आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा



||संस्कार||


प्रपंचवाईक माणसाने प्रथम स्वतःवर संस्कार करून घ्यावेत. मूल लहान असतानाच संस्कारांची सुरुवात करावी. शिस्त लावण्यासाठी गरज पडेल तेव्हा मुलांना रागावणे आवश्यक असते. मुलांचे अति लाड करणे योग्य नाही. अतिलाडांमुळे लहान वयातच मुले पालकांना उलटे बोलू लागतात. पालकांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये. मुलांच्या हुशारीचे अतिकौतुक करणे योग्य नाही. सर्वांनी या गोष्टीकडे फार जागृतपणे पाहणे आवश्यक आहे.
वर्तमानपत्र व टी.व्ही. या दोन चांगल्या गोष्टी समाजाला सध्या जाचक ठरू लागल्या आहेत. वाट्टेल त्या गोष्टी, जाहिराती त्यामार्गे प्रसारित केल्या जातात. वर्तमानपत्रातही आवश्यक व योग्य शिकवण देणाऱ्या बातम्याच वाचत जाव्यात. या गोष्टी मोठ्या माणसांनी सांभाळल्या कि लहान मुलांवर निदान वाईट संस्कार तरी होणार नाहीत. मुलांना योग्य वेळी योग्य समज देऊन संस्कार करणे आई-वडिलांचे कर्तव्यच असते. आईवडिलांबद्दल आदर व आदरयुक्त भीती ही मुलांना असली पाहिजे. स्त्रियांनी पतीला “आदराने” संबोधले तर मुलेही वडिलांना अरे-तुरे म्हणू शकत नाहीत. अश्या वागण्याने वातावरण चांगले राहण्यास मदत होते. अधिकारी सत्पुरुष जीवनात आले तर अशा गैर गोष्टी घडत नाहीत.
बोलण्यात माधुर्य व विचारांची मालिका असेल तर सर्वांना आपले बोलणे आवडते. चांगल्या वाणीचा प्रभाव मुलांवरही चांगला होतो. वस्त्राकडे ते केवळ “शरीराचे वेष्टण” म्हणूनच पहिले पाहिजे. साधे राहणे व उच्च विचार बाळगणे सर्वांसाठी आवश्यक आहे.
पैश्याच्या मागे लागून परदेशात जाऊ नये. अधिक ज्ञान व थोडाफार पैसा मिळवण्यास तेथे जाऊन त्यात समाधान मानून “या भूमीची सेवा करण्यासाठी परत यावे”. तेथे “कायमचे” राहण्यास जाऊ नये.
सुखाच्या कितीही कल्पना केल्या तरी सुख मिळत नाही. चांगले आचरण व सामान्य जीवन जगण्याने हमखास सुख लाभते. चिंतेने आयुष्य कमी होत असल्याने आपल्या मागचे व्याप, दुःखे कमी करण्याचा प्रयत्न करावा.
ईश्वर नामाच्या व्यतिरीक्त जे छंद असतील ते करमणुकीचे छंद असतात. त्यांच्यामुळे मनाला थकवा येतो. हे सर्व टाळण्यासाठी ईश्वराच्या नावाचा छंद लावून घेतल्यास आपली निश्चितच प्रगती होईल.

-|| श्रीरामकृष्ण उवाच ||
||पृष्ठ क्र.१९९||


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy