शनाने, भक्तीने उपासना करावी लागते. उपासनेद्वारे मन विरघळावे लागते. जशी देहाची उच्च अवस्था येईल, आपल्या ठिकाणी असलेलं चैतन्य शिष्याला डोळ्यांनी पाहता येतं. चैतन्य म्हणजे तेज. ज्यावेळी शिष्याच्या शरीरातून तेज बाहेर पडायला लागतं त्यावेळी तो चैतन्यरुप होतो. चैतन्यरुप ही अवस्था समाधी-अवस्थेनंतर प्राप्त होते.

सामान्य माणूस ईश्वराचा लाभ होण्याकरता भक्तिमार्गाने जाऊ शकतो. भक्तिची तीव्रता जेवढी अधिक तेवढा तो भक्त ईश्वराप्रत अधिक जातो. नंतर त्याला समाधी अवस्था प्राप्त होणे शक्य होते, यासाठी त्याला अनेक जन्म घ्यावे लागतात. परंतु परमपदाला पोहोचलेले गुरू आणि तेवढीच ओढ असलेला शिष्य जर असेल तर समाधी-अवस्था व ईश्वराची भेट हे एका जन्मात प्राप्त होण्याची बरीच शक्यता असते. (रामकृष्णउवाच: समाधी-अवस्थेची पूर्वतयारी़)


॥ समाधीची रुपे ॥

समाधीची रुपं दोनच आहेत. एक संजीवन-समाधी आणि दुसरी जड-समाधी. आपल्याकडे समाधीचा अधिकार फक्त संन्याशालाच आहे.

प्रकारः
१) चिरंजीव समाधी: जे लोक जीवीत समाधी घेतात, ते शेवटपर्यंत जिवंतच राहतात. जे सत्पुरूष जिवंत समाधी घेण्याच्या विचारात असतात; त्यांची फार पूर्वीपासून तयारी सुरू असते. योग साधनेने त्यांनी स्वतःच्या श्वासोश्वासाच्या गतीवर नियंत्रण मिळविलेले असते. जर जिवंत माणसाच्या नाडीचे ठोके मिनीटाला सत्तर पडत असतील तर त्यांचे मिनीटाला तीन किंवा चारच पडतात. इतक्या मंद गतीने श्वासोश्वास चालू असतो. अशा जीवंत समाधीला चिरंजीव समाधी असे म्हणतात.
२) तंत्र समाधी: काही व्यक्तींना समाधी लावून पून्हा ती उतरवताही येत असते.
३) जलसमाधी: ज्या सत्पुरूषांनी देह ठेवला, त्या देहावर क्रियाकर्म करावेच लागते. काही लोकांना दहन करावे लागते. तर काही लोकांना जलसमाधी घ्यावी लागते. वासुदेवानंद सरस्वती यांनी देह नर्मदा नदीत विसर्जित केलेला आहे. ज्ञानेश्वरांच्या मातापित्यांनी ज्यावेळी जलसमाधी घेतली त्यावेळी चारही भावंड ऋणानूबंधातून मुक्त झाले.
४) संजीवन समाधी: अध्यात्मात समाधी ही शेवटची पायरी समजली जाते. काही माणसे समाधी उतरत असताना पुनः समाधी लावून बसतात म्हणजेच कायम समाधिस्त राहतात, त्यांच्या समाधीला संजीवन समाधी म्हणतात. अशी अवस्था ज्ञानेश्वरांच्या बाबतीत घडली आहे.
५) सविकल्प समाधी: समाधीचा दुसरा अर्थ असा असू शकतो की, जे अष्टांग योगाचं आचरण करतात, समाधीचा अपूर्व अभ्यास करतात, त्यांना हा लाभ होऊ शकतो. त्या समाधी अवस्थेला काळाची मर्यादा नसते. कारण समाधी घेणा-या कुठल्याही पुरूषाला त्रिकाल ज्ञान असू शकेल. पण जगाच्या व्यवहाराची जाण असू शकत नाही. स्थळ आणि काळ या देन्हीचेंही त्याला भान राहत नाही, ती सविकल्प समाधी.
६) ताटस्थ समाधी: यामध्ये सबंध देह निश्चेष्ट होतो. त्यांचा मी हा मूळ स्वरुपामध्ये विसर्जीत झालेला असतो.
७) पवित्र समाधी: दंडधारी संन्यासी यांच्यावर अग्निसंस्कार करता येत नाही, ते नारायण स्वरुपी झालेले असतात. म्हणून त्यांचा देह ठेवला जातो आणि त्यावर समाधी बांधली जाते. या समाधीवर अभिषेक वगैरे करता येत नाही. म्हणून समाधीवर शिवलिंग ठेवले जाते. त्यावर अभिषेक करतात. अशा प्रकारच्या समाधी श्रृंगेरीला श्री शंकराचार्यांच्या मठात दिसून येतात.

जलसमाधी, जिवंतसमाधी, गुप्त होणे किंवा संजीवन समाधी हे सर्व एकच आहे. एकाच पद्धतीची समाधी सगळ्यांनी घेतली तर ती परंपरा सुरू होईल. अशी परंपरा सुरू होऊ नये म्हणून ही विविधता. एकाच पद्धतीची परंपरा सुरू झाली तर भक्तिमार्ग बाजूला राहील आणि योगमार्ग पुढे येईल. समाधी अवस्था हा योगमार्ग आहे.


॥ श्री ज्ञानेश्वर: संजीवन समाधी ॥

॥ अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र, जिथे नांदतॊ ज्ञानराजा सुपात्र ॥

ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे तेराव्या शतकात, मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ.स. १२७५) रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी व त्यांच्या आई रुक्मिणीबाई. निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू. निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई ही त्यांची भावंडे. निवृत्तीनाथ हेच ज्ञानेश्वरांचे सद्गुरू होते. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ‘ज्ञान’, श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले.

माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। (ज्ञाने - ६.१४) असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणार्‍या ज्ञानेश्वरीत सुमारे ८५०० ओव्या आहेत. त्यांचा दुसरा ग्रंथ ‘अनुभवामृत’ किंवा ‘अमृतानुभव’ होय. हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा, जीव-ब्रह्म ऐक्याचा ग्रंथ आहे. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे. ‘चांगदेव पासष्टी’ या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवांचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला.

ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या पावन तीरावर संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दूर्मुखनाम संवत्सर, इ.स. १२९६, गुरुवार).
श्री ज्ञानेश्वरांनी केवळ स्मरणाने ज्ञान प्राप्त करून ज्ञानेश्वरी सारख्या महान ग्रंथाची निर्मिती केली, ग्रंथ लेखन हे त्यांचे विहित अवतार कार्य होते.
श्री ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी कार्य पूर्ण झाल्यावर निवृत्तीनाथांच्या परवानगीने संजीवन समाधी घेतली. ह्या समाधीचे वैशिष्ट्य असे की ती समाधी अजूनही आहे तशीच आहे. ती कधीही नष्ट होणार नाही. याचाच अर्थ श्री ज्ञानेश्वर तेथे शरीराने पूर्वीप्रमाणेच आहेत. आपला हा सनातन धर्म टिकावा, सनातन धर्माची ध्वजा कायम फडकत रहावी यासाठी ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी प्राप्त करून घेतली. या समाधी अवस्थेनंतर पुन्हा जागृत अवस्था येऊ नये, कारण त्या वेळी आपण करीत असलेल्या कार्याची आठवण होईल, आपण त्या काळात जी माणसे पाहिली असतील त्यांचे एखादे वेळीस स्मरण होईल, या आठवणी येऊ नयेत तसच समाधी अवस्थेमध्ये आपण ईश्वराशी अखंड एकरुप रहावं हा एकमेव हेतू ज्ञानदेवांच्या मनात असावा.
श्री ज्ञानेश्वर हे साक्षात ईश्वराचं रुप असल्यामुळे समाधी अवस्थेत निरंतर राहून सुद्धा ते कार्य करू शकतात. त्यांनी स्थापन केलेला जो वारकरी पंथ आहे, हे त्यांचे कार्य आहे. अनंत कालापर्यंत वारकरी पंथ टिकावा, त्यांच अनेक लोकांनी अनुकरण करावं आणि त्यातूनच परमेश्वराची सेवा घडावी म्हणून या कार्याची धुरा अजुनही स्वतः ज्ञानेश्वर वहात आहेत असं समजायला काही हरकत नाही. धर्मसंस्थापनेचं किंवा धर्मप्रचाराचं कार्य हे या वारकरी पंथातून चालू आहे, ही समाधीची शक्ती आहे.
ज्ञानेश्वरांच्या समाधीला अभिषेक करण्यासाठी पंचामृत घातले जाते. संजीवन समाधीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांना नीलप्रभेचा अनुभव आलेलाच असेल. समाधी घेत असतानाही आला असेल. तसेच समाधीच्या आतही नीलप्रभेचा अनुभव असेल. समाधीच्या ठिकाणी असल्यामुळेच तो बाहेर संक्रांत होतो आणि सर्वांवर त्याचा वर्षाव होतो. त्यालाच आनंदाचा वर्षाव म्हटलं जातं. ते अंतर्ज्ञानी आहेत, भक्तांच्या इच्छा जाणण्याची शक्ती ज्ञानेश्वरांना आहे. त्यामुळे भक्तांच्या मनःकामना पूर्ण होतात.

श्री ज्ञानेश्वर प्रत्यक्ष दिसत नसले तरी तेथेच आहेत हे निश्चित आहे. वारकरी पंथ हा कायमस्वरुपी टिकावा यासाठी ते संजीवन समाधीच्या स्वरुपाने अखंड कार्य करित आहेत.

रामकृष्णउवाच : समाधी: श्री ज्ञानेश्वरांची


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy