आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


*श्रीगुरुकृपेचा सत्संग*


।। श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ।।



सर्व साधारणपणे सत्संग हा महिन्यातून एकदा एकत्र येऊन सर्व सत्संग मंडळे साजरा करतात. मात्र अनेकदा सत्संगा व्यतिरीक्त कामाच्या व्यापाने म्हणा किंवा प्रापंचिक अडचणींमूळे परमपूज्य श्री गुरुदेवांच्या ग्रंथांचे वाचन करणे सर्वांनाच शक्य होते असे नाही. याकरिता एक *नियम/ उपासना/ उपक्रम* जे काही नाव देता येईल ते द्यावे आणि या उपासनेला प्रारंभ करुन तो आजीवन पाळण्याचा प्रयत्न करावा.


संकल्पना- आठवड्यातून एक दिवस ज्या दिवशी घरातील सर्वांना सुटी असते (उदा- रविवारी) किंवा आपल्या सोयीनुसार दिवस निवडावा. सर्वांनी घरातील परमपूज्य श्री गुरुदेवांच्या फोटोसमोर सत्संगाला बसतो त्याच पद्धतीने बसावे. (सर्व संपर्क माध्यमे सक्तीने बंद ठेवून बसावे) त्या दिवशी एक वेळ निश्चित करावी. (शक्यतो ती दुपारी ४:०० ते ५:०० असल्यास उत्तम! कारण या वेळेत परमपूज्य श्री गुरुदेव व्यक्तस्वरुपात असताना देवस्थानातून बाहेर जात असत.)
१) या वेळेत प्रथम श्रीगुरुदेवांचे स्मरण करुन त्यांना आपल्या घरी येण्याची प्रार्थना करावी.
२) नंतर गुरुवाणीची प्रस्तावना वाचावी. (जुनी असल्यास अधिक सखोल माहिती मिळेल.)
३) गुरुवाणीच्या पहिल्या भागापासून वाचनास प्रारंभ करावा. घरातील प्रत्येक सदस्याने ठरवून घेऊन किमान एक एक पान वाचावे. इतरांनी ते श्रवण करावे. एक तास झाल्यावर जेवढा भाग वाचून झाला तेथेच थांबावे. (गुरुवाणी वाचून झाल्यानंतर अमृत कलश, सद्गुरु संवाद असो एक एक क्रमाने उपासनेला दृढ चालवावे)
४) यानंतर परमपूज्य श्री गुरुदेवांचे "शामवर्ण देहकांती" हे स्तोत्र म्हणून समारोप करावा.
५) यावेळेत घरात कोणीही आल्यास त्याला ऐकण्याची विनंती करावी. अथवा कोणी येणार असल्यास ५ नंतरची वेळ द्यावी.
६) कोणत्याही प्रकारे उपासनेत व्यत्यय येतील अशा गोष्टी टाळाव्यात.


परमपूज्य श्री गुरुदेवांच्या कृपेने सातत्याने १५ हून अधिक वर्ष ही उपासना चालू राहिल्याने झालेली गुरुकृपा-
१) परमपूज्य श्री गुरुदेवांच्या वाणीला वेदवाणीचा अधिकार आहे. अर्थातच गुरुमूखातून आलेले सर्व ग्रंथ हे वेदतुल्य! त्यामुळे गुरुवाणी, अमृत कलश, धर्मदर्शन, सद्गुरु संवाद, अमृत कण हे सर्व वेदवाणीचा अधिकार असलेली संपदा!
२) याचा उच्चार वेदवाणीचाच परिणाम घरात करतो. उपासनेत सातत्य असल्यास हा बाहेरील व्यक्तीला पटकन जाणवतो.
३) घराबाहेरील कोणी आगंतुक येऊन ऐकत बसल्यास त्याच्या मनातील शंकांचे तात्काळ समाधान त्यास मिळते. (हा गेल्या १५ हून अधिक वर्षांचा अनुभव आहे)
४) परमपूज्य गुरुदेवांची ग्रंथसंपदा वाचन केल्याने दैनंदिन जीवनातील कळत नकळत होणा-या चूकांवरील अचूक मार्गदर्शन वाचन करताना मिळते त्यामुळे अनेक गोष्टी न बोलता घरातील सर्वांना समजतात व त्याप्रमाणे आचरण करण्याची प्रेरणा होते.
५) प्रसार सेवेसाठी गेल्यावर याचा निश्चितच फायदा होतो.
६) परमपूज्य श्री गुरुदेवांशी एक प्रकारे अनुसंधान राहिल्याने कोणीतरी अचानक विचारलेल्या शंकांचे समाधान गुरुदेवांच्या कृपेने तात्काळ केले जाते.
७) लहान मुलांवर वेगळे संस्कार करावे लागत नाहीत.
८) श्रवण केल्याने पुढच्या भागात काय? अशी उत्सुकता लागून राहते व ओघानेच गुरुवाणी वाचनाची आवड लागून घरात त्यावर चर्चा होऊ लागते.
९) सातत्याने वाचन करत राहिल्याने आपले विचारसुद्धा परमपूज्य गुरुदेवांना अपेक्षित असेच तयार होतात.
१०) विवेक येतो.

याचे सांगावे तितके लाभ कमी आहेत. कारण ही गुरुकृपा आहे. तिचे शब्दात वर्णन करणे अशक्यच! महिन्यातील सुटीचे औचित्य साधून या उपासनेला प्रारंभ करावा आणि गुरुकृपा अनुभवावी.


अधिक माहिती- श्री दीपक कानडे: 09763776349


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy