आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


।।श्रीगुरुनिष्ठा।।

।। श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ।।


दुर्लभ मानुष जन्म है, देह न बारम्बार,
तरुवर ज्यों पत्ता झड़े, बहुरि न लागे डार।।

या जगात सर्वात दुर्लभ काय तर मनुष्य देह! त्याहून दुर्लभ काय? तर भारतात जन्म! त्याहून अवघड काय? तर योग्य गुरुंची प्राप्ती! हजारो योनी भटकंती करुन प्राप्त झालेल्या नरदेहाचं सार्थक कशात आहे? तर परमेश्वरप्राप्तीमध्ये! आणि परमेश्वरप्राप्ती कशी होईल तर ती केवळ सद्गुरुंच्या कृपेनेच! ही कृपा कशी प्राप्त होईल तर केवळ "श्रीगुरुंवरील निष्ठेमुळे"! 


गुरुवाक्य मज कारण । मातें न करी निर्वाण । 
वेंचीन आतां माझा प्राण । गुरुनिरोप करीन मी ।।

श्रीगुरुचरित्रातील या ओवीची परमपूज्य गुरुदेवांनी अनेकदा पुनरावृत्ती केली आहे. याचं कारण एकच! अध्यात्मिक प्रगतीसाठी हवी असते ती गुरुनिष्ठा! 


कलीयुगी अधर्म वृद्धी पावले म्हणोनि श्रीगुरु गुप्त झाले ।
भक्तजनांला जैसे पाहिले तैसेचि भेटती अद्यापि ।।
कलीयुगाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन परमपूज्य गुरुदेवही गुप्त झाले आहेत! परंतु लौकिक मते आम्ही जातो । ऐसे दृष्टांती दिसतो । भक्त जनांघरी वसतो । निर्धार धरा मानसी ।। या वचनाला जागून जो श्रद्धेने व निष्ठेने भक्ती करेल त्यास योग्य त्या ठिकाणी योग्य त्या रुपात दर्शन देतच आहेत!  मुळात श्रद्धा म्हणजे काय? तर गुरु आणि वेदांत वाक्यांवर दृढ विश्वास होय! असं श्रीमद्आद्य शंकराचार्य सांगतात. याचाच अर्थ जे जे म्हणून परमपूज्य गुरुदेवांनी मार्गदर्शन केलेले आहे त्या सर्वांवर अतिशय विश्वास ठेवणे! मग ती गुरुवाणी असो, अमृतकण असो, अमृतकलश असो वा धर्मदर्शन आणि सद्गुरुसंवाद असो! यांमधील वाक्यांवर विश्वास ठेवणे म्हणजे श्रद्धा! हे माझ्या उद्धाराच्या दिशेने ठेवलेलं पहिलं पाऊल! त्या प्रमाणे आचरण हा स्वतंत्र विषय आहे. सध्याचा वाढत जाणारा कलीचा प्रभाव पाहता विरुद्धाचरणाचं वातावरण सर्वत्र दिसून येतं आहे, त्यामुळे धर्माविरुद्ध आचरण, धर्माला विरोध म्हणजेच आधुनिकपणा असा मायावी प्रगतीचा बागलबुवा निर्माण झालेला दिसतो! पण हा मार्ग मोक्षाकडे किंवा अध्यात्मिकप्रगतीकडे नेणारा नाही याची जाणीव परमपूज्य गुरुदेवांनी अनेकदा आशीर्वादातून करुन दिलेली आहे! यात कली नानाप्रकारची रुपे धारण करुन बुद्धी भेद करण्याचा सतत प्रयत्न करत असतो. यावर अधिक व्यापक विचार केला तर परमपूज्य गुरुदेव हे कुणी सामान्य व्यक्ती नव्हेत! मानवी देहात ईश्वरी शक्ती प्रकट झाल्यानंतरची "नीलवर्ण कांती" आपण प्रत्यक्ष अनुभवली असताना त्यांच्या महात्म्याचे वर्णन करण्यासाठी शब्दांना निमंत्रण देणं हे त्यांच्या तेजालाच मर्यादित केल्यासारखं होईल! 
गुरु ही केवळ व्यक्ती नसून ते तत्त्व आहे! या सृष्टीच्या उत्पत्तीपासून आजतागायत वेदांनाही न कळलेले हे तत्त्व आपल्या सहवासात व्यक्त रुपात मार्गदर्शन करीत होते व आज तेच कार्य ते अव्यक्तांत राहून अखंडित करत आहे व "श्रीगुरुंचे चरित्र आजमितीपर्यंत चालू असल्याची साक्ष ते पावलोपावली देत आहे! सत्पुरुषांच्या जन्मभूमीला महत्त्वं नसतं तर कर्मभूमीला असतं हे परमपूज्य गुरुदेवांनी जरी सांगितलं असलं तरी आमची भौतिक गोष्टीत भव्यता मोजणारी तोकडी दृष्टी अधिक व्यापक करण्यासाठी हे मुद्दाम सांगावं लागतं की "पारनेर तालूक्यातील रायतळे गावातील छोट्याश्या खोली पासून त्रिभूवनसुंदर अशा वेदांत आणि श्रीदत्तात्रेय निवास व महालक्ष्मी मंडपापर्यंतचा प्रवास हा त्या शक्तीच्या अस्तित्वाचीच साक्ष आहे!" याकाळात देवस्थानवर संकटे आली नाहीत असं मुळीच नाही! पण ती या शक्तीनेच वेळोवेळी परतवून लावली आहेत! 
हे सर्व सांगायचा उद्देश हाच की परमपूज्य गुरुदेव हेच आपले श्रद्धा स्थान असायला हवं आणि आपल्या निष्ठा देखील त्यांच्याच चरणी! आजची माझी भौतिक सुबत्ता ही गुरुदेवांचीच कृपा आहे यात कोणाचेही दुमत असता कामा नये. हे सर्व ज्यांच्या कृपेने प्राप्त झाले त्या गुरुदेवांची शिस्त आणि पावित्र्यात कोणत्याही प्रकारे तडजोड करणे म्हणजे त्यांच्या शिस्तीला आणि ईश्वरी शक्तीला आव्हान देणेच आहे हे लक्षात यायला हवे! मग ते वेदकार्य असो वा व्यवस्थापन असो किंवा प्रसार सेवा असो! श्रीदत्तदेवस्थान म्हटलं की फक्त "परमपूज्य श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराज" हेच नाव आठवायला हवं तरच त्याला गुरुनिष्ठा म्हणता येईल! याचं कारण संस्थापक विश्वस्त म्हणून आजही परमपूज्य गुरुदेव हेच या ठिकाणी विराजमान आहेत! 
सूर्य मावळला की चोरांना उधाण येतं! पण याहून दुसरं अज्ञान ते कोणतं म्हणावं! सूर्य मावळतो म्हणजे तो केवळ आपल्या दृष्टीच्या पलिकडे जातो नष्ट होत नाही. म्हणजेच सूर्य मावळल्यावर चोरी करणं हे मांजरानं डोळे मिटून दूध पिण्यासारखं आहे. पण लक्षात असू द्या श्रीमद्भगवद्गीता ही आधी सूर्याला सांगितली गेली आहे, मनुष्यांचे अनेक जन्म हे सूर्यानेच पाहिलेले आहेत. केवळ याच नव्हे तर गेल्या कित्येक जन्मातील कर्मांचा तो साक्षीदार आहे. त्यामुळे मानवी न्यायालयात निकाल विकत घेणारी माणसं हे सोयीस्करपणे विसरतात की त्यांच्या कर्मांची नोंद भगवंतांच्या न्यायालयातही सुरु आहे आणि योग्य वेळी निकाल नव्हे तर तो न्याय हा देतच असतो! या आधी ही त्याने अनेक उदाहरणे दिलीच आहेत! काहींचे दिवस भरले तर काहींचे १०० अपराध भरण्याची तो वाट पाहत असेल! 
("आमच्या कोर्टात केसेस भरपूर असतात पण ज्या दिवशी केस बोर्डावर येते त्याच दिवशी निकाल असतो"-परमपूज्य श्रीगुरुदेव)
परमपूज्य गुरुदेवांनी आपल्या तपश्चर्येने श्रीदत्तात्रेय निवासात ईश्वराचे अधिष्ठान निर्माण केले आहे तसेच पावित्र्य आणि चैतन्य अबाधित राखण्यासाठी व भक्तांना आधार मिळावा म्हणून काही कडक नियम घालून दिलेले आहेत.आपल्या अनंत पीढ्या उद्धरल्या जाव्यात या करिता निर्माण झालेले हे अधिष्ठान व त्याचे पावित्र्य टिकवणं हे आपलं कर्तव्य नव्हे का? 
गुरुवाणी, अमृतकलश, धर्मदर्शन आणि सद्गुरुसंवाद यातील सद्गुरुंच्या वाणीला वेदवाणीचा अधिकार आहे तर श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे विश्रांतीसाठी असताना परमपूज्य गुरुदेवांनी श्रीदत्तदेवस्थानावर येणा-या भावी संकटाची स्पष्ट शब्दात दिली त्या शब्दांना वेदवाणीचा किंवा त्या ही पुढे जाऊन श्रीगुरु आज्ञेचा अधिकार नाही का? की पापी अश्वत्थात्म्याच्या मण्याला आपल्या मुकूटात कोंदून मण्याच्या रुपाने त्याचे पाप डोक्यावर मिरवणा-या युधिष्ठिराप्रमाणे कुणाचे पाप तर आपण मिरवत नाही ना? प्रत्यक्ष पाप न करता वर्णाश्रमधर्माची पायमल्ली करुन देवस्थानाच्या वेदकार्यास व श्री दत्तदेवस्थानाच्या वैभवास कलंक लावणा-या कोण्या "मायाव्याला" माझी अजाणतेपणाने साथ तर नाही ना? एखादे कार्य मला कितीही महत्वाचे वाटत असले तरी गुरुंचा त्याला विरोध असल्यास माझ्यादृष्टीने ते निषिद्ध कर्म आहे का? तसेच माझ्या कळत नकळत घडणा-या कृतीने परमपूज्य गुरुदेवांचे त्यागमय जीवन आणि त्या त्यागांच्या समिधांवर सुरु असलेल्या धर्मयज्ञात अडथळा तर निर्माण होत नाही ना? यावर आत्मचिंतन जरुर व्हावे! 
गुरुमूर्ति स्मरेन्नित्यं, गुरुनाम सदा जपेत् । गुरोराज्ञां प्रकुर्वीत, गुरोरन्यन्न भावयेत् ॥१८॥-श्रीगुरुगीता
-(श्रीगुरुमूर्तीचे नित्य स्मरण करावे, गुरुनामाचा सदा जप करावा, श्रीगुरुची आज्ञा मनःपूर्वक कटाक्षाने पाळावी, गुरुखेरीज मनात अन्य भावभावना ठेवू नये.) तेज प्रकट झालं की त्यावर उड्या मारणारे पतंगसुद्धा जन्माला येतात आपण मात्र तेजाचीच कास धरली पाहिजे. कारण तेज शाश्वत आहे पतंग नव्हे! मनुष्य देह हा तेजात विलीन होण्यासाठी असतो पतंगांसोबत मैत्री करण्यासाठी नव्हे. 
आज्ञा गुरुणां ह्यविचारणीया ।।
श्रीगुरुंनी दिलेली आज्ञा ही शिरोधार्य मानावी तिच्यावर शंका उपस्थित करु नये!
कारण शिवे क्रुद्धे गुरुस्त्राता, गुरौ क्रुद्धे शिवो न ही । तस्मात्सर्वप्रयत्नेन, श्रीगुरुं शरणं व्रजेत् ॥४४॥-श्रीगुरुगीता
(भगवान शंकरांना क्रोध आला, ते साधकावर रागावले तर गुरुभक्ताचा पाठीराखा गुरू असतात, पण गुरुच रुष्ट झाले तर मात्र आपला त्राता त्रिभुवनात कॊणी नाही. म्हणून सर्वतोपरी प्रयत्नांची पराकाष्ठा करून गुरुशरणागति पूर्णपणे पत्करण्याचा प्रयत्न करायला हवा.)
आता राहता राहिला प्रश्न कोण काय म्हणेल? याचा तर "निर्लज्जम् गुरुसन्निधौ" । "ज्याला आपलं दैवत गुरु आहे असं वाटतं त्याने अन्य कशाचाही विचार करायचा नाही" असं परमपूज्य गुरुदेवांनीच मार्गदर्शन केलेलं असताना हा प्रश्न निरर्थकच! 
गोचिडं ही गायीच्या कासेपाशीच असतात त्यांना रक्ताचीच चव कळते दुधाची नाही! उद्या इतकं सगळं मार्गदर्शन करुनही जर आपल्या वागण्यात बदल झाला नाही तर तो दोष आपला आहे गुरुदेवांचा नव्हे. परीसाने लोखंडावर रागावलं तर चालतं पण लोखंडाने परीसावर रागावणं ह्या त्याच्या उद्धाराच्या वाटेतला अडथळा बनतं! म्हणून
सर्वपापविशुद्धात्मा, श्रीगुरोः पादसेवनात् । 
देही ब्रह्म भवेद्यस्मात्, तत्कृपार्थं वदामि ते ॥११॥
(श्रीगुरुचरणाच्या सेवेने अंतःकरण सर्व पापांपासून शुद्ध होऊन जाते. त्यामुळे देहधारी जीव ब्रह्मरूप बनतो. त्या गुरुकृपेचे तत्त्व, तुझ्यावर गुरुकृपा व्हावी म्हणून मी तुला कथन करतो.)
।।श्रीरामकृष्णार्पणमस्तु।।
"श्रीरामकृष्ण" चरणरज


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy