“श्री रामदास नवमी”
||श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||
मस्तकी धरावा | अवघा हलकल्लोळ करावा ||
मुलुख बुडवावा की बडवावा | स्वराज्याकारणे ||
“स्वराज्य” आणि “स्वैरराज्य” यांच्या सीमारेषेवर उभे राहून
आज जर “श्री दास नवमीकडे” पाहिलं तर पहिलं लक्ष वेधावं वाटतं ते “देव
मस्तकी धरावा” याकडे! याचं कारणं ही तसंच आहे. समाजाची चाल पाहिली तर ती देव
मस्तकी नव्हे तर पायदळी तुडवण्याची आहे असं खेदानं म्हणावं लागतं. मुळात देव ही संकल्पना
आधी स्पष्ट करून घेऊ. मला समर्थ रामदासांइतकी प्रतिभा नाही परंतु देव आणि देश आणि या
एकाच नाण्याच्या दोन बाजू. धर्म ही त्याची कडा जी देशाला आणि देवाला एकसंध ठेवते. देश
टिकला तर देव आणि धर्म! आणि धर्म असेल तर देश! समर्थांचं देखील हेच समीकरण असावं असं
वाटतं.
धर्म हा मनुष्याच्या स्वैराचाराला मर्यादा घालतो, स्वैराचाराला मर्यादा आल्याने मनुष्य
“विवेकी” बनतो, विवेकी मनुष्य कर्तव्य बुद्धीने कार्य करतो आणि कर्तव्य
बुद्धीने केलेले प्रत्येक विधायक कार्य हे देशाच्या आणि समाजाच्या कल्याणासाठीच असते,
म्हणून समाजात धर्माचे अधिष्ठान अत्यंत महत्वाचे आहे. म्हणूनच समर्थ सांगतात-
आहे चळवळीचे | जो जो करील तयाचे ||
परंतु तेथे भगवंताचे | अधिष्ठान पाहिजे ||
भारताचे माजी पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी यांनी एके ठिकाणी वर्णन केले आहे-“भारत
सिर्फ जमीन का टूकडा नाही है, यह जीता जागता राष्ट्रपुरुष है | इसकी नदियाहमारे लिये
गंगा हैं और यहां का कंकड कंकड शंकर है | ये वंदन की भूमी है, ये अभिनंदन की भूमी है
| मरने के बाद भी इन नदियो मे बेहती हमारी अस्थियोको कोई कान लगाकर सुन सके तो एकही
आवाज आये गी “भारत माता की जय” समार्थांचीच रेष पुढे ओढलेली इथे दिसते.
या ही पुढे जाऊन या देशासाठी आणि धर्मासाठी आपले जीवन समर्पित करणारा प्रत्येक क्रांतिकारी,
प्रत्येक देशभक्त, समाजाचे सत्व भक्तीने जागृत ठेवणारा प्रत्येक संत आमच्या करिता देवच
आहे. आमच्या समाजात त्यांचे अधिष्ठान अर्थात त्यांचे विचार हे डोक्यावर घेतले पाहिजेत.
पण आमचे दुर्दैव हेच की आज आमच्या “सुशिक्षित समाजाने पाश्चात्य विचार आणि संस्कृती
डोक्यावर धारण केली आहेत, सिनेकलावंत हेच आमचे आदर्श! देव, देश आणि धर्माचे विचार
प्रसारित करणारे यांच्या दृष्टीने मागासलेले आणि बुरसटलेल्या विचारांचे! पण हा विवेक
नव्हे! ही स्वैराचाराला खतपाणी घालणारी काटेरी निवडुंगाची झाडं या मातीतली नाहीत. या
मातीत जन्मावं या मातीसाठीच जगावं आणि या मातीसाठीच जगता जगता याच मातीत मिसळून जावं
पुन्हा एकदा याचं मातीसाठी जन्म घेण्यासाठी! आज समाजात अधिष्ठान राजकारण्यांचे! संस्कार
हे व्याभिचारी जनांचे! आणि अनुकरण हे समाजविघातक देश व धर्म विरोधकांचे! भगवंताचे अधिष्ठान
जे मनामनात होते ते आता खरचं कुठेय?
राष्ट्र हे कुणा एका व्यक्तीमुळे किवा ठराविक व्यक्तीसमूहामुळे चालत नाही, हा जगन्नाथाचा
रथ आहे. सर्वांनी मिळून ओढला तरच तो ओढला जाईल. देशद्रोही तितुके कुत्ते | मारोनी घालावे
परते | आपण देशद्रोही वक्तव्य/कृती करणाऱ्यांना आणि त्यांच्या या कृतीचे समर्थन करणाऱ्यांना
त्यांची जागा ही वेळीच दाखवून दिली पाहिजे. देव हा आमचा आत्मा तर देश हे आमचे शरीर
आहे. आमच्या आत्म्याला दिलेले क्लेश हे शरीर सोसतं तर शरीरावर होणारा आघात हा आत्म्यावर
होणारा आघात आहे. द्वेष हा अनादी कालपासून सुरूच आहे. पण आजची परिस्थिती ही सहनशीलतेची
परिसीमा पाहणारी आहे. आमच्या देव देवतांची भर दिवसा विटंबना होते, आमच्या परंपरावर
हल्ले होतात, मंदिराचे पावित्र्य नष्ट करण्याचे सुडाचे राजकारण होते, सरेआम देशविरोधी
घोषणाबाजी होते आणि तरीही आमचे रक्त पेटून उठत नाही?
धर्माकरता मरावे | मरोनी अवघ्यासी मारावे |
मारता मारता घ्यावे | राज्य आपुले || सर्व प्रथम विस्कळीत झालेला आपला समाज हा एकत्रित
बांधला पाहिजे आणि त्या करिता भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. या करिता समर्थ रामदास श्रीरामांचे
उदाहरण डोळ्यासमोर ठेवतात. श्रीराम हे मर्यादापुरुषोत्तम होते, ते कुशल राज्यकर्ते
होते, दैवी गुणसंपन्न अलौकिक पुत्र होते, आदर्श शिष्योत्तम होते! आदर्श पती, मित्र
आणि सर्वार्थाने अनुकरणीय होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज! ह्यांच्या व्यक्तिमत्वातील
एकजरी गुण आम्ही उचलला तर आमच्या जीवनाचे सोने होऊन जाईल. पण आमची कर्मदरिद्री प्रजा
मात्र
घरी कामधेनु पुढे ताक मागे | हरीबोध सांडूनी विवाद लागे | अशी वाया जाताना दिसते. अर्थात
घरी आदर्श व्यक्तींची पंगत रुपी कामधेनु(इच्छिलेले देणारी स्वर्गीय गाय) असताना आम्हाला
बुद्धी मात्र तिच्याकडे ताक(निरर्थक गोष्टी) मागण्याची होतेय, हरी म्हणजेच परमेश्वराचे
स्वरूप समजावून घेण्याऐवजी त्याच्या स्वरूपाविषयी वाद घालण्यातच आम्हाला रस आहे. जो
काळ देव देश आणि धर्म यासाठी हलकल्लोळ माजवण्याचा आहे त्याकाळात आम्ही दूरदर्शनवरच्या
निरर्थक मालिका पाहतो? बीभत्स वासनेची उत्पादने प्रेमाच्या नावाने विकली जात असताना
आपण ते निमूट सहन करतो? आज पेरली जाणारी ही वासनेची आणि देव/देश/धर्म द्रोहाची बीजे
भविष्यात छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, धर्मवीर संभाजी, भगतसिंग, सुखदेव,
राजगुरू, सावरकर, आंबेडकर, बोस अशी नररत्नांची खाण जन्माला घालू शकेल काय?
समर्थांचं लिखाण पाहिलं तर त्यांनी प्रपंच आणि परमार्थ यातील एकही विषय सोडलेला नाही.
“शास्त्राच्या रक्षणासाठी शस्त्र हाती धरावेच लागते हा संदेश दिला. ज्ञानोपासना
सुखकर होण्यासाठी बलोपासना अत्यावश्यक आहे. यज्ञात बळी हा नेहमी बोकडाचा दिला जातो
वाघ-सिंहाचा नव्हे. ”दैवो दुर्बलघातक: | ” दैव हे नेहमी दुबळ्याचाच घात
करते. म्हणून सर्वांनी सामर्थ्यवान असावे या करिता गावोगावी फिरून मारुती मंदिरे आणि
व्यायामशाळा स्थापन केल्या.
याचा सारांश काढायचा ठरला तर सामर्थ्यवान प्रजा, देव-देश-धर्माभिमानी नागरिक आणि भगवंताचे
अधिष्ठान असेल तसेच राजकारणी नव्हे तर देव मस्तकी धरला असेल तर मग प्रत्येकाची
स्थिती
समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे |
जयाची लीळा वर्णिती लोक तीन्ही
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी || अशी झाल्याशिवाय राहणार नाही.
माघ कृ ९ ला “श्री रामदास नवमी” आहे समर्थांचा प्रत्येक शब्द हा प्रेरित
करणारा आहे. या निमित्ताने जर त्यांच्या कोणत्याही ग्रंथ संपदेच्या अध्ययनास प्रारंभ
हा आपल्या सर्वागीण उन्नतीचा “श्रीगणेशा” ठरू शकतो. आणि भारतमातेचे गतवैभव
पुनश्च तिला प्राप्त करून देऊन विश्वाचा ज्ञानसूर्य म्हणून भारताला जनमान्यता मिळवून
देऊ शकतो.
||जय जय रघुवीर समर्थ ||
-"श्रीरामकृष्ण"चरणरज
|| श्री रामदास नवमी ||
http://manmandiraa.blogspot.com/2016/02/blog-post_29.html