श्रावण आणि शिवोपासना
|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||
शिवोपासनेमध्ये सोळा सोमवार व्रत, प्रदोष व्रत, शनिप्रदोष व्रत, नामजप, रुद्राभिषेक
अशा अनेक प्रकारच्या सेवांनी शिवला संतुष्ट केले जाते. घराण्यातील दोष कमी करणे, संतती
सौख्य लाभणे, निसर्गाचा ऱ्हास थांबविणे किंवा केवळ निरपेक्ष बुद्धीने सेवा म्हणूनही
ही व्रते केली जातात. जेव्हा आपण व्रत आचरतो तेव्हा त्याला एक विशिष्ट कालावधी व विशिष्ट
उद्देश असतो. आपण कशाकरिता हे व्रत आचरणार आहोत हे अगदी मनाशी ठरवून घ्यावे. त्या दृष्टीने
मनाची तयारी होणे आवश्यक असते. व्रत करताना संकल्प सोडला जातो. त्यामध्ये तुमच्या व्रताचा
कालावधी व उद्देश याचा उल्लेख असतो. जाणकार ब्राह्मण तुमच्यावतीने भगवंताला तसे वाचन
देत असतात आणि तुम्ही देवा माझ्याकडून हे व्रत करवून घे अशी प्रार्थना शरणागत भावनेने
करता; त्यामुळे व्रताचे पालन करणे तुम्हाला सुसह्य होते. तरीसुद्धा परमेश्वर मधूनमधून
संकटे निर्माण करीत असतो. कारण तुमच्या मनाची खोली तो तपासतो. आपण नेटाने त्या परीक्षेत
उतरायचे असते. संकट आल्यावर त्याचीच करुणा भाकायची असते. आपण दहा पावले पुढे गेलो तर
तो नक्कीच आपल्याबरोबर शंभर पावले चालतो. आपण व्रत करीत आहोत याचा गाजावाजाही करू नये.
मी करते किंवा मी करतो ही भावना न ठेवता भगवंत आमच्याकडून करवून घेत्तात ही भावना ठेवणे
हे महत्वाचे.
शिवोपासना व्रताचे फायदे अवश्य होतात. देहाची शुद्धी होते, मनाला खूप आनंद वाटतो. व्रत
संपले तरी शरीराला वळण लागते. इंदियांना वळण लावणे ही फार अवघड गोष्ट आहे.
शिवोपासानेत सोळा सोमवार हे अतिशय कठीण व्रत आहे. कारण हे व्रत आचरताना हमखास संकटे
येतात. म्हणून याला “संकट सोमवार” असेही म्हणतात. शनिप्रदोष
व्रत हे चातुर्मासामध्ये करायचे व्रत आहे आणि प्रदोष व्रत बाराही महिन्यात येणाऱ्या
प्रदोषाला करायचे व्रत होय. आता प्रत्येक व्रत आचारताना काय काय नियम सांभाळायचे, व्रताचा
उद्देश व कालावधी पाहू.
सोळा सोमवार व्रत-
कालावधी- श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवार पासून किंवा मार्गशीर्ष
महिन्याच्या पहिल्या सोमवार पासून सुरुवात करावी. व्रताला सुरुवात करताना गुरु आणि
शुक्र हे दोघेही किंवा दोघांपैकी एक अस्तंगत असतील तर व्रतारंभ करता येत नाही. व्रतासाठी
दोन्ही ग्रहांचे पाठबळ आवश्यक आहे.
आचरणाचे नियम- दर सोमवारी काहीही न खाता व पाणीही न पिता उपवास करावा.
संध्याकाळी सचैल स्नान (डोक्यावरून) करून स्त्रियांनी ज्यांना शक्य असेल त्यांने नऊवारी
धूत वस्त्र आणि पुरुषांनी धुतलेले धोतर किंवा पंचा नेसावा. अंगावरती उपरणे घ्यावे.
एक वस्त्राने देवाची पूजा करू नये. अंडरपेंट किंवा टॉवेल गुंडाळून देवाची पूजा करू
नये. (याचे कारण कमरेच्या खाली सगळा प्रपंच असतो.) ईश्वराची आराधना करताना इतर वासना
होणे किंवा मलमूत्र विसर्जनाची भावना येणे गैर आहे. कारण मग आपले लक्ष विचलित होते,
म्हणून कमरेला घट्ट आवळून काचा मारून बसावे, म्हणजे शिवपूजन करता येते.
शक्य झाल्यास जाणकार ब्राह्मणाकडून पिंडीवर दुग्धधारा अभिषेक करवून घ्यावा तो शक्य
नसेल तर स्त्री-पुरुषांनी शिवमहिम्न म्हणावे. तेही शक्य नसेल तर मराठीत शिवस्तुती म्हणून
पूजन करावे. आपल्या देवघरातील पिंडीवर जो वाटोळा भाग असतो, तो म्हणजे शिवलिंग होय.
आणि उत्तरेकडे जो पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग दाखवलेला असतो ती म्हणजे गंगा (पार्वती)
होय. देवघरात पिंड नेहमी दक्षिणोत्तर ठेवावी. पूजेला ठेवतानाही गंगेचे टोक उत्तरेकडे
हवे. पूजाविधी मध्ये स्नान वगैरे घालून पिंड कोरड्या वस्त्राने पुसून मधील गोलाकाराला
म्हणजेच शिवलिंगाला आडवे तीन रेघांनी युक्त गंध किंवा भस्म लावावे, पांढरे फुल व बिल्वपान
वहावे व उत्तरेकडील पार्वतीला हळदी-कुंकू व सुगंधी फुल वाहावे. बिल्वपान वाहताना नमःशिवाय
असे म्हणून वाहावे. बिल्वपान १०८ असतील तर उत्तम नसतील तर जेवढी मिळतील तेवढी वाहावीत.
बिल्वपान तीन पानांचे असते. ते तुटके किंवा किडलेले नसावे. त्याचे देठ थोडेसे कापावे
व वाहताना देठ देवाकडे करून पालथे वाहावे. सर्व उपचारांनी युक्त पूजा झाल्यावर खडीसाखरेचा
नैवेद्य दाखवावा. त्याचे तीन भाग करावेत. एक देवाला म्हणजे ब्राह्मणाला द्यावा. एक
भाग गायीला व उरलेल्या भागाचा प्रसाद घरातील सगळ्यांना द्यावा. त्यातील आपल्या वाट्याला
जो भाग येईल तो सेवन करावा व त्यावर पिता येईल तेवढेच पाणी प्यावे.
चटईवर किंवा घोंगडीवर झोपावे.
मंगळवारी सकाळी उठून स्नान करावे मग चहा, कॉफी दुध आपण काय घेत असाल ते घ्यावे. दही
भाताचा नैवेद्य शंकराच्या पिंडीला दाखवावा. कापूर आरती करावी. कापूर आरती शंकराला प्रिय
आहे. पिंडीला दाखवलेला नैवेद्य गायीच्या मुखात घालावा.
सोळा सोमवारचे व्रत चालू असताना सुतक आले तर त्यादिवशी उपवास करायचा पण सोडायचा नाही
आणि मोजताना धरायचा नाही. स्त्रियांच्या मासिक धर्मात जर सोमवार आला तर पाणीही न पिता
उपवास करायचा पण मोजायचा नाही. व्रत चालू असताना इतरांच्या अंथरुणावर, पलंगावर बसू
नये.
व्रत चालू असताना बाजारातील विकतचे पदार्थ, हॉटेल मधील अन्न किंवा इतरांच्या घरातील
अन्न सेवन करू नये. काही लोक ताटाखाली पैसे ठेवून जेवतात तेही चूक आहे. देहशुद्धीसाठी
आपण परान्न टाळतो. ताटाखाली पैसे ठेवून अन्नाची शुद्धी होत नाही. कांदा, लसूण, मुळा,
शेपू यांसारख्या उग्र वासाच्या तमोगुणी पदार्थांचे सेवन करू नये. सात्विक आहार घ्यावा.
उपवासाच्या दिवशी चिडचिड करू नये. तशी परिस्थिती निर्माण होतेच, तरीही मन शांत ठेवावे.
शिवाय असत्य भाषण करू नये. संपूर्ण व्रताच्या काळात गावाची वेस ओलांडू नये. अगदीच आणीबाणी
असेल तर देवाची परवानगी घेऊन क्षमा मागून जावे. पण इतर दिवशी प्रवास करावा लागला आणि
अगदीच उपाशी राहणे शक्य झाले नाही तर दुधात पोहे भिजवून खावेत. पण सोमवारी प्रवास करू
नये.
व्रताच्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे.
सोळा सोमवार पूर्ण झाल्यावर सतराव्या सोमवारी च्र्म्याचे लाडू करावेत. शक्य असेल त्यांनी
गहू जात्यावर दळून घ्यावेत. गायीच्या दुधात आणि तुपात पीठ भिजवून गायीच्या शेणाच्या
गोवरीवर त्याचे गाकर भाजावेत. त्याला बारीक दळून कुटून सपीटाने चाळून लाडू करावेत.
अठरा लाडू घेऊन सहा देवाला, सहा ब्राह्मणाला व सहा घरातील इतर लाडूत मिसळावेत आणि तो
प्रसाद म्हणून सर्वाना वाढावा. ज्या दिवशी व्रताची सांगतां होईल त्या दिवशी जर मनामध्ये
काही हेतू ठेऊन उपवास केले असतील तर सोळा मेहूण जेवायला सांगावीत. जर निरपेक्ष बुद्धीने
भगवंताची सेवा म्हणून व्रत केले असेल तर एक मेहूण जेवायला घातले तरी चालते. त्यादिवशी
लघुरुद्र करावा. शक्य असेल त्यांने हवानही करावे. ज्यांना जेवायला सांगितले त्यांनी
त्या सोमवारी उपवास करावा. शक्यतो सात्विक आहार घेणारे जोडपे सांगावे. त्यातूनही सोमवार
करणारे असतील तर उत्तमच!
हे व्रत खंडित न होईल याची काळजी घ्या. जेवढे शक्य होईल तेवढे नियम पाळा. त्यानंतर
तुम्हाला जो आनंद मिळतो तो अवर्णनीय असतो. मुख्य म्हणजे शरीर हलके झाल्याने आपल्या
ठिकाणी चैतन्य जाणवते. अंतरंगीचा आनंद विरळा असतो आणि साक्षात शिव आपल्याला काहीतरी
अनुभवातून दर्शन देतातच फक्त आपली पात्रता वाढली पाहिजे.
शनिप्रदोष व्रत- हे श्रावणाच्या पहिल्या शनिवार पासून करतात. श्रावण,
भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक या महिन्यातील प्रत्येक शनिवार, प्रत्येक सोमवार, दोन
एकादश्या व दोन प्रदोष असे एका महिन्यात कमीत कमी १२ उपवास करावे लागतात. असे चार महिने
म्हणजेच चातुर्मासापर्यंत करायचे दिवसभर काहीही न खाता किंवा दुध फळे घेऊन उपवास करावा.
संध्याकाळी सोळा सोमवार सारखेच शिवपूजन करायचे दही भाताचा नैवेद्य दाखवायचा तो गायीला
द्यायचा आणि दहीभात, ताकभात खाऊन तो उपवास सोडायचा. सोळा सोमवारचे जे नियम आहेत ते
याला लागू आहेत. फक्त एकादशी सोडून इतर दिवशी उपवास सोडायचा असेल तर एकादशीला वरईचा
भात व दही याचा नैवेद्य दाखवावा. या व्रतामुळे ज्ञानवृद्धी, धनवृद्धी, वंशवृद्धी होते.
व्रताच्या सांगतेला एक मेहूण घालावे. लघुरुद्र करून व्रत सोडावे.
प्रदोष व्रत- वर्षातील प्रत्येक महिन्याला येणाऱ्या प्रदोषाला न खाता
पिता पण पाणी पिऊन उपवास करणे. श्रावण महिन्यातील प्रदोषापासून या उपवासाला सुरुवात
करतात. एकदा हे व्रत स्वीकारले तर मध्येच सोडून देता येत नाही. वयोमानानुसार कडक उपवास
करता येत नसेल तर फळे, दुध घ्यावे पण तिखट मिठाचे, तळलेले पदार्थ खाऊ नयेत. संध्याकाळी
शिवपूजन करून दहीभाताचा नैवेद्य दाखवावा. तो नैवेद्य गायीला द्यावा आणि दही भात, तक
भात खून उपवास सोडावा. हे व्रत बाराही महिन्याचे असल्याने आचरणाचे नियम फक्त उपवासाचे
दिवशी पाळावे. कांदा, लसूण खाणाऱ्या लोकांनी चातुर्मास, प्रदोष या दिवशी कांदा, लसूण
खाऊ नये. याखेरीज ज्यांना उपवास करायचे नाहीत पण शिवोपासना करायचीय त्यांनी जेवण्यापूर्वी
रोज शिवमहिम्न म्हणावे. ज्यांना संस्कृत अवघड वाटते त्यांनी शिवलीलामृताचा रोज एक अध्याय
वाचावा. स्त्रियांनी नमःशिवाय हा जप करावा. ओम नमःशिवाय असा जप करावा. जप करणाऱ्यांना
सुद्धा व्रत केल्याची फळे मिळतात. पण त्यासाठी मन एकाग्र व्हायला हवे. आपण आई भगवंत
एकटेच आहोत असा विचार हवा. दुसरे प्रपंचातील कोणतेही विचार नकोत. यासाठी शरीर शुद्धी
आवश्यक आहे. शरीरशुद्धीसाठी उपवास केला नाही तरी सात्विक आहार घेणे गरजेचे आहे. पण
हा जो नियम कराल तो पूर्ण झाल्याखेरीज पाणीही प्यायचे नाही. हे ठरवून टाका. घरामध्ये
अधूनमधून शिवपूजन व्हावे म्हणून एकादशीनी किंवा लघुरुद्र करावा. ते शक्य झाले नाही
तर एक रुद्राचे आवर्तन करून अभिषेक करावा. शिव ही आद्यदेवता आहे. पांडुरंग, बालाजी,
तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई इ. देवता ही शिवाचीच रूपे आहेत. या प्रत्येक देवतेच्या
डोक्यावर शिवलिंग आहे. मूळरूप एकच आहे.
घराण्यातील दोष- घराण्यामध्ये दोष निर्माणहोतात म्हणजे काय? घरात
भौतिक सुखाच्या सोयी असूनही मनाला शांतता नसते. जेवायला बसले की घरात कायम वादावादी
चालते. संतती होत नाही, समजा झालीच तर अपंग होते. आईवडील हुशार असुनही मुले निर्बुध्द
होतात. घरामध्ये सतत आजारपण असते. भांडणे ती इतकी विकोपाला जातात की हाणामारी होते.
मनोदौर्बल्य येणे. हे सगळे दोष कशामुळे येतात. कारण अशा दोषांवर डॉक्टरी इलाज चालत
नाही. याखेरीज मधुमेह, कर्करोग यांसारखे रोग होतात. काही असेही रोग होतात की, जेथे
डॉक्टरी इलाज चालत नाहीत. हे सगळं कशामुळे होते?
१) घरामध्ये कुळधर्म, कुळाचार पाळले जात नाहीत.
२) घरामध्ये श्राद्धविधी होत नाहीत.
३) गरीब, अपंग, विधवा यांच्यावर अत्याचार करून त्यांचे धन लुबाडले.
४) डॉक्टर, वकील आणि सावकार यांच्याकडे हा त्रास असतो. वकिलाला स्वतःच्या अशिलाला वाचविण्यासाठी
सतत खोटे बोलावे लागते आणि डॉक्टर हा वैद्यकीय धर्मानुसार वागत नाही. चांगल्यासाठी
का होईना पण मानवी रक्तात हात भरतात. शिक्षक शिकवण्या करून पैसे कमवितात आणि व्यावसायिक
भेसळीचा मार्ग अवलंबितात. नोकरशहा आपल्या नोकरीत प्रामाणिक राहत नाहीत. दरोडेखोर दुसऱ्याला
लुबाडतात तर खुनी कायिक पापे करतात. अशा वागण्याचा मानवाला त्रास होतो. या सगळ्यांचा
हिशोब नियती ठेवते. आपली जशी न्यायदेवता तशी “नियती” ही ईश्वराची न्यायदेवता.
तिचे कायदेकानून वेगळे आहेत. तिच्याकडे फक्त निर्णय आहेत. दया माया नाही म्हणूनच अघटीत
घटना घडत राहतात. यासाठी शिवोपासना करावी.