शिवोपासना व रुद्राभिषेक
।। श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ।।
भगवान शंकर व त्यांचे स्वरूप- भग म्हणजे ऐश्वर्य; भगवान म्हणजे ऐश्वर्यवान ! शं करोति
इति शंकरः | शं म्हणजे कल्याण. कल्याण करणारे शंकर भगवान असा खरा शंकर शब्दाचा
अर्थ आहे. देवदेवतांमध्ये भगवान शंकर ही मुख्य देवता आहे. प्रत्यक्ष शिवाचे रूप हे
निर्गुण स्वरूपाचे आहे. परंतु उपासनेसाठी त्याचे रूप लिंगस्वरूपाचे आहे. भगवान शिव
हे आपल्याला लिंगरूपाने दर्शन देत असतात. शिवोपासना करण्य्याचे विविध मार्ग आहेत. रुद्राभिषेक
करणे, शिवलीलामृताचे पठण करणे. “नमःशिवाय” हा जप करणे, श्रावणी सोमवारचा,
महाशिवरात्रीचा उपवास करणे इत्यादी. ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी भगवान शंकर ज्योतीच्या
तेजोमय रुपात शिवलिंगात प्रगट झाले आहेत. ज्योतिर्लिंग याचा अर्थ आत्मज्योत असा आहे.
ही उपासनेसाठी आहेत. शिवलिंगाची उपासना म्हणजे लिंगावर रुद्राभिषेक करणे.
भगवान शंकराला अभिषेक अतिशय प्रिय आहे. सतत अभिषेकाने तो लवकर प्रसन्न होतो. म्हणून
जेथे जेथे शंकराची पिंडी असेल तेथे पाण्याची संतत धार पडावी अशी व्यवस्था केलेली असते.
शिवलिंगाच्या अभिषेकाचे पाणी जाण्याचे टोक उत्तरेकडे असते. कारण ते उत्तरेकडे असणाऱ्या
गंगानदीकडे जाते, ही भावना असते.
रुद्र हा वेदमंत्र आहे. रुद्र म्हणजे द्रवणे. स्तुती मनुष्याप्रमाणे ईश्वरालाही प्रिय
आहे. आपल्या स्तुतीने भगवंताला पाझर फुटला पाहिजे. एकदा त्याचे मन द्रवले की आपण संकटातून
वाचतो. त्याचा आपल्याला आधार मिळतो. पुष्कळ लोकांच्या जीवनात अडथळे येतात व प्रगती
होत नाही. अशा वेळेला रुद्राभिषेक केला की अडचणीतून मार्ग निघतो.
रुद्र आवर्तनातील सर्व श्लोक संस्कृतमध्ये आहेत. रुद्र म्हणण्याची विशिष्ट लय व पद्धती
आहे. त्याचप्रमाणे त्याचे उच्चार करावे लागतात. म्हणून रुद्राभिषेक हा जाणकार ब्राह्मणांकडून
करून घ्यावा लागतो.ते वेदमंत्र असल्याने त्यात शक्ती आहे.योग्य पद्धतीने उच्चार झाल्यावर
ती शक्ती कार्यरत होते व अनुभवाला येते.
रुद्राभिषेक घरात, बाहेर कोठेही, क्षेत्राचे ठिकाणी केव्हाही केला तरी चालतो. हा अगोदर
ठरवून करावा. विशेषतः प्रदोष, सोमवार, एकादशी अशा दिवशी केलेला उत्तम. तुमच्या सवडीने
महिन्यातून वरीलपैकी कोणताही एक दिवस ठरवा व रुद्राभिषेक करा. त्याचा तुम्हाला हमखास
फायदा मिळेल.
रुद्र हा एकदा ऐकून भागत नाही. तो पुन्हा पुन्हा ऐकावा लागतो. म्हणजे अडथळे दूबर होऊन
प्रगती साधली जाते. रुद्र हे वेदमंत्र असल्याने त्याचे जसजसे उच्चारण होते तसतशा देवता
तिथे उत्पन्न होतात व लोककल्याण करतात.
रुद्राभिषेकाचे फायदे -
अ) घराण्याचे दोष कमी होणे- कुठल्याही व्यक्तीच्या मृत्यूपूर्वी सर्व
इच्छा पूर्ण होतातच असे नाही. त्यातूनच पितृदोष निर्माण होतात. पितृदोषांमुळे घराणीच्या
घराणी नाहीशी झाल्याची उदाहरणे आहेत. कुंडलीत पितृदोष हे राहूचे दोष या नावाने दर्शवले
जातात. राहूचे दोष इतके वाईट असतात की, जगणे मुश्किल करतात. काही घरात सर्व सुखसोई
असूनही अस्वस्थता असते. काही घरात काही कारण नसताना सतत भांडणे होतात. काही घरात जेवण
तयार असून शांत रितीने खायला मिळत नाही. यासर्वांवर उपाय म्हणजे "शिवोपासना"
करणे.
ब) मनोविकार कमी होणे- रुद्र आवर्तने ऐकल्यावर कालांतराने मनोविकार
कमी होतात. काही कारण नसताना हातवारे करणे, मनाशी पुटपुटणे, आॅफिसमध्ये बसल्याबसल्या
दातावर पेन्सिल आपटणे, चटईवर बसल्याबसल्या काड्या काढणे, पुडीचा फेकून दिलेला वर्तमानपत्राचा
कागद वाचत बसणे, एकाच गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करणे किंवा पुन्हा पुन्हा उच्चार
करणे हे सर्व सूक्ष्म मनोविकारांचे प्रकार आहेत. ह्या सूक्ष्म मनोविकारांची योग्य दखल
घेतली नाही तर ते विकार पुढे पुढे वाढत जातात. तुमच्याकडे जेव्हा लघुरुद्र/ महारुद्र
करता, तेव्हा तुम्हाला समजत जरी नसले तरी ते ऐकावे, श्रवण करावे. यामुळे हे सूक्ष्म
मनोविकार वाढत नाहीत व असतील तर पुढे नाहीसे होतात.
क) पाऊस पडणे- पाऊस पडत नसेल तर सामूदायिक प्रार्थनेचा जरुर उपयोग
होतो व ईश्वरी शक्ती आपले कार्य करते. पूर्वीच्या काळी पावसासाठी यज्ञही करीत असत.
शिवलिंगावर अभिषेक करत असत. तसा अभिषेक म्हणजे पाण्याची संततधार आपण ठेवली तरी पाऊस
पडण्यास मदत होते. परंतु अशी पाण्याची संततधार पाऊस पडेपर्यंत ठेवायला लागते.
ड) भूकंपापासून रक्षण होणे- सध्या लहान मोठे भूकंप सतत खुप ठिकाणी
होत आहेत. जेथे जमीन पोकळ असते तेथे असे भूकंप होत असतात. पोकळ जमिनीतून स्वयंभू शिवलिंगे
बाहेर येत असतात. म्हणून ती पोकळ जमीन टणक होण्यासाठी आपल्याकडे रुद्राभिषेक करुन शिवाला
शांत करण्याची पद्धत आहे. तेव्हा, तुम्ही सर्वांनी आपापल्या घरी अथवा देवदेवळातून रुद्राभिषेक
जरुर करावेत. त्यामुळे तुमच्या सर्वांचे भूकंपापासून रक्षण होईल. भूकंपासारख्या संकटातून
वाचण्यासाठी रुद्राभिषेक हा एक उपाय आहे. स्वयंभू शिवाचा विचार केला तर त्याच्या लिंगाचे
एक टोक जरी वर दिसत असले तरी दुसरे टोक थेट भूगर्भात शेवटपर्यंत असते. त्यामुळे सतत
शिवावर धार करुन लघुरुद्र केल्यास व शिवोपासना केल्यास जमिनीला टणकपणा येतो व भूकंपाचा
त्रास कमी होतो. ज्या ठिकाणी स्वयंभू शिवलिंगे आहेत त्या ठिकाणी ही उपासना केल्यास
ह्याचा अनुभव आल्याशिवाय रहात नाही. स्वयंभू याचा अर्थ जमिनीतून आपोआप वर आलेल. आपल्या
स्तुतीने त्याला पाझर फुटला पाहिजे. एकदा त्याचे मन द्रवले की, आपण संकटातून वाचतो,
याबाबत श्रद्धाही बाळगली पाहिजे. व्यक्तीपासून राष्ट्रापर्यंत येणा-या अघटित संकटावर
रुद्राभिषेक हा खात्रीचा उपाय आहे.