आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा



।। श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ।।


सद्गुरूदर्शनामुळे भक्ताला विषयनिरपेक्ष आनंदाचा अनुभव येतो. ह्याचा अर्थ जरी प्रथमतः त्याला कळला नाही तरी त्याच्या जीवनात योग्य बदल घडून यावयास सुरुवात होते. सद्गुरूदर्शनास जात जाता त्याचा सद्गुरूंच्या इतर भक्तांशी परिचय वाढतो. त्याला सद्गुरूंच्या कार्याची अधिक माहिती व्हावयास लागते. आणि ह्या सर्वांची भक्तावर योग्य संस्कार होण्यास मदत होते. सद्गुरूंची वचने त्याच्या कानावरून जातात आणि एकंदरीतच सद्गुरू, त्यांचे कार्य आणि त्यांचे शिष्य ह्याविषयी अधिक विचार यावयास लागतात.

असे व्हावयास लागणे म्हणजेच एका अर्थी सत्संग घडणे होय. ज्याची इच्छा असेल त्याला सत्संग सतत घडू शकतो. म्हणजे असे की, जेव्हा तो एखाद्या भक्तसमुदायात असतो तेव्हा तो अध्यात्म, परमेश्वर, सद्गुरू इत्यादींबद्दल आपणाला माहीत असते ते दुसऱ्याला सांगू शकतो, किंवा दुसरा कोणी सांगत असेल ते स्वतः ऐकू शकतो. एखादे वेळी भक्त जर दुसऱ्या भक्ताबरोबर असेल तर ते दोघे एकमेकांशी अध्यात्माविषयी चर्चा करू शकतात. आणि जेव्हा भक्त एकटाच असेल तेव्हा तो त्याच्यात असलेल्या सत् शी अनुसंधान साधण्याचा प्रयत्न करू शकतो.

वरील प्रकारे सत्संग घडायला लागला की, गुरुदर्शनाचा परिणाम होऊ लागला आहे असे भक्ताने मानण्यास हरकत नाही. अशा तऱ्हेने जसजसा अधिकाधिक सत्संग घडू लागतो तसतसे भक्ताच्या मनातील विचारांचे काहूर कमी होऊ लागते. आणि मन निःसंशय व्हावयास लागते. त्याची संगत बदलते मित्र-मैत्रिणी बदलतात, विचार बदलतात आणि वर्तणूकही सुधारू लागते. एकंदरीतच भक्त सुखाच्या मार्गाकडे ओढला जातो.


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy