आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


।। श्रीगुरुसेवा ।।

।। श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ।।

प्रसंग तसा ब-यापैकी जुना आहे. परमपूज्य गुरुदेव आनंद यात्रेनिमित्त पंढरपूर मुक्कामी असतानाचा हा प्रसंग ! परमपूज्य श्री गुरुदेवांना बासरी वादन अत्यंतप्रिय ! म्हणून परगावहून कोणी एक भक्त रात्री ८/९ च्या सुमारास परमपूज्य गुरुदेवांसमोर बासरीवादनाची सेवा करण्यासाठी येणार होते. परंतु काही कारणास्तव ते ठरलेल्या वेळेत पोहोचू शकले नाहीत. बराच वेळ वाट पाहिली आणि गुरुदेवांच्या विश्रांतीची वेळ झाल्याने गुरुदेव विश्रांतीसाठी त्यांच्या खोलीत गेले. काही वेळात ती बासरीवादन सेवा करणारी व्यक्ती तेथे आली. तेव्हा सेवेक-यांनी गुरुदेव आता विश्रांती घेत आहेत असे सांगून त्यांना परत जाण्यास सांगितले. दुःखी होऊन ती व्यक्ती परत जाण्यास निघाली. हा प्रसंग भक्तवत्सल परमपूज्य गुरुदेवांनी जाणला आणि त्या व्यक्तीस परत पाठवणा-या सेवेक-यास हाक मारुन बोलावले व सांगितले की-" बासरीवादनाची सेवा करण्यास आलेली व्यक्ती ही माझी सेवा करण्यासाठी आलेली होती. तिला परत जायला सांगणारे तुम्ही कोण?" असे सांगून त्या व्यक्तीस परत बोलावून तासभर बासरीवादन श्रवण करुन मग परमपूज्य गुरुदेव विश्रांतीसाठी गेले. सेवा करण्यासाठी आलेली व्यक्ती ही आनंदीत होऊन निघून गेली.
हा प्रसंग "सेवा" म्हणजे काय व तळमळीने सेवा करण्याची इच्छा असलेल्यांची दखल गुरुदेव कशी घेतात याचं उत्तम उदाहरण होय. आता या प्रसंगावरुन एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे सेवा देणारे सुद्धा गुरुदेव आणि सेवा करवून घेणारे सुद्धा गुरुदेवच! अर्थातच परमपूज्य गुरुदेवांची सेवा/कार्य करण्यासाठी कोणा मध्यस्थाची गरज नाही. खरी आर्तता किंवा तळमळ ही नक्कीच परमपूज्य गुरुदेवांपर्यंत पोहोचतेच यात शंका नाही. गरज आहे ती स्वयंप्रेरणेने कार्याला लागण्याची. "जो राम होऊन आला होता जो कृष्ण होऊन आला होता तोच आता रामकृष्ण बनून आलेला आहे." हे श्री रामकृष्ण परमहंसांचे वचन परमपूज्य गुरुदेवांनी अनेकवेळा उच्चारले आहेत. त्यांचे कार्य पहिले तर संपूर्ण भारतभर आणि विश्वाच्या कानाकोप-यात त्यांचे कार्य त्यांच्या शिष्यांनी विस्तारले ते ही कोणत्याही प्रसिद्धी माध्यमाशिवाय ! अनेक मठ अनेक सामाजिक संस्था कित्येक मोफत दवाखाने सुरु आहेत. प्रचंड ग्रंथ संपदा विक्री होत आहे ती कुठेही वाच्यता न करता!!
परमपूज्य गुरुदेवांना देखील वर्तमानपत्रे वा दूरदर्शनवर कार्याच्या बातम्या प्रसिद्ध करणे वा श्री दत्तदेवस्थानात होणा-या सेवांची माहिती कोणत्याही वार्तापत्रात प्रसिद्ध करणे मान्यच नव्हते. खरा शिष्य हा स्वयंस्फूर्तीने कार्य करतो. प्रसंग आणि काळाची पाऊले ओळखून वागतो. सेवा म्हणजे ठराविक ठिकाणी ठराविक दिवशी चार लोक एकत्र आल्यावरच सेवा केली जाऊ शकते हा केवढा मोठ्ठा गैरसमज? प्रामाणिकपणे अनोळखी माणसाला गुरुदेवांबद्दल सांगितलेली खरी माहिती सुद्धा सेवा आहे. परमपूज्य गुरुदेवांचे मार्गदर्शन प्रसंगावधान राखून योग्य वेळी आपल्या नोकरी वा परिचितांमध्ये रुजविणे ही सेवाच आहे .एखाद्या वेदपाठशाळेस शिधा पुरवणे सेवा आहे, शक्य त्या मार्गांनी श्रीदत्तदेवस्थानचा पैसा वाचविणे ही सुद्धा सेवाच आहे. श्री दत्तदेवस्थानचा नावलौकिक वाढेल असे कोणतेही कार्य करणे "सेवाच" आहे. आपल्याकडील परमपूज्य गुरुदेवांनी विश्वासाने पुढील पिढीसाठी दिलेला ठेवा मग ते मार्गदर्शन,फोटो,व्हिडीओ हे सर्वांसाठी खुले करणे ही देखील सेवाच आहे ! प्रत्येकवेळी सेवेसाठी ओळखपत्र,सत्संग मंडळ किंवा सेवा समितीची गरज असतेच असे नाही. परमपूज्य गुरुदेवांच्या कार्याबद्दल ओढ,तळमळ अशक्य गोष्टीसुद्धा शक्य करतात. याचा अनुभव प्रत्येक कार्यकर्त्याने घेतलाय !
सेवा हा खुप व्यापक शब्द आहे.त्याला ठराविक ठिकाणे किंवा ठराविक वेळेच्या बंधनात अडकवून आपण त्याला संकूचित तर करत नाही ना? किंवा मर्यादित करत नाही ना? याचं चिंतन जरुर करावं!



।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy