सनातन वैदिक धर्म आणि वर्ण व्यवस्था
(सनातन=नित्य नवीन असलेला वैदिक =वेदांवर आधारलेला)
यदा यदा हि "धर्मस्य" ग्लानिर्भवति भारत|
अभ्युत्थान्मधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्||
सर्वांना परिचित असा हा भगवद्गीतेतील श्लोक!!! निदान ह्याने तरी तिचे पुनःस्मरण होईल
अशी आशा वाटते. सध्याची परिस्थिती पाहता काही लोक उगाचच जातीभेद आणि धर्म भेद निर्माण
करून आणि वर्णव्यवस्थेचे भांडवल करून समाजात दुफळी आणि गोंधळाचे वातावरण निर्माण करू
पाहत आहेत. त्यांना भगवद्गीता सांगण्या इतका मी श्रेष्ठ नाही परंतु गीतेतील काही श्लोकांचे
स्मरण करून देऊ इच्छितो जेणे करून विचारशक्ती जागृत असणार्यांचे संभ्रम दूर होतील.
मला सर्व प्रथम हे सांगावेसे वाटते कि या जगात कोणतीही व्यवस्था अशी नाही किंवा निर्माण
करता येणे शक्य नाही कि जी गुण आणि कर्मांवर आधारित नाही,मग समाज व्यवस्था आणि धर्म
व्यवस्था का अपवाद असावी? इतकेच काय पण सरकार सुद्धा सरकारी कर्मचार्यांना ४ श्रेण्यांमध्ये
विभागते.
१. क्लास-१ — नीति निर्माण, प्रबंधकीय, कार्यकारी आणि वित्तीय अधिकारांनी संपन्न उच्च
अधिकारी
२. क्लास-२ – आदेश पालक अधिकारी
३. क्लास-३ — यांना OFFICIAL/SUBORDINATE STAFF म्हणतात.हे कार्यालय सहायक /तांत्रिक
सहायक कर्मचारी असतात.
४. क्लास-४ — शिपाई, रनर, हमाल, अकुशल श्रमिक/कष्टकरी कामगार.. ह्यात कुणालाच दुमत
असण्याची शक्यता नाही.
ज्यांनी भगवद्गीता निदान पूर्ण वाचली आहे त्यांना हा श्लोक तर माहित असेलच-
चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुण कर्म विभागशः|
तस्य कर्तारम् अपि मां विद्ध्य अकर्तारम् अव्ययम्||(भ.गी.४-१३)
(ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य आणि शूद्र हे चार वर्ण मी त्यांच्या "गुण आणि कर्मानुसार"
निर्माण केले आहेत,त्यांचा करता जरी मी असलो तरी मी अकर्ता आणि अव्यय आहे.)
भगवंताने हि व्यवस्था व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या गुण आणि त्यांच्या कार्यानुसार निर्माण
केली आहे. काही लोक भगवद्गीता न् वाचता तिच्यावर टीका करतात आणि म्हणतात कि गीतेने
वर्ण व्यवस्था निर्माण केली ब्राह्मणांना श्रेष्ठ मानले वगैरे वगैरे...! आता हा श्लोक
पहा:
ब्राह्मण क्षत्रिय विशाम् शूद्राणां च परन्तप|
कर्माणि प्रविभक्तानि स्वभावप्रभवैर्गुणैः||(भ,गी.१८/४१)
(हे परन्तप! ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य आणि शूद्र हे चार वर्ण स्वभावतः असणाऱ्या गुणांनी
आणि त्यानूसार असेलेल्या कामांनी विभागलेले आहेत.) आता ह्यात चुकीचे ते काय? ज्याने
त्याने स्वतःला नेमून दिलेली कामे /कर्मे आणि भगवद्गीता ह्यालाच धर्म म्हणते. ती जर
योग्य प्रकारे पार पडली तर संशय आणि वाद उत्पन्न होण्याची सुतराम शक्यता नाही. अर्थात
सर्व कामे हि समान दर्ज्याची आहेत.शाळा हा हि जर एक समाज व्यवस्था मानली तर त्यात मुख्याध्यापक,पर्यवेक्षक,शिक्षक
आणि शिपाई असे चार भाग येतातच ना? ह्यातील एखादा जरी घटक नसेल तर ती व्यवस्था किंवा
संघटना परिपूर्ण कशी असू शकेल? त्यात प्रत्येकाच्या कामाला समान महत्व आहे.
आता सर्वात मोठ्ठा प्रश्न आहे तो म्हणजे "धर्म" गीतेत/ज्ञानेश्वरीत सर्वच ठिकाणी धर्म
ह्याचा अर्थ कर्तव्य असा प्रामुख्याने घेतलेला दिसून येतो.
"दुरितांचे तिमिर जावो|विश्व स्वधर्म सूर्ये पाहो ||पसायदान ३||
दुरित म्हणजे पाप आणि तिमिर म्हणजे अंधार पापाचा अंधार नाहीसा होवो आणि संपूर्ण विश्व
स्वतःचा धर्म (कर्तव्य,इथे सत्कर्म ह्या अर्थी सुद्धा) सूर्यामध्ये पाहो.म्हणजेच "सदाचरण"
चांगले आचरण हा सुद्धा धर्मच आहे. सूर्य ज्या प्रमाणे कोणताही भेद भाव न् करता सर्वांना
समान प्रकाश वितरणाचे काम करतो त्या प्रमाणे प्रत्येकाने आपापले काम "सुर्याला"साक्षी
ठेऊन कोणत्याही जातीचा/धर्माचा /पंथाचा भेदभाव न् करता केले तर सगळी समाज व्यवस्था
उत्तम प्रकारे चालेल.कारण गीतेने म्हण्टले आहे-
श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् खनुतिष्ठात्|
स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः||(भ.गी.३-३५)
ज्ञानेश्वरी-अगा आपुला हा स्वधर्मु|
आचरणी जरी विषमु|
तरी पहावा परिणामु |फळेल जैसे|
परक्याचा धर्म कितीही आचरण्यास सोप्पा वाटत असला तरी तो आचरण्याची चेष्टा करू नये म्हणजे
आपले आपल्या अंगभूत गुणांनुसार जे काम वाट्याला आले आहे तेच करावे इतरांच्या कामाची
अथवा ते करण्याची चेष्टा करू नये.त्यामुळे आपलेच हसे होते.(वर्णानुसार प्रत्येकाची
कर्तव्ये भगवद्गीतेत १८ व्या अध्यायात ४१ ते ४४ ह्या श्लोकात दिली आहेत,जिज्ञासूंनी
ती जरूर वाचावीत)
स्वतः भीष्मांनी शांतीपर्वात म्हण्टले आहे कि-"लाकडाचा हत्ती,चामड्याचे हरीण,नपुंसक
मनुष्य,न उगवणारे शेत,पाउस न् पडणारे ढग न् शिकलेला/अज्ञानी ब्राहमण आणि प्रजेची रक्षा
न् करणारा राजा हे सर्व निरर्थक आहेत" आता सर्वात शेवटी १८ व्या अध्यायात भगवंतानी
सांगितले आहे कि -
सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज|
अहं त्वां सर्वपापेभ्य: मोक्षयिष्यामि मा शुच: ।।(१८-६६)
आता इथे धर्म हा शब्द कोणत्या अर्थी अपेक्षित आहे तर हिंदू मुस्लीम,ख्रिश्चन हे धर्म
मुळीच नाही. तर काम,क्रोध,लोभ,मोह,मद,मत्सर हे शरीर धर्म सोडून तू मला शरण ये मी तुला
सर्व पापांपासून मुक्ती देईन,दुःख करू नकोस. असे इथे भगवंत अर्जुनाला उपदेश करतात.
त्यामुळे कोणीही धर्मावर /जातीवर/वंशावर अथवा कोणत्याही समाज व्यवस्थेवर टीका करण्याआधी
त्यांना कमी लेख्ण्याआधी एकदा भगवद्गीता जरूर वाचावी. हि व्यवस्था निर्माण करणाऱ्यांनी
फार विचार करून ती निर्माण केली आहे. उगाच भावना भडकावायच्या किंवा तोंडाची वाफ वाया
घालायची म्हणून कामे करू नयेत अफवा पसरवून संशयाचे वातावरण निर्माण करू नये.
तैसे धर्माधर्माचे टवाळ|
दावी अज्ञान जे का मूळ|
ते त्यजुनि त्यजि सकळ| धर्मजात||-ज्ञानेश्वरी
।। श्री गुरुदेव दत्त ।।