।। श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ।।
सर्वपित्री अमावस्या
भाद्रपद महिन्यातील अमावस्येला “सर्वपित्री अमावस्या”
असे नाव आहे. ह्या तिथीच्या दिवशी आपल्या सर्व पितरांना (पुरुष पूर्वजांना) उद्देशून
श्राद्ध करतात. या दिवशी प्रत्येक घरी एका तरी ब्राह्मणाला बोलावून भोजन दिले जाण्याची
प्रथा आहे. मनुष्याचा देह हा अन्नमय पिंड आहे. ज्याला आकार आहे तो जेवून संतुष्ट होतो.
ज्याला आकार नाही तो फक्त वासाने संतुष्ट होतो. ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीच्या नावाने
आवाहन करून वास म्हणजे अन्न ठेवले जाते तेव्हा, तेथे तो उपस्थित होतो व वासाने तृप्त
होतो. म्हणून पिंडदान करणे हा प्रभावी व उत्तम विचार आहे. व्यक्ती गेल्यानंतर पिंडदान
करणे आवश्यक आहे. मृत व्यक्तीचे श्राद्ध न केल्याने संकटांची परंपरा निर्माण होते.
या गोष्टींवर विश्वास नसणाऱ्या व श्राद्ध न करणाऱ्यांना या संकटांना तोंड द्यावे लागते.
भाद्रपद महिन्यातील कृष्ण (वद्य) पक्ष, म्हणजे दुसरा पंधरवडा, पितृकार्यास अत्यंत योग्य
असतो असे शास्त्रात मानले गेले आहे. ह्या पक्षाला “पितुपक्ष”, “अपरपक्ष”
किंवा “महालय पक्ष” असेही म्हणतात. हा पक्ष सर्वपित्री
अमावस्येला संपतो, म्हणून हा पक्ष संपल्यानंतर आपल्या आईच्या वडिलांचे श्राद्ध (दुहितृ
कार्य) करावे, असे शास्त्रात सांगितले आहे.
==============
परमपूज्य श्री गुरुदेवांनी साक्षात्कार झालेल्या व्यक्तींबद्दल केलेले मार्गदर्शन-
"आमच्या पश्चात कावळा शिवणे हा प्रकार नसतो. प्रचंड त्रास सोसून धर्म शिकवायला
हे येत असतात व त्याच कामात विलीन होत असतात. ईश्वरी साक्षात्कार झाला म्हणजे मरण येत
नसते. मृत्यू हा भागच नसतो. पुन्हा आकारात येतात. जवळजवळ शंभर वर्ष काळ लोटल्यानंतर
पुन्हा येणे असते....!"
संदर्भ- "गुरु साक्षात् परब्रह्म- डॉ.विकास मांडके
=============
शास्त्र आणि भावना-
"घरातील एखादी व्यक्ती मृत झाल्यावर तिचा फोटो जास्तीत जास्त एखादा महिनाच भिंतीवर
लावा.त्यानंतर तो फोटो केवळ त्या व्यक्तीच्या श्राद्ध-पक्षाच्या दिवशीच पुनः एखादा
दिवस भिंतीवर लावावा.इतरवेळी मृत व्यक्तीचे फोटो घरात जर सतत कायमचे नजरेसमोर ठेवले
तर तुम्हीच त्या व्यक्तीच्या आठवणी आल्याने दुःखी होऊन जाल व त्या दुःखामुळे तुमचे
आयुष्यही कमी होऊन जाईल.खूप माणसे त्यांच्या मृत मात्या-पित्यांच्या तसबिरी देवामध्ये
ठेवतात, तर काही इतरत्रही घरामध्ये भिंतीवर देवाच्या तसबिरी शेजारी लावून ठेवतात व
देवाच्या पूजेच्या वेळी त्या मात्यापित्यांच्या तसबिरीलाही हार घालतात, उदबत्ती-निरांजने
ओवाळतात.इतकेच नव्हे तर गंध-कुंकूही लावीत बसतात, हे फार चुकीचे आहे.अशाने मृत व्यक्ती
पुनः साकार होऊन तुमच्या जीवनात पुनः येऊन अडथळे आणू शकतात.तेव्हा तुम्ही कोणीही मृत
व्यक्तींचे फोटो घरामध्ये कायमचे आजिबात लावू नका व हे इतरांनाही समजावून सांगा.
||श्री गुरुदेवदत्त||
संदर्भ-|| भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ,मुंबई ||
अमृतकण क्र-१९७(पृष्ठ क्र८).
दिनांक-१५/६/१९९६
।। श्री गुरुदेव दत्त ।