स्री
भारतीय संस्कृती प्रमाणे मानवी जीवन हे ब्रह्मचर्याश्रम, संन्यासाश्रम,
गृहस्थाश्रम व वानप्रस्थाश्रम चार आश्रमात विभागले गेले आहे. त्यापैकी गृहस्थाश्रम
हे सर्व आश्रमांचा आधार आहे. स्रीला गृहस्थाश्रमात फार मोठे स्थान आहे. याविषयी प.
पू. गुरुदेवांनी केलेले मार्गदर्शन आपण पाहणार आहोत.
पिता होणे सोपे पण पितृत्व अवघड आहे. मुलगी झाली की तिला शिकवावे पण आईने
तिच्यावर उत्तम संस्कार करावेत तिला मोठ्यांचा आदर करायला शिकवावे. मोठा भाऊ हा पित्याप्रमेण
तर मोठी बहिण ही मातेप्रमाणे असते. वडीलधारी व्यक्ती घरात आली तर मुलांनी उठून बसावे
हे साधे साधे संस्कार करावेत. मुलीला उत्तम स्वयंपाक शिकवावा. आजकाल एकट्या मुलींनाच
का, मुलांना का नाही? असा प्रश्न येतो पण उत्पत्ती आणि त्याच्या अनुषंगाने येणारे सगळे
गुण म्हणजे माया, प्रेम, मार्दव, वात्सल्य हे स्रीमध्ये उपजतच असतात. पक्षांचे पहा,
पशूंचे पहा. संतती सांभाळणे, घरटी बनविणे, ऊन, वारा, पाऊस यांपासून पिलांचे रक्षण करणे
हे सगळे मादीच करते. तसेच मानवाचे आहे. आपल्या मुलीला सु-संस्कारीत करणे हे आई-बाप
आणि इतर वडिलधा-यांचे कर्तव्य आहे. मुलीला अवश्य शिकवा पण लग्नाला योग्य वय झाले की
लगेच लग्न करा. सगळ्या उपवर मुलीच्या माता-पित्यांना माझे सांगणे आहे की दिवस फार वाईट
येत आहेत. कली थैमान घालीत आहे. एकाच घरात देव आणि दानव जन्म घेत आहेत. मुलीला उच्च
शिक्षण जरूर द्या पण मुलींची लग्ने वेळेत करा. फारतर जावयाला सांगा – तिला लग्न झाल्यावरही
शिकायचे आहे आम्ही शिकवू. उच्च शिक्षणासाठी मुलीला कोठेही एकटे ठेवू नका. गरज पडली
तर एखाद्या नातेवाईकाकडे ठेवा. मुली एकट्या राहिल्या की बंधनात राहत नाही. स्वतः स्वतंत्रपणे
निर्णय घेतात. साधक बाधक विचार न करता अंमलातही आणतात. वैवाहिक आयुष्याच्या दृष्टीने
हे अवघड होऊ शकते.
एका व्यक्तीने बालपणीच्या मित्राच्या मुलाशी स्वतःच्या मुलीचे लग्न लावले.
पत्रिका वगैरे काहीच पाहिली नाही. थोडे दिवस लग्नानंतर बरे गेले पण नंतर काही दिवसांनी
मुलगा मुलीला मारहाण करू लागला. मुलीचे वडिल मुलीला माहेरी घेऊन आले. नंतर मुलीला घेऊन
दर्शनाला आले. मला सगळी हकीकत सांगितली. चूक मुलीच्या वडिलांची होती. व्यवहार वेगळा
व प्रेम वेगळे. स्वतःच्या पोटचा गोळा असा काहीच विचार न करता दिला. मुलीची काहीच चूक
नव्हती. मी मुलीला नामस्मरण करायला सांगितले. मुलीला आधार दिला आणि सांगितलं, 'पतीला
पश्चाताप झाल्याखेरीज सासरी जायचे नाही.' काही दिवसांनी पतीला पश्चाताप झाला व माफी
मागून मुलीस घेऊन गेला. घरात धार्मिक वातावरण असेल, रोज देवांची सेवा होत असेल तर अशी
वेळ येत नाही.
मुलीला वर शोधताना पत्रिका, कुळ, घरचे संस्कार, त्यांच्या रीती या गोष्टी
पाहून घ्याव्यात. घराची आणि मुलीची व्यवस्थित चौकशी करावी. मुलीचे लग्न ठरविताना मुलीच्या
वडीलधा–यांनी मुलाची व मुलीची पत्रिका नीट पडताळून पहावी. सगळे गुण जमले तर संसार सुखाचा
होतो. मुलगा आणि मुलगी भिन्न कुटुंबात, भिन्न संस्कारात वाढल्यामुळे मतभेद होणारच.
पण पत्रिका जुळलेल्या असतील तर मतभेद पराकोटीला पोहोचत नाहीत. पत्रिकेत जेव्हा दोष
असतो, किंवा तिचे गुण जुळत नाहीत तेव्हा हीच भांडणे पराकोटीला पोहोचतात. मुलगी नवऱ्याला
सोडून स्वतःच्या आईवडिलांकडे येते. आई वडिलही तिची समजूत काढतात व ८/१० दिवसांनी परत
पाठवतात. आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर आईवडील आणखी थोडे दिवस सांभाळतात. पण मातृ-पितृ
छत्र हरपले तर मुलीने कोणाच्या आधाराने जगायचे? भाऊ किरकोळ कुरबुरीवरून बहिणीलाही सुनावतात.
'तू तुझे घर तोडून आली आता आमचे घर तोडते आहेस का?' वधू - वरांच्या वयामध्ये कमीत कमी
५ वर्षांचे अंतर हवं. याची दोन कारणे आहेत. मुलीला समज लवकर येते. त्यामानाने मुलाला
उशिरा समज येते. आणि बायको लहान असल्याने नवरा तिला सांभाळून घेतो. वयात अंतर असल्याने
सामंजस्य येते. एकवेळ पैसा कमी असला तरी चालेल पण दोघांच्यात सामंजस्य हवे.
एक जोडपे माझ्या दर्शनाला आले होते. दोघेही उच्च शिक्षित. मोठ्या पगाराच्या
नोकरीवर. त्यांना एक अपत्य झाले आणि संसारात कुरबुरी सुरु झाल्या. बायकोला नव-या एवढ्याच
पगार. तेवढ्या मोठ्या पगाराचा तिला अहंकार झाला. ती मला सांगू लागली 'हा असं करतो,
तसं करतो.' मी तिला म्हणालो, 'अगं तुझे पती आहेत ते. त्यांना अरे तुरे काय करतेस?'
मला हे आवडत नाही. मुलगा बापाला काय हाक मारणार? त्याला वडिलांविषयी काय आदर राहणार?
संस्कार करण्याची जबाबदारी झटकून भांडतेस कसली? लग्न झाल्यावर मुलीने उत्तम अशी नवी
पिढी घडविण्यासाठी मर्यादा ही पाळलीच पाहिजे.
लग्न हा काही पोरखेळ नाही असं म्हणतात ते बरोबर आहे. मुलगी वयाने लहान
असेल तर ऐकते. पण जिचे मत ठाम आहे, जी कमावती आहे अशा मुलीला लग्न हा विषय समजावून
घ्यायला हवा. लग्न म्हणजे दोन्हीही घराण्याचा उद्धार आहे. आपल्या माता-पित्याला कमीपणा
येईल असे मुलीने वागू नये. त्या घरातील रीतीभाती आत्मसात कराव्यात. सुशिक्षित मुलगी
असेल तर तिने प्रत्येक परंपरेचे कारण जाणून घ्यावे. गतानुगत राहु नये. जे धर्मशास्रानुसार
आहे ते आपण करावे. आदरातिथ्य, दानधर्म, सहनशीलता ही गृहस्थाश्रमाची मुख्य अंग आहेत.
नेहमी खरेच बोलावे. कारण सत्य हे कायम सत्यच असते. पूर्ण प्रपंचात त्याचाच आधार असतो.
विश्वास हा प्रपंचाचा मूलाधार असतो. स्री हाच प्रपंचाचा पक्का आधार आहे. तिच्याभोवती
सगळे घर फिरत असते. तिला सहधर्मचारिणी तसेच अर्धांगिनी म्हणतात. पतीचा धर्म आचरणारी
त्याला सहाय्य करणारी असा त्याचा अर्थ आहे.
मुलीचे लग्न झाल्यावर पतीच्या संसारात माता-पित्याने ढवळाढवळ करू नये.
जावई हा 'दशम ग्रह' म्हणतात ते खोटे नाही. त्याचे जास्त लाड करू नयेत. विशेषतः सासुबाईंनी
जावयाचे लाड - प्रेम आटोक्यात ठेवावे. अन्यथा ते मुलीला त्रासदायक होईल. पूर्वीच्या
काळी मुलीला मुलगा झाल्याखेरीज मुलीच्या घरी पाणी पीत नसत. हे जरी खरे असले तरी त्यामुळे
मुलीच्या संसारात आई वडिलांची ढवळाढवळ होत नसे. नव्या घरात मुली रुळायला थोडा वेळ लागतोच.
मुलीवर आई वडिलांचे लक्ष आहे असा भास मात्र निर्माण व्हावयास हवा. आई-वडिल यांचे खेरीज
इतरांनी ती जबाबदारी घ्यावी म्हणजे कटुता निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही.
मुलगी सून म्हणून घरात आली की सासरच्यांनी तिच्याशी प्रेमाने वागावे.
तिला घरातील रीतीभाती समजून सांगाव्यात. तिचा छळ करू नये. ती गृहस्वामिनी असते. घरातील
स्री आनंदी राहिली पाहिजे. स्री आनंदी असली की घर आनंदी राहते. आमच्या दादा वहिनींचे
लग्न इथे नगरमध्ये मैदान आडाजवळील नृसिंह मंदिरात झाले. तेव्हा दादा - वहिनींनी एकमेकांना
घास भरविला तेव्हाच माझ्या लक्षात आले की नवरा घास भरवितो तेव्हा तो तिच्या भाग्योदयाची
पूर्ण जबाबदारी घेतो आणि नवरी भरवते तेव्हा ती त्याला सांभाळून घेण्याची जबाबदारी घेते.
अशी सर्व लोकांसमोर जबाबदारी घेतल्यावर तिला दुखावणे योग्य नाही. असे करणाऱ्याच्या
पुढील पिढ्यांत दारिद्र्य येते.
स्रीने गरोदरपणी खूप काळजी घेतली पाहिजे. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे.
मुख्यत्वेकरून भागवत ग्रंथ वाचवा. त्यामध्ये श्रीकृष्णाच्या बाललीला आहेत. भक्तीरसाने
परिपूर्ण असा हा ग्रंथ वाचला तर गर्भावर चांगले संस्कार होतात. विष्णूसहस्त्रनाम, रामरक्षा,
मारुतिस्तोत्र म्हणावे. श्रीरामासारखा सत्यवचनी, श्रीकृष्णासारखा मुत्सद्दी, हनुमंतासारखा
बलवान पुत्र व्हावा अशी अपेक्षा ठेवावी व तसे प्रयत्न करावेत. दुष्ट शक्ती ही गरोदर
स्त्रीच्या शरीरात प्रवेश करायला उत्सुक असते म्हणून विशेष काळजी घ्यावी. वेळी-अवेळी
केव्हाही हिंडू नये. घरात येतांना पाय धुवून यावे. घरातील सर्वांनी ही काळजी घ्यावी.
गरोदर स्त्रीला आनंदी ठेवले पाहिजे. आजकाल डॉक्टरलोक गरोदर स्त्रीला अगदी पहिल्यापासून
विश्रांती घ्यायला सांगतात. हे चुकीचे आहे. शरीराची हालचाल झाली पाहिजे तरच बाळंतपण
सुकर होते.
आजकाल स्त्रिया अर्थार्जनामुळे घराबाहेर असतात. त्यांना धर्मग्रंथ वाचायला
वेळ नसतो. ज्यांच्याघरी वडीलधारी माणसे आहेत त्यांनी गरोदर स्त्रियांना वेळ उपलब्ध
करून द्यावा पण ज्यांच्याकडे कोणीही नाही अशा स्त्रियांनी कुलदेवतेचं नामस्मरण करावं
व आपणांस सहज जमेल अशा देवतेचं नामस्मरण करावं. बाहेरून आल्यावर मात्र हातपाय धुवून
कपडे बदलून किंवा ज्यांना जमेल त्यांनी स्नान करावे व मगच स्वयंपाकघरात, देवघरात जावे
कारण दुष्टशक्ती पासून दूर राहायचे. सात्विक आहार घ्यावा. तामसी आहार घेतल्याने बाळाची
त्वचा खराब होते व स्वभाव तामसी होतो. आमचे म्हणणे असे की गरोदर स्त्रीने घरचेच अन्न
खावे. जिला आई व्हायचे तिने ही बंधने पाळायलाच हवीत. कारण बाळाला नुसताच जन्म नाही
द्यायचा तर त्याचे संगोपनही करायचे असते. आजकाल मुली बाळंतीण झाल्या की लगेच फिरायला
सुरुवात होते. खरे तर एका जीवाकडून दुसरा जीव जन्म घेतो त्यामुळे अशक्तपणा फार आलेला
असतो. एवढंच नसून दुसरा जीव जोपासायचा असतो. झालेली झीज भरून निघणं आवश्यक असते. म्हणून
विश्रांती हवीच. त्यासाठी मालिश करून आंघोळ करणे, ताजे गरम आणि पौष्टिक अन्न पदार्थ
खाणे गरजेचे असते. बाळाला बाहेरच्या लोकांचा संसर्ग होऊ नये म्हणून पूर्वी बाळंतीणीची
खोली स्वतंत्र असे. ती स्वच्छ झाडून पुसून घेऊन बाळालाही तेल लाऊन अंघोळ घालायची सोय
त्या खोलीत असे. बाळंतीणीला उबेसाठी शेक शेगडी असे. अंगात गरम कपडे घालत. हे सगळे कशासाठी
तर उष्णतेने आईला भरपूर दूध यावे. बाळाच्या पोषणासाठी पुरुसे होते. आईचे दूध बाळाच्या
आरोग्यासाठी चांगले असते.
बाळ बाळंतीणीने झगझगीत प्रकाशात राहू नये. गोंगाट गोंधळ असलेल्या ठिकाणी
त्यांना ठेवू नये. बाळाचे सगळे अवयव नाजूक असतात. त्यांच्या डोळ्यांना अती प्रकाश तसेच
कानांना कर्कश आवाज सहन होत नाही. इंद्रियांमध्ये हळूहळू ताकद येते. बाळ बाळंतीणीला
स्वतंत्र खोली असल्याने कोणालाही तेथे सहज प्रवेश नसे. वृद्ध स्त्रियातर बाळंतीणीकडे
कोणालाही फिरकू देत नसत. बाळंतीणीच्या खोलीत भेटायला येणाऱ्याना आधी बाहेरच्या खोलीत
बसवत मग हात पाय धुवूनच आत प्रवेश मिळे. याचे कारण म्हणजे दुष्ट शक्ती बाळंतीणीच्या
खोलीत प्रवेश करण्याची संधी मिळण्याची वाट पाहात असते. दुष्ट शक्तीचा बाळंतीणीच्या
खोलीत प्रवेश होवू नये म्हणून खोलीत धूप लावीत असत. आईचे दूध हे बाळासाठी पूर्णान्न
असते. बाळ एक वर्षाच होईपर्यंत त्याला या दूधाची गरज असते. पण आजकाल हे कोणीही पाळत
नाही. जुनी पद्धत म्हणून उपहास करतात. पण त्यामध्ये विज्ञानाचा पूर्ण विचार केला आहे.
मुली हे पाळीत नाहीत त्यामुळे मुल सांभाळण्यासाठी जो संयम लागतो तो त्यांच्यामध्ये
राहत नाही. मुलांना लवकर चष्मा लागतो. त्यांचे दात लवकर खराब होतात. पोटाच्या तक्रारी
वाढतात. बाळंतीणीने कान आणि डोके बांधून ठेवावे. थोडक्यात तोही दुसरा जन्मच असतो. गेलेली
ताकद परत आली पाहिजे. तेव्हा संयम ठेवा व नियम पाळा. आई जेव्हा स्तनपान करवीत असते
तेव्हाच तिच्यात व बाळात भावनात्मक उच्च नाते निर्माण होते. आई होण्याचे परमसुख ती
अनुभवते.
पुरुष आणि स्त्रीमध्ये, पुरुष भ्रमरासारखा असतो पण स्त्रीला सगळे सोसावे
लागते. तिचे आईपण तिला सिद्ध करावे लागते म्हणून तर तिचे मोठेपण. आपल्या धर्मात स्त्रीला
माता म्हणतात. ती जरी मुलाची आई असली तरी समाजात ती माता असते. आई आणि माता यात फरक
आहे. आई हा शब्द स्वतःच्या संततीशी निगडीत असतो पण माता हा वैश्विक अर्थाने आहे. कुटुंबातील
दीर, जावा, नणंदा, सासू-सासरे आणि इतर नातेवाईकांची ती काळजी घेतेच शिवाय त्यांच्या
पोटाला पण घालते. हे झाले कुटुंबाचे. समाजातील कितीतरी घटकांना ती खाऊपिऊ घालते. समाजातील
दु:खे पाहून तिच्या जीवाची उलघाल होते. कुटुंब व्यवस्था टिकून राहण्यास ती मोठा आधार
आहे.
आपल्या धर्मात स्त्रीला माता मानतात, अबला नाही. जिच्यापोटी प्रत्यक्ष
भगवंतानी जन्म घेतला तिला कमी लेखण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळेच तिने देवांसमोर
साष्टांग नमस्कार न घालता फक्त डोके टेकायचे आहे. तिची काया जरी कोमल असली तरी तिच्याठायी
आंतरिक शक्ती खूप असते. समजा दुर्दैवाने पतीचे निधन झाले तरीही ती मुलाचे संगोपन करते.
मुलाला कोंड्याचा मांडा करून वाढवते. बायको आधी गेली तर क्वचितच पती मुलांची एवढी काळजी
घेतो. तो दुसरा घरोबा करून त्यात रमतो. म्हणून आई गेली की मुले पोरकी होतात. आजकाल
समाजात विधवा स्त्रीला सुरक्षित वाटावे म्हणून दुसरे लग्न करून देतात. स्त्री जर तरुण
असेल व संतती नसेल तर दुसरा विवाह करण्यास हरकत नाही. पण ज्या स्त्रीला संतती आहे तिने
दुसरा विवाह करू नये. अशा स्त्रीला सासरच्या - माहेरच्या लोकांनी आधार द्यावा. तिला
शिकवावे. स्वतःच्या पायावर उभे करावे. संततीच्या दृष्टीने ते योग्य आहे. संतती असलेल्या
स्त्रीने लग्न केल्यास स्त्रीचे लक्ष विभागले जाते. कारण तिची स्वतःच्या मुलांकडे ओढ
असणे स्वाभाविक आहे. दुसऱ्या पतीने समजून घेतले नाहीतर दुःखच पदरी येते. अशी परिस्थिती
ओढवली तर त्यासाठी स्त्रीला जबाबदार धरू नये. हा विषय आपला नाही. तिचे भोग ती भोगतेच
पण परिस्थिती सुसह्य व्हावी म्हणून आप्तेष्टांनी मध्यस्ती करावी. समाजऋण फेडण्याचा
तो एक भाग आहे.
विधवा स्रीचा छळ करणे, तिचे धन लुबाडणे अशा गोष्टी केल्यास घराण्यास दोष
लागतो. रक्ताशी संबंधित असे असाध्य रोग होतात. तिचा तळतळाट घराणीच्या घराणी बरबाद करतात.
स्रीला या दृष्टीने अबला समजू नका. असहाय्य स्रीला दिलेल्या त्रासाची नोंद भगवंत घेतो.
कधी कधी स्त्रियाच स्त्रियांना त्रास देतात. मोठ्या सूनेला सून आली तरी
तिचा सासुरवास संपत नाही. सासूला वाटते की सून आली आता म्हणून मला किंमत राहिली नाही.
मग तिचे राजकारण सुरु होते. कुरबुरी वाढतात. म्हणून आम्ही सांगतो की वयाच्या पन्नाशीनंतर
हळूहळू संसारातील लक्ष कमी करा व देवधर्म करा. स्त्रिया लवकर निवृत्त होत नाहीत. मायेत
गुरफटलेल्या असतात. अशावेळी घरातल्या पुरुषांनी त्यांना बाहेर काढावे. पुढील पिढीच्या
दृष्टीने स्त्रियांमधील निवृत्ती महत्वाची आहे. 'जिथे कमी तिथे आम्ही' अशी भूमिका ठेवा.
चेहऱ्यावर प्रगल्भता आली पाहिजे. हे माझे ते माझे ही वृत्ती सोडून द्यावी. स्त्रिया
म्हणतात, 'मुलाचे लग्न होऊ दे, चांगली सून मिळू दे, पहिला नातू होऊ दे, सगळे मनासारखे
दिले की सांभाळायचे कोणी?' मागणा-यानेच समाधानी वृत्ती ठेवावी. स्वयंपाक घरातील लक्ष
कमी करावे म्हणजे भांडी वाजत नाहीत.
स्त्रियांनी कितीही रणरागिणीचा आव आणला तरी त्या आधाराशिवाय राहूच शकत
नाही. लहानपणी पित्याचा, तरुणपणी नवऱ्याचा, वृद्धावस्थेत मुलाचा आधार असतो. स्त्री
आधाराखेरीज राहूच शकत नाही. ती रस्त्याने चालली तर मुलाचे बोट धरेल, मुलाला स्पर्श
तरी करेल, काहीच नाहीतर पदराला तरी धरेल. आलेल्या व्यक्तींशी एकदम पुढे होऊन बोलणार
नाही. बोलायला उभी राहिली तरी रुमाल हातात असतो. चार वेळा पदराच्या टोकाला हात लावेल.
म्हणजे आधार धरण्याची सहज प्रवृत्ती आहे. रस्त्याने कधी पुरुषासारखे हात मोकळे ठेवून
चालणार नाही. रस्त्यात कोठेही थुंकणार नाही. ह्या मर्यादा तिला नैसर्गिक असतात. आता
काही ठिकाणी हक्कासाठी तावातावाने भांडण्याची वृत्ती झाली असली, तरी पर्यवसान रडण्यातच
होते. स्त्रीच्या मर्यादा, तिचा संकोच, तिची लज्जा या तीनही गोष्टी तिला ईश्वरदत्त
आहेत. त्या तिने ओलांडू नयेत.
स्त्रीने धार्मिक असावे. एकवेळ पुरुष नास्तिक असला तरी चालेल पण जर स्त्री
नास्तिक असेल तर कुटुंबाची वाताहत होते. धार्मिक स्त्री कुटुंबाला चांगले वळण लावते.
तिचा संयम, तिचे संस्कार, तिचा निग्रह ताठर लोकांनासुद्धा वठणीवर आणतो.
स्त्रिया चार प्रकारच्या असतात. पद्मिनी, शंखिणी, शाकिनी आणि डाखिणी.
पैकी पद्मिनी स्त्रिया फार दुर्मिळ आहेत. त्या एक टक्काच असू शकतील. त्या कर्मयोगी
असतात. दृष्टी जमिनीकडे असते. बोलणे मधुर असते. त्वचा नितळ असते. त्यांच्या अंगाला
एक प्रकारचा मंद सुगंध येतो. सीतामाई, द्रौपदी, मंदोदरी या पद्मिनी स्त्रिया होत्या.
पद्मिनी स्त्रिया श्रीमंतीत म्हणजे लक्ष्मी, सरस्वती सहित असतात. पद्मिनी
स्त्री ही सात्विक असते. तर शंखिणी स्त्री सत्व-रजोगुणानी युक्त असते. तिची त्वचा जाडसर
असते. अंगावर लव जास्त असते. अहंकार, इर्षा, क्रोध खूप असतो. त्यामानाने संकोच, मार्दव
या गुणांचा अभाव असतो. निर्णय घेण्याची क्षमता कमी असते. आजच्या पिढीत शंखिणी स्त्रियांचे
प्रमाण जास्त आहे. त्यांचा आवाज थोडा मोठा असतो. दुस-यांचे एकून घेण्याची प्रवृत्ती
कमी असते. अनुभवानेच शहाणपण येते, पण स्वतःच्या चुका दिलखुलासपणे मान्य करतात. कुटुंबाच्या
कल्याणासाठी काहीही आणि कितीही कष्ट उचलायची तयारी असते. थोडा अहंकार असतो. त्वचेवर
थोडी लव असते.
शंखिणी स्त्रिया अजिबात नम्र नसतात. अहंकार खूप असतो. आवाज मोठा आणि घोगरा
असतो. राग फार येतो. आपल्यापेक्षा कोणाचे वर्चस्व सहन होत नाही. डाखिणी म्हणजे स्त्रियांचे
बीभत्स रूप. या स्त्रिया तमोगुणीच असतात. कर्कश आवाजात बोलतात. त्वचा राठ असते. चेहऱ्यावर
मार्दवता नसतेच पण स्त्री आहे हे फक्त शरीर रचनेवरून समजते. केस मोकळे सोडण्याची प्रकृती
असते. मोकळे केस सोडणे हे सुडाचे लक्षण आहे. स्त्रियांनी केस मोकळे सोडू नयेत. द्रौपदीने
दु:शासानाचा वध झाल्याखेरीज केस बांधणार नाही असा पण केला होता. स्त्रियांनी केस मोकळे
सोडून कोठेही मंदिरात अथवा सत्पुरुषांच्या दर्शनाला जाऊ नये. तुम्ही दर्शनाला येता
तेव्हा संन्यासी गुरूंचे दर्शन घेता. त्या पादुकांना स्त्रियांच्या केसांचा स्पर्श
होऊ नये. ही मर्यादा आपण पाळलीच पाहिजे. सद्गुरू सगळ्याच्या पलीकडे आहेत पण तुमच्या
अशा वागण्याने तुमचे नुकसान होते.
पूर्वी स्त्रिया केस मोकळे सोडून हिंडत नसत. ते असंस्कृतपणाचे लक्षण समजत.
"झिंज्या घेऊन कुठे चाललीस? अवदसा नाही तर काय" असे पूर्वी म्हणत. आपल्या शास्रात जेवतांना
अन्नात केस निघाला तर शास्र आचरणारे लोक तेथेच जेवण थांबवत. असे झाले तर पूर्वीच्या
स्त्रियांना अपराधीपणाचे वाटे.
स्त्रियांनी चार दिवस पाळलेच पाहिजेत. कारण त्यांच्या चार दिवसातले अन्नही
चालत नाही. शास्त्रीय दृष्टीकोनातून त्या दिवसांत स्त्रीला विश्रांतीची गरज असतेच.
या खेरीज त्या दिवसांमध्ये तिच्या शरीरातून विषारी वायू बाहेर पडतो. त्याचा स्पर्श
अन्नाला झाला की त्याचे अनेक दुष्परिणाम होतात. सारखी सर्दी होते. शिवाय पौरुषत्वावर
विपरीत परिणाम होतो. मानसिक स्थिती ठीक राहत नाही. चिडचिडेपणा वाढतो. सर्व कुटुंबावर
दीर्घ असा अनिष्ट परिणाम होतो. स्त्रियांनी मासिक धर्माच्या चार दिवसात कोणतेही महत्वाचे
निर्णय घेवू नयेत. कारण तेव्हा स्त्रियांची मानसिक अवस्था सुदृढ नसते. चार दिवस तान्ह्या
बाळालाही हात लावू नये.
एकदा गाणगापूरला मुंबईच्या काही महिला भक्तांच्या हट्टाखातर फक्त महिलांची
बैठक घेतली होती. त्यावेळी मुंबईत राहणाऱ्या महिलांना चार दिवस पाळणं किती अशक्य आहे
हे महिला भक्तांनी सांगितलं. तेव्हा सद्गुरुंनी चार दिवस अन्न शिजवू नका असे सांगितले.
यजमानांना वरण-भात करायचे शिकवा व चार दिवस सगळ्या कुटुंबाने भात खाऊन राहावे असे सांगितले.
आपल्या देवस्थानांत विद्वत सभा होत असे. त्यामध्ये वेदमूर्ती सहभाग घेत. तेव्हाही स्त्री
भक्तांनी जागेची अडचण, वेळ, बस / लोकलची घाई असे अनेक प्रश्न मांडले. त्यांनाही गुरुदेवांनी
उत्तरं दिली. त्यांनी तर स्त्रियांना आवाहनही केले की शास्त्राच्या कसोटीवर अनुभव घ्या.
तुम्ही चार दिवस पाळून पहा आणि मग मते नोंदवा. सद्गुरुनाही ती उत्तरे योग्य वाटली.
पूर्वीच्या काळी शास्त्रे पाळत त्यामुळे समाजात एकमेकांना मदत करण्याची प्रवृत्ती होती.
आज शास्त्र जाणणारे व आचरणारे कमी आहेत. विज्ञानाच्या कसोटीवर निर्णय घासून पहा.
आज काळ बदलला आहे. स्त्रिया अर्थार्जनासाठी बाहेर पडताहेत. स्त्रियांनीही
उच्च विद्या विभूषित असावे. त्याही चांगले व्यवस्थापन करू शकतात. परंतू त्यांनी प्रथम
प्राधान्य कुटुंबाला द्यावं. उत्पत्ती, हे स्त्रीला वरदान आहे. आपल्यावर कुटुंबाची
काय जबाबदारी आहे याचा तिने विचार करावा. पती-पत्नी दोघांनी अर्थार्जनासाठी घराबाहेर
पडणे ही काळाची गरज आहे. पण स्त्रियांनी ही गरज कुटुंबाच्या आवश्यकतेनुसार ठेवावी.
पहिले प्राधान्य कुटुंबाला द्यावे. मुले मनानी खंबीर होण्यासाठी त्यांना आईच्या सहवासाची
गरज असते. एका कुटुंबात जबाबदारी घेणारे आजी-आजोबा व इतर लोक असतात. त्यावेळी तुमचे
कर्तृत्व जरूर दाखवावे. पण सध्याच्या युगात मुलांना एकटे किंवा नोकराकडे ठेवून काम
करणे अवघड आहे. मुलांच्यावर काय संस्कार होतात ते पहा. घरात सगळ्या कामाला बाई ठेवावी
पण स्वयंपाक गृहिणीने स्वतः करावा. स्वयंपाकाच्या बाईचे लक्ष काम उरकण्याकडे असत. तिच्या
घरातही कटकटी चालू असतात. या गोष्टींचा विचार तिच्या डोक्यात सतत असतो. या उलट घरातील
स्त्री ही घरातील लोकांच्या आवडी प्रेमाने जपते. मुलाने किंवा कुटुंबातील व्यक्तीने
प्रेमाने जेवावे हीच तिची इच्छा असते. ज्या प्रकारचे अन्न माणूस खातो त्या प्रकारचं
त्याचे मन बनते. स्त्रीने कुटुंबातील काय पण कोणलाही जेवायला घालताना चांगले खायला
घालावे. माणसाच्या शरीरातील पिंड अन्न मागतो हे लक्षात घ्यावे. तुमच्याकडे तो जेवायला
का मागतो हे लक्षात घ्यावे. त्याची इच्छा, वासना तृप्त होणे गरजेचे आहे. दुस-याला वाढताना
चांगलेच अन्न वाढावे. तृप्ती येणे महत्वाचे आहे. अन्नाची वासना राहणे चांगले नाही हे
फार मोठे शास्त्र आहे.
स्त्री अर्थार्जनासाठी बाहेर पडते पण तिथेही तिने सर्वत्र अंतर ठेवून
वागावे. कार्यालयात अनेक प्रकारचे पुरुष असतात. सगळ्यांच्याच नजरा चांगल्या असतात असे
नाही. कार्यालयात स्त्रीला नजरेने स्पर्श करणारे, काही हाताने स्पर्श करणारे महाभाग
असतात. म्हणून स्त्रीने कार्यालयात कामकाज सांभाळताना येणारे अशा प्रकारचे अनुभव घरातील
व्यक्तीला सांगावेत. काही महाभाग स्त्रियांमधील उणीवा हेरून गैरफायदा घेण्याचा प्रयत्न
करतात. स्त्रीने हरिणीप्रमाणे सावध असावे. कार्यालयातील पुरुषांशी हा हा हू हू करून
हसणे, त्यांच्या हातावर टाळी देणे असे सगळे प्रकार एक प्रकारच्या व्याभिचारात
मोडतात. स्त्री मनाने चंचल असते. तिला भान राहत नाही. तिच्या कमकुवतपणाचा फायदाही घेतला
जातो. याचा परिणाम तिच्या मनावर होतो. म्हणून स्त्रियांनी नोकरीवरून घरी आल्याबरोबर
स्नान करावे. घरातले स्वच्छ कपडे घालावेत, देवाला नमस्कार करूनच स्वयंपाक घरात जावे.
गरबा हा माया आणि ब्रम्हाचा खेळ आहे. त्यामध्ये खेळणाऱ्या मुला-मुलींची
वये ही जास्तीत जास्त ९ वर्षांपर्यंत असावीत. ९ वर्षानंतर रजोगुणाचा प्रवेश होतो. त्यानंतर
हा खेळ खेळू नये. कुठलीही मुलगी वयाच्या ९ वर्षांपर्यंत कुमारिका म्हणून पूजेसाठी योग्य
असते. त्यानंतर कुमारिका म्हणून पूजेला तरी चालत नाही. कुलधर्माच्या श्राद्धाच्या स्वयंपाकासाठी
सवाष्ण स्त्रीच चालते. काही स्त्रिया म्हणतात की सवाष्ण नसली तरी पुत्रवती आहे. ती
कुलधर्म व श्राद्धाच्या स्वयंपाकाला चालते पण ते चुकीचे आहे. लग्न न झालेल्या व राजोधर्म
येणाऱ्या स्त्रीचाही स्वयंपाक नैवेद्याला चालत नाही. नैवेद्याचा स्वयंपाक करतांना व
वाढतांना ९ वारी साडी नेसावी त्यामुळे शरीर धर्मावर नियंत्रण येते. शरीर धर्माची भावना
आली तरी थंड पाण्यात स्नान करावे. असे झाले नाही तर अन्नाला दोष लागतो. अन्न दूषित
होते.
आजकाल स्त्री-पुरुष समानता हा प्रकार असल्यामुळे स्त्रिया म्हणतात, 'आम्ही
सगळा स्वयंपाक करतो मग नैवेद्य पुरुषांनीच का दाखवायचा?' याचे कारण स्त्री स्वतः अन्न
तयार करते तेव्हा ते करतांनाच त्या पदार्थाची चव आठवते. त्या चवीची तिच्या मनात अपेक्षा
असते. शबरीची उष्टी बोरे म्हणजे तिने चाखून पहिली नव्हती. तर प्रत्येक बोर गोड असो
अशी कल्पना करून निवडून आणली होती. तिचे मन त्या बोराच्या चवीत गुंतले होते. तसेच स्त्रीचे
असते. हे देवाला आवडेल, ते आवडेल हे तिचे गुंतणे असते. याउलट पुरुषाला याचा काहीच गंध
नसतो. त्यामुळे तो समर्पण भावनेने नैवेद्य दाखवू शकतो. याचा कृपालाभ सगळ्या कुटुंबाला
होतो. कुलधर्म, कुलाचार सर्व कुटुंबाने मोठ्या आनंदाने व एकत्रितपणे साजरे करावेत पण
हे सगळे घरच्या स्त्रीवर अवलंबून आहे.
उपासनेची गोष्ट अशीच आहे. उपासनेने देहशुद्धी होते आणि मग आपल्याला अध्यात्मिक
अनुभव येऊ लागतात. घरातील स्त्री जर नित्य उपासना करीत असेल तर तिचे सत्वतेज वाढते.
त्यामुळे गृहस्थाश्रमातील आतिथ्य, अन्नदान इ. कर्तव्ये व्यवस्थित पार पडतात. त्यामुळे
वास्तूशुद्धी, अन्नशुद्धी होतेच. कुटुंबातील लोक सात्विक होतात. एका स्त्रीवर केवढी
जबाबदारी असते. सुळक्यावरून चालायचे पण तोल ढळू द्यायचा नाही आणि तरीही रस्ता पार करायचा.
म्हणून तर आपल्या संस्कृतीत तिला माता म्हणतात. तिला उच्च स्थानी मानले आहे.
परंतू स्त्रीने उपासना, अध्यात्म साधना या गोष्टींचा अतिरेक करू नये.
१९८२-८३ सालची गोष्ट असेल. मुंबईचा एक तरुण मुलगा सद्गुरूंच्या दर्शनाला आला व म्हणाला,
'ईश्वर वगैरे जगात असेल पण तो काही चांगला नाही. तो सगळ्यांच वाईटच करतो.' सद्गुरू
त्याला म्हणाले, 'अरे तुझं काम काय? तुला असा काय अनुभव आलाय की देवाला वाईट म्हणतोस?
तुला तर अजून मिशाही फुटल्या नाहीत. देवाला नांव ठेवू नकोस. तुझे आई-बाबा कोठे आहेत?
तू कोणाबरोबर दर्शनाला आला आहेस?' प. पू. सद्गुरूंच्या प्रेमळ चौकशीने तो गहिवरला व
रडायला लागला. त्याने सांगितले की त्यांची आई श्री कृष्ण भक्त आहे. सकाळी उठल्यावर
श्रीकृष्णाच्या काकड आरतीपासून पूजेला लागते. मला कॉलेजसाठी सकाळीच घराबाहेर पडावे
लागते. बाबांनाही ऑफिससाठी सकाळीच लोकल ट्रेन पकडावी लागते. पण तेव्हा आई पूजेत व्यस्त
असते. त्यामुळे आम्हाला जेवणाचा डबाही मिळत नाही. आम्ही काही बोललो तर म्हणते देवाचे
सगळे वेळच्या वेळेवर झाले पाहिजे. नाहीतर देवाचा कोप होईल. संध्याकाळी घरी आलो तर सायंपूजा
चालू असते. कितीतरी वेळाने ती स्वयंपाक करते. मग आम्ही जेवतो. माझे फार हाल होतात.
रोजच बाहेरचे अन्न खाऊन माझ्या चेहऱ्यावर फोड आलेत. बाबाही पचनाच्या विकाराने आजारी
असतात. आमचे हाल होतात. शिवाय आम्ही कोणालाही घरी बोलावू शकत नाही. त्यामुळे मला फार
राग आलेला आहे. देव हे थोतांड आहे असेच वाटते.
सद्गुरुंनी त्याला सांगितले, 'तुझी आई ज्या मूर्तीची पूजा करते ती बाजूला
काढून ठेव. सकाळी उठल्यावर ती त्रागा करेल तेव्हा तिला माझ्याकडे घेऊन ये.' त्याप्रमाणे
तो मुलगा आईला सद्गुरुंकडे घेऊन आला. सद्गुरुंना ती सांगू लागली, 'मी कृष्णभक्त आहे.
असे वागले की देवाचा कोप होतो.' सद्गुरू म्हणाले, 'मी सांगितले त्याला मूर्ती उचलून
ठेव म्हणून. कारण श्रीकृष्णानी मला सांगितलं की मला आता या बाईच्या उपचारांचा कंटाळा
आलेला आहे. अहो तुमचं कर्तव्य काय? तुम्ही करता काय? हे दोन जीव उपाशी राहतात आणि तुम्ही
उपासना कसली करता? स्त्रियांचे प्रथम कर्तव्य हे आहे की घरातील मंडळीना पोटभर आणि वेळच्यावेळी
खायला द्यायचे. एखादवेळेला तब्येत ठीक नाही, काही सणवार आहे तर ते समजू शकतात. पण रोज
असे वागणे देवाला मान्य नाही. मुलाच्या प्रकृतीकडे लक्ष द्यायला वेळ नाही. हे योग्य
नाही. त्याच्या काही अडी-अडचणी असतील तर त्या कोण पाहणार?' अशी परखड कान उघडणी केल्यावर
ती स्त्री जागेवर आली. तुम्ही देवाचं इतकं करता आणि मुलगा नास्तिक बनत चाललाय. दिवसभरातील
सगळी कामे संपल्यावर स्त्रियांनी देवांचे नुसते स्मरण केले तरी देवांपर्यंत पोहोचते.
कारण स्त्रीयांच्या मनात सारखे घरातले विचार असतात. कोण शाळेत गेलाय, कोणाचा डबा भरायचाय?
कुकरच्या शिट्टी किती झाल्यात, गॅस संपलाय. एक ना अनेक गोष्टी तिच्या डोक्यात चालू
असतात. ती कधी स्थिर चित्ताने देवासमोर बसणार म्हणून तिने देवाची नुसती आठवण काढली
तरी ती देवाला पोहोचते.
काही स्त्रिया नवस बोलतात की माझी कूस उजवू दे. माझं पहिलं मुल मी तुला
अर्पण करेन. आपल्या आश्रमातही असंच झालं. एक बाई तान्ह्या बाळाला घेऊन दर्शनाला आली
आणि म्हणाली, 'मी आपल्याला नवस केला होता की मला पाहिलं मुल झालं की आपल्याला अर्पण
करेन.' त्याप्रमाणे मी बाल आपणाला अर्पण करायला आणले आहे. मी तिला सांगितले की, 'तुमच्या
नवसाचा अर्थ तुमच्या लक्षांत येतोय का? तुमचं अपत्य मला अर्पण करायचं म्हणजे त्याला
देव कार्याला लावायचं. त्याला ईश्वराविषयी गोडी लावा. भजन-कीर्तन शाळेत घाला. देवाला
मुल सोडायचं म्हणजे वाऱ्यावर नाही सोडायचं. तर त्याला ईश्वर सेवेत गुंतवायचं. लोकांना
'देवाला सोडणे' याचा अर्थ कळत नाही. अशा प्रकारे देवाला जर मुल सोडलं तर त्याचे पालन-पोषणा
अभावी किती हाल होतील अशी देवाला सोडलेली मुले मोठ्याप्रमाणावर वाममार्गाला लावली जातात.
अशी संतती वाऱ्यावर न सोडता आपलं उद्दिष्ट सफल व्हावं म्हणून डोळ्यात तेल घालून लक्ष
ठेवावं. काही स्त्रिया मुलींकडे नीट लक्ष ठेवीत नाहीत. मुलीला आईने आंतर जातीय विवाहाला
परवानगी देणे म्हणजे तिला वाममार्गाला लावले असाच त्याचा अर्थ होतो. आई जवळ मुले मनमोकळेपणाने
बोलतात. तिला थोडेजरी गैर वाटले तरी तिने मुलांना धाक दाखवावा. मुले नियंत्रणाबाहेर
जात आहेत असं लक्षात आलं तर पतीची मदत घ्यावी. घरातील वडिलधा-यांना सांगावे. नंतर अश्रू
गाळण्यापेक्षा आधीच हे करावे. मुलांनी ऐकावे म्हणून आईने मुलांसमोर मतभेद व्यक्त करू
नयेत. मुलांसमोर हमरी-तुमरीवर येऊ नये. मातृत्व आणि पितृत्व निभावणे अवघड आहे.'
स्त्रियांनी ज्योतिष शास्त्राचा अभ्यास जरूर करावा, नित्य पंचाग वाचनही
शिकावे पण पत्रिका पाहून भविष्य सांगू नये. आपणही कोणा स्त्रीला भविष्य विचारू नये.
स्त्रीला गुरु करू नये. याचे कारण म्हणजे मासिक धर्मामुळे उपासना खंडित होते. ज्योतिष
सांगणे काय किंवा गुरुपदाला प्राप्त करून घेण्यासाठी अखंड अशी प्रखर उपासना करावी लागते.
देह तप्त होऊन तो शुद्ध झाला पाहिजे. त्यासाठी तेवढी प्रगल्भता यावी लागते. गुरूपदावर
आरुढ झाल्यावर कठोर निर्णय घ्यावे लागतात. ज्योतिष सांगितल्यावर त्याची जबाबदारीही
येते. गुरुंनी नुसतेच भविष्य सांगायचे नसते तर त्यांना भविष्य घडविण्याचाही अधिकार
असतो. स्त्रियांना माया, ममत्व फार असतं आणि त्यांच्यात भाबडेपणा असतो. त्यामुळे कठोर
हा शब्द त्यांच्याकडे नसतो. शिवाय त्या स्वतःच दुसऱ्यावर अवलंबून असतात. त्या गुरुपदावर
आरूढ होवून भक्तांना काय आधार देणार? एखाद्या संकटाने त्या हतबल होतात त्या काय दुस-याचे
संकट निवारण करणार? पण स्त्रियांनी मनावर घेतले तर त्या व्रतवैकल्ये चांगली करतात.
सोळा सोमवार, प्रदोष व्रत, निर्जळी एकादशी ही शास्त्रसंमत व्रते आहेत. पण पांढरे बुधवार,
वैभवलक्ष्मी व्रत, मिठाच्या चतुर्थी या व्रतांना शास्त्रीय आधार नाही. स्त्रिया गतानुगतिक
असतात. एका स्त्रीने व्रत केले की दुसरीही करते. देवीच्या नवरात्रात बऱ्याच स्त्रिया
स्वतः देवीसारखे सजून देवीच्या दर्शनासाठी जातात. रोज विडा खातात. पण विडा तमोगुणी
आहे व उपवासाला चालत नाही. मुळात आपल्या देवता ह्या कुमारिका स्वरूपात आहेत. त्यांची
वय ९ वर्षांच्या आतली आहेत. साडीचोळी आणि मंगळसूत्र हे आपण तिचा मान म्हणून तिला अर्पण
करतो. नवरात्रात स्त्रिया रोज एकेका देवीच्या दर्शनाला जातात. असे मंदिरे हिंडून काहीच
प्राप्त होत नाही. आपल्या कुलदेवतेची एकाग्रतेने सेवा करयची असते. ती शिवशक्ती एकच
आहे. फक्त तिने स्थानपरत्वे वेगवेगळी रूपे घेतली आहेत.
यामुळं मागील घराण्याचे दोष पुढील पिढीत येत नाहीत. म्हणून आपण 'कुपुत्र
जायेत क्वचित कुमाता न भवति|' असे म्हणतो. एखाद्या स्त्रिला अपंग, अर्धवट संतती होणे
यात पतीच्या घराण्यातील दोष कारणीभूत होतात. त्यात स्त्रीचा दोष नसतो. एखाद्या स्त्रीला
जेव्हा संतती होत नाही तेव्हा अगदीच शंभरातील एखाद्याच स्त्रीमध्ये शारिरीक दोष आढळतो.
जेव्हा संतती होऊ देण्यास स्त्रीची संमत्ती असेल किंवा इच्छा असेल अशा संततीला स्त्रीकडून
संरक्षण मिळते. ती त्यावर प्रेम करते. काही चुकांकडे कानाडोळाही करते. पण ही संतती
मताविरुद्ध असेल तर त्याला मायेचा त्रागा सहन करावा लागतो.
समागमाच्यावेळी स्त्री-पुरुषांनी पांढरी वस्त्रे परिधान करावीत. निळी
वस्त्रे अजिबात परिधान करू नयेत. आजकाल लग्न झाल्यावर स्त्री-पुरुष मधुचंद्राला जातात.
वधु-वरावर मंत्रोच्चारणात संस्कार केलेले असतात. अंगाला हळद लावलेली असते. अशावेळी
देवदर्शन झाल्यावर सुमारे १५ दिवसानंतर बाहेर पडावे. लग्न म्हणजे गृहस्थाश्रमाची पायरी
चढतो तेव्हा सर्व पाऊले काळजीपूर्वक टाकावीत. दुष्ट शक्तीही दाराच्या बाहेर उभीच असते.
तुमच्या गैर वागण्यामध्ये तिचे पारडे जड होते. नवीन लग्न झालेल्या मुलीने तोकडा पेहेराव
करून बाहेर पडू नये. कारण दुष्ट शक्ती पायाकडून वर सरकते. मुली मद्यपानही करतात. अभक्ष्य
भक्षणही करतात. आणि त्याचे कौतुक होते. हे ही चुकीचे आहे. स्त्री-पुरुष समानता जरी
मानत असलात तरी स्त्रीने संततीसाठी मर्यादा पाळावी. लग्न झालेल्या स्त्रीने पतीला कधीही
उपाशी ठेवू नये. भांडण झाले, झोपून घेतले, नवरा करेल, काहीतरी बाहेरून विकत आणेल, नाहीतर
उपाशी झोपेल असे समजू नका. शेवटी अग्नीला साक्षी ठेवून तुम्ही पतीला त्याच्या गुण-दोषांसहीत
स्विकारता. त्याच्या पोषणाची जबाबदारी घेता. तो कसाही वागला तरी तुमच्या कर्तव्यात
चुकू नका. यासाठी स्त्रीने आस्तिक असण्याची गरज आहे. स्त्री पतीधर्म सांभाळते, मुलांवर
उत्तम संस्कार करते.
स्त्रिया या सत्तर वय झालं तरी तारुण्यातच असतात. जसजसे वय वाढेल तसतशा
त्या जास्त नटू लागतात. खाणे-पिणे, कपडा-लत्ता सगळ्याचा तिचा मोह वाढत जातो. म्हणूनच
गृहस्थाश्रमी पुरुषाला स्त्रीच्या परवानगीनेच संन्यास घेण्याची शास्त्राज्ञा आहे. स्त्रियांना
वैराग्य प्राप्त होणे ही अवघड गोष्ट आहे. रडणे थांबल्या खेरीज वैराग्य प्राप्त होणारच
नाही. त्यामुळे स्त्रियांना ईश्वर दर्शन होणे या गोष्टीवर माझा विश्वास नाही. काही
स्त्रिया समाधी अवस्थेपर्यंत पोचल्याचा दावा करीत असतील तर तो चुकीचा आहे. स्त्रियांना
मोक्ष मिळणे फार अवघड गोष्ट आहे. अशा अवस्थेपर्यंत फारच मोठ्या स्त्रिया पोहोचल्या.
अगदी अलीकडे वासुदेवानंद सरस्वतींच्या पत्नीचे उदाहरण देता येईल. त्यांनी समाधी अवस्था
अनुभवली होती पण त्यामागे स्वामींची प्रखर तपश्चर्या होती आणि त्यांनीही पतीव्रता धर्म
निभावला. ही ईश्वराची इच्छा होती. आजकाल कोणीही स्त्रिया कुंडलिनी जागृतीच्या मागे
लागतात. त्यामुळे दारिद्र्य प्राप्तीखेरीज हाती काही लागत नाही. संत मीराबाईसारख्या
अपवादात्मक स्त्रिया मोक्षास गेल्या. त्यांची लग्न होवूनही रसामृत संसाराची चव चाखली
नाही. श्रीकृष्णभक्ती खेरीज दुसरी चव घेतलीच नाही. अहो त्या काळात नवरदेवाला, 'माझं
लहानपणीच श्रीकृष्णाशी लग्न झाले आहे व ते माझे पतीदेव आहेत. मी दुस-या कोणाचाही विचार
करू शकत नाही.' असे सांगण्याचं धाडस करणे ही सोपी गोष्ट नाही. देवांनी तिची किती कठोर
परीक्षा घ्यावी? विषाचा पेला तिने तोंडाला लावल्यावर हे राजश्री जागे झाले. द्रौपदीचे
तसेच उदाहरण आहे. वस्रहरणाच्या वेळी जेव्हा तिने वस्त्रावरील दोन्ही हात सोडून दिले
व श्रीकृष्णाचा धावा केला म्हणजे संपूर्ण शरणागती पत्करली त्याबरोबर देवाने वस्त्रे
पुरविली. म्हणजे अगदी कडेलोटाच्या परिस्थितीपर्यंत भगवंताने परीक्षा पाहिली व मग मदत
केली. मीराबाई इतकी प्रखर निष्ठा आणि संयम आज कोणामध्ये आहे?
जेव्हा जगत् गुरु अभिनवतीर्थ स्वामी महाराज श्री दत्तात्रेय निवासात मुक्कामाला
होते तेव्हा त्यांच्याबरोबर दोन दंडधारी संन्यासी होते. मी पहाटे पाहिले की ते दोघेही
बाहेर घुटमळताना दिसले. त्वरित मी सेवेक-याला पाठवून समस्या विचारली. ते फक्त म्हणाले,
'स्नान' माझ्या लक्षात आले. तेव्हा एका वयस्कर स्त्री भक्ताला मी दत्तात्रेय निवासात
राहायची परवानगी दिली होती व त्या मागे झोपल्या होत्या. स्त्री-मग ती कोणत्याही वयाची
असली तरी तिने संन्याशाच्या स्नान आणि भोजन या वेळी उपस्थित राहायचे नाही. माझे सद्गुरू
तर प्रखर संन्यासी. ते आपल्याकडे भिक्षेला येतात. साक्षात दत्तात्रेयांच्या रहाण्याचे
हे ठिकाण. सगळीकडे पुरुष सेवेकरी. स्त्रियांना मठात मुक्कामाला परवानगी नाही. स्वयंपाक
घरात सेवा करणाऱ्या स्त्रियांनासुद्धा उत्सवाव्यतिरिक्त देवस्थानात इतर दिवशी संध्याकाळी
६ नंतर थांबायला परवानगी नाही. त्याही मला सांगितल्याखेरीज कधी कार्यालयात जात नाहीत.
माझ्याकडे कोण महिला कशाकरिता कार्यालयात गेली, कितीवेळ थांबली याची पूर्ण माहिती असते.
बँकेचे अधिकारी आले होते. म्हणाले, तुमची कॅश मोजून घ्यायला आमचे कर्मचारी येतील. तुम्हाला
आम्ही ही सेवा देवू. मी नको म्हणालो. कारण महिला कर्मचारी पाठवल्या तर काय करणार? मी
फार सावध असतो. स्वयंपाकघरात झाडणे, पुसणे, भाज्या निवडणे अशी जी जी सेवा करता येईल
ती करावी पण कार्यालात नाही. हा संन्याशाचा आश्रम आहे. येथे स्त्रियांनी कार्यालात
बसायचे नाही. इथे भगवंताचा वास आहे. मी फार मोठी तपश्चर्या केलीय, देह झिजवला, उपासमार
सोसली. त्यामुळेच तुम्हांला हे चरण लाभलेत हे लक्षात ठेवा. दत्ताश्रमाचे आचरण फार कडक
आहे. स्त्रियांना कधीही अस्पर्शवेळ येऊ शकते. त्यामुळे मर्यादा सांभाळा. इथे स्वयंपाकघराखेरीज
कोठेही महिला सेवेकरी नाहीत. गुरुकृपा ही ऊब आहे. स्त्रियांनी मर्यादा ओलांडली तर चटके
बसायला वेळ लागणार नाही.
स्त्री म्हटली की डोळ्यासमोर हे सात्विक मूर्ती उभी राहाते. कपाळावर कुंकू,
काळ्या मण्यांचे मंगळसूत्र, काचेच्या बांगड्या, पायात नुपूर, जोडवी व अंगभर पदर घेतलेली
साडी. वेदांमध्ये स्त्रीचे असे वर्णन नाही. पण आपले ऋषी-मुनि फार द्रष्टे होते. त्यांनी
विचार करूनच स्त्रियांना हा पेहराव दिला. स्त्री ही अग्निस्वरूप आहे. लाल रंग हा त्या
स्वरूपाकडे निर्देश करतो. मंगळसूत्र हे तिने विवाहात स्वीकारलेल्या बंधनाची साक्ष आहे.
लाल रंगाचे ठसठशीत कुंकू, काळ्या रंगाचे मंगळसूत्र हे दुष्ट नजरेला थोडं थांबवून धरते.
हातात असलेल्या काचेच्या बांगड्यामधून जो अनाहत नाद आहे तो पुरुषांना घराची ओढ लावतो.
चांदी ही मनाची कारक आहे. स्त्रिया ती पायांच्या बोटांवर धारण करतात. त्यामुळे मनाला
कणखरपणा येतो. स्त्रियांनी टिकली लावू नये तर कुंकू लावावे. अंगभर पदर घेतलेली साडी
स्त्रीमधील सात्विकता दाखविते. पदराखाली माया असते. तो तिचा नैसर्गिक स्वभाव आहे. कलियुगाचा
प्रभाव असा की स्त्रियांमधील मार्दवता कमी होते आहे. त्यामुळे स्त्रिया केस कापतात.
त्यांच्यामधील संकोच, लज्जा कमी होत चालली आहे. असे तिने कितीही स्त्री पुरुषांपेक्षा
कमी नाही हे पटविण्याचा प्रयत्न केला तरी जसं जाईच्या वेलाला सुवासिक फुले येतात. जे
निसर्गदत्त आहे ते बदलण्याचा कोणालाही अधिकार नाही. आम्हीसुद्धा निसर्गाच्या कोणत्याही
गोष्टीत ढवळाढवळ करीत नाही. स्त्रिया खूपच हळव्या असतात. मनातील खंत कोठे व कोणाशी
व्यक्त करावी, दुःख कोठे व्यक्त करावे याचे भान राहात नाही. काही समाजकंटक त्याचा गैरफायदा
घेतात. म्हणून स्त्रिला घरात मत व्यक्त करण्याची संधी हवी. काही पुरुषांना बायकोजवळ
सगळं बोलायची सवय असते. तिच्या पोटात काहीच राहत नाही. त्यामुळे पुरुषांनी जरी बायकोचे
मत ऐकले, मत आजमावले तरी तिला सगळ्याच गोष्टी सांगू नयेत. त्यात गोपनीयता राहत नाही.
काही नवरे बायकांना तिखट-मीठ लावून स्वतःच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगतात. भाबडेपणा
आणि कमी धोरण म्हणून बायका त्यांच्यावर विश्वास ठेवतात. पण नंतर भ्रमनिरास होतो. म्हणून
घरातील मोठ्या व्यक्तीने तिला समजून घेणे आवश्यक आहे. स्त्रीचा ओढा मुलाकडे जास्त असतो,
तर पित्याचा मुलीकडे असतो. हे निसर्गाने ठरवून दिलेले आहे. नुसत्या मुली झाल्यातर पित्यापेक्षा
आईलाच जास्त खंत वाटते. ज्यांना मुलीच आहेत त्यांनी खंत करण्याचे कारण नाही. एकदा कन्यादान
झाले की ऋणानुबंध संपले. त्यानंतर देह पुण्यमार्गाने लावावा (रहाटावा). म्हणजे पती-पत्नीने
ईश्वरी कार्याला वाहून घ्यावे. दोन घराण्यांचा संबंध जोडला जातो. मुलीला संतती झाली
की त्याही घराण्याचे दोष दूर होण्यास सुरुवात होते. माहेरी आलेल्या मुलीने दोन दिवसांची
पाहुणी म्हणूनच यावे. माहेर-सासर यांच्यात आनंद कसा राहिल ते पाहावे. सासरी परत आल्यावर
माहेरचे अती गोडवे गाऊ नयेत. कारण ती आता सासरची लक्ष्मी असते. आपल्या घरच्या उणीवा
माहेरी सांगण्यात तिचाच कमीपणा आहे हे लक्षात घ्यावे. आपण कोठे कमी पडतो हे पाहावे.
स्त्रियांना बोहरणीला कपडे द्यायची फार हौस. तिला कपडे दाखवितात व नाही
तर तेच बोचके परत घरात आणून ठेवतात. याबाबतीत मी आईला सांगायचो, 'असे करू नकोस. जुन्या
कपड्यात काय जीव अडकवायचा? त्यावर काचेची किंवा जर्मनची भांडी घ्यायची. काच तर क्षणभंगूर.
जर्मनची भांडी आरोग्याला घातक. उपयोग कशाचाच नाही. फक्त मानसिक समाधान की जशी काही
खूप मोठी जहागिरी मिळवली. चांगले कपडे गरिबांना द्यावेत. गरिबांना कपडे दिले तर त्यांना
त्यांचा उपयोग होतो. उलट बोहारणीला दाखवलेले कपडे घरात परत घ्यायचे म्हणजे घरात दारिद्र्य
घेतल्यासारखेच आहे. बायकांना हे कधी कळणार?'
जर्मनची भांडी तर अन्न शिजवायला वापरूच नयेत. अन्न शिजवायला पितळी भांडी
वापरावीत. पण स्वयंपाकघर चकाचक दिसले पाहिजे असा बायकांचा हिशोब असतो. त्यामुळे पितळ्याची
भांडी वापरतच नाहीत. दूध नेहमी पितळ्याच्या पातेल्यातच तापवावे. तापलेल्या दुधाला मोठी
उकळी येऊ द्यावी म्हणजे ते जरा तांबूस रंगावर तापते. असे दूध प्यायला चांगले. दूधावर
साय आली की दूध ओतताना बायका फुंकर मारतात. दूधावर फुंकर मारली की दूध उष्टे होते.
असे दूध देवाला चालत नाही. आणि चुकून एखादा महापुरुष घरी आला तर त्याला ते दूध दिले
जाते. तुमच्या हे लक्षातही येत नाही. अशा सध्या गोष्टींमधूनही दोष वाढत जातात. पीठ
मळताना ओला हात परत डब्यात घालू नये. पाहिजे तेवढे पीठ काढून घ्यावे. उष्ट्याचा दोष
लागतो. कोणाकडून कधीही पीठ उसने आणू नये. याखेरीज स्त्रियांनी घरामध्ये पुरेसे दूध-दही
ठेवावे. घरामध्ये विरजलेले दही पाहिजे. याखेरीज खाद्यातले मीठ, गुळ व ज्वालाग्राही
वस्तू कोणाकडूनही उसने आणू नयेत. ज्या पाझरणाऱ्या वस्तू असतात त्या स्पर्श दोष आणतात.
म्हणून पूर्वीच्या बायका, 'गाडग्यात दही आणि टोपल्यात भाकरी पाहिजे' असे म्हणत. वासुदेव,
पिंगला किंवा मरीआई चा देव्हारा आल्यावर त्यांना सुपातून धान्य वाढावे. आपल्या अन्नात
त्याचे पोट भरते व आपल्या सूपाला त्यांचा स्पर्श झाला की आपला उद्धार होतो. अशी ही
देवाण-घेवाण आहे. हे फार मोठे शास्त्र आहे.
स्त्रियांना व्रतवैकल्याची फार आवड असते. एका स्त्रीने केले की दुसरी
स्त्री करते. पण त्याची शास्त्रीय माहिती घेऊन व्रत करणाऱ्या फारच कमी असतात. कोणतेही
व्रत करतांना काय करणे आवश्यक आहे व आपण काय करू शकतो याचा अंदाज घ्यावा. मगच संकल्पपूर्वक
व्रत करावे. कारण व्रत मध्ये सोडता येत नाही. सोळा सोमवार, एकादशी, प्रदोष यांसारखी
व्रते शास्त्र संमत आहेत. चातुर्मासही त्यात येतो. नवरात्र आचरण्याची विशिष्ट पद्धत
आहे. व्रतांमध्ये उपवास असतात. उपवास म्हणजे देहाला दंड देणे होय. स्त्रियांना घरातील
सर्व जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. ठराविक वेळी सर्व जबाबदाऱ्या पार पडतातच असे नाही.
त्याबद्दल स्वतः अपराधी मानू नये. परमेश्वर शेवटी भाव पाहातो. त्याच्याशी प्रामाणिक
राहा. बऱ्याच स्त्रिया उपवास करतात. व्रत करतात आणि झेपेनास झालं की आमच्याकडे येऊन
सांगतात की आता काय करायचे? मग आम्ही आशीर्वाद देतो, शक्तीही देतो. व्रत करतात तेव्हा
संकटे येतातच. परीक्षा घेतल्याखेरीज उत्तीर्ण झाल्याचे कसे कळणार? पण निर्धार पक्का
पाहिजे. कुटुंबाच्या कल्याणासाठी काही स्त्रिया कठिणातील कठिण व्रतेही करू शकतात. त्या
खरोखरच सती-सावित्री असतात. शारीरिक दृष्ट्या स्त्रीची ताकद कमी असली तरी आंतरिक शक्ती
ही तिला मिळालेली दैवी देणगी आहे. सती या शब्दात फार मोठी ताकद आहे. फार पूर्वी स्त्रिया
सती जात. आजच्या काळातही पतीच्या पश्चात कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या व घराला उर्जितावस्था
देणाऱ्या स्त्रिया म्हणजे सतीचेच रूप आहे. स्वतः सात्विक राहून सर्व सांभाळणे म्हणजे
सतीचे वाणच आहे.
स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये. गुरुचरित्र हा ग्रंथ म्हणजे वेदमंत्र
आहेत. स्त्रियांनी तो श्रवण करावा. पण वाचू नये. एक स्त्री पतीला घेऊन माझ्याकडे आली.
त्यांना वेडाचे झटके येत होते. मी विचारले, 'असे का झाले?' पण त्यांना कारण सांगता
येईना. अशा स्त्रियांना प्रश्न विचारून माहिती काढून घ्यावी लागते. तेव्हा कळते की
पतीला अर्धांग वायूचा झटका आला होता. त्यांना सालाबादप्रमाणे दत्तजयंतीला गुरुचरित्राचे
पारायण करायला जमणार नव्हते. म्हणून बाईनी पारायण केले. नवरा तेव्हापासून भ्रमिष्ट
झाला. अशी एक दोन उदाहरणे आहे. एका स्त्रीला सर्वांगावर उष्णतेचे फोड आले होते. खूप
इलाज केले. बाईंची मुलगी परदेशात होती. तिनेही तेथेही डॉक्टरांना दाखविले. पण उपयोग
झाला नाही. एक स्त्री भक्त त्यांच्याकडे निधी संकल्पासाठी गेली व तिने माझ्याकडे मार्गदर्शन
घ्यायला पाठवले. मी खोलवर चौकशी केली तेव्हा कळले की बाई श्रीसूक्ताची आवर्तने करतात.
मी त्यांना ती ताबडतोब बंद करायला सांगितली. त्या बाई वाद घालू लागल्या. मी त्यांना
सांगितले की भगवंत स्वतः विज्ञानमय आहे. त्यामुळे तुम्ही प्रयोग करून पहा. सहा महिने
तुमची उपासना बंद ठेवा. त्याऐवजी रामरक्षा, विष्णूसहस्रनाम म्हणत जा. एका महिन्यातच
बाईंची त्वचा स्वच्छ झाली. स्त्रियांनी वैदिकसूक्ते उच्चारू नयेत. याचा अर्थ असा नाही
की स्त्रियांना कमी लेखले. पण वेदमंत्रांच्या उच्चारणात जी उष्णता निर्माण होते ती
स्त्रीच्या शरीराला पेलवत नाही. स्त्रीची काया ही कोमल असते. वेदांचे उच्चारण हे घणाघाती
असते. ऋग्वेदी गुरुजींचा आवाज खणखणीत असतो. क्वचित थोडा घोगराही असतो. वेदमंत्रांच्या
उच्चारणाने स्त्रीची मार्दवता कमी होते. सृष्टी निर्माण करतांना स्त्रीकडे उत्पत्ती
दिली आहे. त्यासाठी स्त्रीमध्ये मार्दवता आवश्यक आहे. स्त्रियांनी वेदमंत्र श्रवण करावेत
पण उच्चारण करू नये.
स्त्रियांनी रामरक्षा, विष्णुसहस्त्रनाम, मारुतिस्तोत्र सर्व प्रकारची
स्तोत्र म्हणावीत. सूक्ते म्हणू नयेत. ओव्या, अभंग म्हणावेत. धर्मग्रंथ वाचावेत. सुरुवात
दासबोधापासून करावी. पण भागवतसप्ताह स्त्रियांनी करू नये, श्रवण करावा. भागवतसप्ताह
करतांना संहिता पारायण करावे लागते. जे स्त्रियांनी करू नये. कथारूप भागवत वाचायला
हरकत नाही. कधी कधी स्त्रियांना औदासिन्य येते. काही कारणांमुळे मन पोखरून निघते. अशावेळी
घरात शुद्ध तुपाचा दिवा लावावा, उदबत्ती लावावी व मोठ्याने देवांची स्तोत्रे म्हणावीत.
त्यामुळे घरातील लहरी बदलतात. वातावरण प्रसन्न होते. बहुतेक स्तोत्रे अनुष्टुप छंदात
असतात. अनुष्टुप छंद म्हणजे स्तोत्रे स्वतः म्हणायची व स्वतःच्या कानांनी ऐकायची. त्यामुळे
एकाग्रता येते.
स्त्रियांनी शिवाची पिंड, अन्नपूर्णा, बाळकृष्ण व पार्थिव गणेश म्हणजे
डाव्या सोंडेचा गणपती आणि कुलदेवतेचे टाक देवघरात असतील तरच देवांची पूजा करावी. ज्याच्या
देवघरात उजव्या सोंडेचा गणपती आहे, शाळीग्राम आहे, ज्यांचे कुलदैवत नृसिंह आहे अशा
देवांची पूजा स्त्रियांनी करू नये. कारण त्या देवांकडून येणाऱ्या लहरी स्त्रियांना
सहन होत नाहीत. त्यांना उष्णतेचे विकार होतात. काही वेळा स्त्रिया मनोरुग्णही होतात.
उजव्या सोंडेच्या गणपतीच्या उजव्या मांडीवर सिद्धी असते. म्हणजे तत्काळ फळ देणारी शक्ती
होय. त्यामुळेच फार पावित्र्य सांभाळावे लागते. स्त्रियांना अस्पर्श भावना कधीही येते.
पावित्र्य सांभाळले जात नाही. शिवाय या गणपतीला रोज दूध-साखरेचा का होईना नैवेद्य लागतो.
गरोदर स्त्रियांनी सातवा महिना लागला की शिवाच्या मंदिरात जाऊ नये. पूजा, शिवाचे व्रत
करू नये. त्यावेळी अति उर्जा व त्या अनुषंगाने येणार उष्णता गर्भासाठी नको. स्त्रिया
नामस्मरण कधीही करू शकतात. त्याला स्थल-काल, पात्रता-अपात्रता, अस्पर्श अवस्था याचे
काहीही नियम बंधन नाही. स्त्रियांसाठी सर्वात सोपा मार्ग तो आहे. पूजेची तयारी मात्र
स्त्रियांनी करून द्यावी. देवघर स्वच्छ पुसून देवाची उपकरणी घासून ठेवावीत. तेलाचा-तुपाचा
दिवा तयार ठेवावा. देवाची वस्त्रे धुवून ठेवावीत. सुगंधी फुले देठे तोडून ठेवावीत.
आपल्या वेळेनुसार गोड नैवेद्य करावा. पुरुषांनी पूजा करावी. स्त्रियांनी त्यांच्यावेळेनुसार
नित्य उपासना करावी. कधी कधी संसाराच्या धकाधकीत नित्य उपासनाही धड होत नाही. अशांनी
देवांची क्षमा मागून झोपावे. तुम्ही प्रामाणिक राहा. उगाच टि. व्ही. मालिका बघता बघता
देवाला विसरले, मग झोपतांना क्षमा मागायची असे करू नका. देव सगळे शांतपणे पाहात असतो.
टि. व्ही. मालिकेत जे दाखवतात त्यापेक्षा वास्तव भिन्न असते.
सध्याची परिस्थिती अशी आहे की कोठल्याही स्वाभिमानी स्त्रीला एकाकी जीवन
काढणे अवघड झाले आहे. आपली संस्कृती ही पुरुष प्रधान आहे. पुरुष सहसा नमते घेत नाहीत.
घरच्या चरितार्थाची संपूर्ण जबाबदारी तो उचलतो. दुसरे म्हणजे व्यवहारातील जगात वावरतांना
त्याला चटके सहन करावे लागतात. पुष्कळवेळा त्याचे चुकतही असेल पण तो नमते घेत नाही.
काहीवेळा स्त्रीचेही चुकते. सध्या स्त्रिया शिकलेल्या आणि कमावत्या असल्या तर त्याही
माघार घेत नाहीत. काहीवेळा स्त्रिया त्रागा करतात तर काही वेळा पुरुष बेफाम होतात.
बायकोवर हात उगारतात. स्त्रिया जीव देण्याची भाषा करतात. मनुष्य जन्म फार महत्वाचा
आहे. पुन्हा मनुष्य जन्म मिळेल न मिळेल याची खात्री देता येत नाही. लग्न झालेल्या मुलीने
सामंजस्याने नमते घ्यावे. आतापर्यंत ज्या घटस्फोटीत स्त्रिया आहेत त्यांचे जीवन जवळून
पाहावे. प्रत्येक लग्न झालेल्या स्त्रिला वाटते की आपला नवरा काही क्षेत्रात कमी आहे.
स्वतःकडे पण अंगुली निर्देश करावा आपण कोणत्या क्षेत्रात कमी पडतो हे पाहावे. प्रत्येक
मनुष्य काही सर्वज्ञ नसतो. प्रत्येकात काही ना काही कमी असतंच. आई-वडिलांनी महत प्रयासाने
लग्न जमविलेले असते. खूप खर्च केलेला असतो. त्यामुळे मुलीने थोडे सामंजस्याने घ्यावे.
लगेच घटस्फोटाची भाषा करू नये.
लग्न झालेल्या मुलीने नेहमी सामंजस्याने घ्यावे. कारण एक तर स्वतःच्या
आईवडिलांचा आधार सोडून नवीन घरी आलेली असते. एक लक्षात ठेवा की सध्याच्या धावपळीच्या
जीवनात स्त्री ही एकटी जगूच शकत नाही. तिची नैसर्गिक प्रवृत्तीच आधाराने जगण्याची आहे.
स्त्रियांनी कितीही शिक्षण घेतले, पैसा मिळविला तरी तिच्यात धारिष्ट्य येत नाही. पुरुषाचे
जीवन निराळे आहे. तो कसाही एकटा राहू शकतो, कारण त्याच्याकडे धारिष्ट आहे, शक्ती आहे.
नवरा-बायको जेव्हा भांडतात तेव्हा तणतण करीत माझ्याकडे येतात. मी दोघांनाही समजावून
सांगतो. परंतू ताटातूट किंवा घटस्फोटाचा सल्ला देत नाही. काही स्त्रिया लग्न झाल्यावर
मला सांगतात की मुलगा पसंत नाही किंवा मुलेही तसेच सांगतात. तेव्हा मी त्यांना विचारतो,
'एकमेकांना पाहून, विचार करूनच लग्न केले ना? एकमेकांच्या संमतीनेच लग्न केले ना? मग
आता एकमेकांना सांभाळून घेत संसार करा. हळू हळू मनासारखे होईल. पण घटस्फोट घ्यायचा
नाही.' कधी कधी स्त्रिया फारच हट्टीपणा करतात. फार ताणून धरू नये. एकदा एक स्त्री सकाळीच
दर्शनाला आली व माझ्यासमोर बसली व रडू लागली. तिने मला सांगितले की ती मुंबईत नोकरी
करते. आपली पुस्तके वाचून दर्शनाला यायची इच्छा झाली त्यामुळे ऑफिसमधून परस्पर इकडे
आले. रात्री प्रवास करून सकाळी इकडे आले. तिला चहा-पाणी द्यायला सांगितले. सेवेक-याला
तिची नीट चौकशी करायला सांगितले. त्यातून कळाले की ती नवऱ्याला न सांगताच आली आहे.
तिला इथे राहायचे होते. मी तिच्या नवऱ्याचा फोन नंबर घेऊन त्याला फोन करायला लावला.
प्रसाद भोजन झाल्यावर तिला सांगितले, 'हा संन्याशाचा आश्रम आहे. त्यामुळे तुम्हाला
येथे राहाता येणार नाही आणि इथून पुढे दर्शनाल येतांना पतिराजांना किंवा घरातल्या व्यक्तीला
घेऊन यायचे. याखेरीज सेवेक-याला सांगितले की हिचे तिकीट काढून हिला गाडीत बसव गाडी
सुटल्यावर ये. नव-यालाही फोन करून तिला कोणत्या गाडीत बसवून दिले ते सांगितले.'
अशीच एक स्त्री दुपारी दर्शनाला आली नंतर मी फिरायला निघून गेलो. फिरून
आलो तरी ती स्त्री आश्रमातच दिसली. मी सेवेक-याला जरा रागावूनच विचारले, की या इथे
काय करत आहेत? गेल्या नाहीत का? त्यांना तसे विचारल्यावर त्या म्हणाल्या, 'मी नवऱ्याशी
भांडून आले आहे आणि इथेच राहणार आहे.' त्यावर हा संन्याशाचा आश्रम असल्यामुळे तुम्हाला
इथे राहाता येणार नाही असे सांगितल्यावरही त्या जायला तयार होईनात. शेवटी पोलिसांना
फोन करतो असं म्हटल्यावर त्या गेल्या. देवाला म्हणालो, 'देवा अशी माझी परीक्षा पाहू
नकोस. मी कायमच सावध असतो.' स्त्रियांनी इतके पुढे जावून आपणास व कुटुंबास माहित नसलेल्या
ठिकाणी एकटे जाऊ नये. खरं तर एकटे जाऊच नये. त्यातून पूर्ण सुरक्षितते खेरीज एकटीने
प्रवास करू नये. आमच्या स्त्री भक्त जेव्हा उत्सवाच्या वेळेस इथून निघतात, तेव्हा त्या
घरी पोहोचेपर्यंत मी झोपत नाही. पलंगावर बसून असतो. एक जगतविख्यात गायिका माझ्या दर्शनाला
आल्या होत्या. त्या नगरला आल्या. पोलीस अधीक्षकांना माहित नव्हते. त्यांचा भाव उच्च
होता. त्या म्हणाल्या गुरुदर्शन ही माझी वैयक्तिक बाब आहे. त्यामुळे मी कोणालाही कळवले
नाही. तरीही मी सत्संगाच्या पदाधिका-यांमार्फत पोलिसांना कळवून संरक्षण मागवले. त्या
देवस्थानात दर्शनाला आल्या पण तरीही हे कलियुग आहे. इथे कधी काय होईल हे सांगता येत
नाही. मी देवस्थानच्या प्रतिष्ठेला फार सांभाळतो.
बऱ्याच स्त्रिया मला विचारतात की, आता त्यांचे वय झाले, रजोधर्म संपला,
आता त्यांना वैदिकसूक्ते म्हणण्यास काय हरकत आहे? आम्ही आता शरीराने स्वच्छ झालोय.
पण स्त्रीचे स्त्रीत्व संपते काय? मातृत्व संपते का? मार्दवता नष्ट होते का? पुरुष
आणि स्त्रियांमध्ये निसर्गत: अंतर असते. वैदिक सुक्तांच्या उच्चारणाने जी उष्णता निर्माण
होते, त्याचा स्त्रीच्या शरीरावर परिणाम होतो. तिची मार्दवता, हळुवार प्रेम, तिचा प्रसन्न
चेहरा हेच कुटुंबाला एकत्र ठेवते. मुलांना संस्कार वर्गाला पाठवायचे आणि स्वतः वैदिकसूक्ते
म्हणायची. पूर्वी कोठे संस्कार वर्ग होते? स्त्रियाच मुलांवर उत्तम संस्कार करायच्या.
मुलांचे सौष्ठव, अभ्यास, आहार सगळे घरातच सांभाळले जायचे. एकत्र कुटुंबात बालपणही जपले
जायचे. आज आईलाच वेळ नाही हे दु:ख आहे. स्त्रियांचे काम स्त्रियांनी करायलाच पाहिजे.
आज-काल स्त्रिया पौरोहित्य करतात, यज्ञयाग करतात, चितेला अग्निसुद्धा देतात. पौरोहित्य
करतांना वेदमंत्रांचे उच्चारण करावे लागते. ते स्त्रियांनी करू नये. तेच यज्ञयागाचे
आहे. तसेच मंत्रोच्चारण, वेळेचे नियोजन या अवघड गोष्टी आहेत. माझ्या असेही लक्षात आले
आहे, की स्त्री पुरोहित लग्नाच्या वेळी मंगलाष्टके म्हणणाऱ्या लोकांना आवरू शकत नसल्यामुळे
लग्न घटिकाही टळून जाते. स्त्री चितेला अग्नी देऊ शकते याचे मोठे आश्चर्य वाटते. साधी
मुंगीही न मारणारी स्त्री जात अग्नी देण्यापर्यंत धारिष्ट्य दाखवू शकते म्हणजे खरोखरच
विचार करण्यासारखी परिस्थिती आहे. स्त्रीची मार्दवता कलियुगात कमी होत आहे ही चिंतेची
बाब आहे.
नगरजवळील एका गावात एक आश्रम आहे. ज्यांचा आश्रम आहे त्यांनी समाजातील
विधवा, परित्यक्ता स्त्रियांना एकत्र ठेवले. त्यांच्याकडून शास्त्रोक्त पूजाविधी व
यज्ञयागाचे अध्ययन करवून घेत असत. गुरूगृही राहिल्यासारख्या स्त्रिया तेथे ऋषीकन्यांसारख्या
राहत असत. पुढे ते आश्रमाधिपती गेले. आता त्या स्त्रियांसमोर रोजचा व्यवहार कसा सांभाळायचा
असा प्रश्न निर्माण झाला. त्यांना कोणीतरी माझ्याकडे पाठवले. मी त्यांना आपापल्या घरी
जायला सांगितले. वाईट गोष्टींना बळी पडण्यापेक्षा घरी कष्ट करा. हा संन्याशाचा आश्रम
आहे. इथे स्त्रिया राहू शकत नाहीत. देवांनी अशी माझीसुद्धा परीक्षा पहिली पण मी फार
सावध असतो. कडक ब्रह्मचर्य सांभाळले आहे. माझ्या गुरूंच्या आज्ञेखेरीज येथे झाडाचे
पानही हलत नाही.
स्त्रियांना शास्त्रांनी जे परंपरागत उत्सव, व्रतवैकल्ये करण्याची अनुमती
दिली आहे ती त्यांनी करावीत. चैत्रामध्ये देवांचा दीपोत्सव असतो तो करावा. श्रावणामध्ये
जिवतीचे व्रत करावे. महालक्ष्मीनंतर नवरात्रव्रत करावे. संक्रांतीचे हळदीकुंकू करावे.
जेणेकरून चार बायका तुमच्याकडे येतील. संकिर्तन सगळीकडे जावे. आपल्याकडे चार लोक कसे
येतील ते पाहावे. एक लक्षात ठेवा की लक्ष्मी नेहमी बाहेरून आत येते. संक्रांतीला कचकड्याच्या
वस्तू देण्यापेक्षा दूध द्यावे. कुलधर्माला तीच तीच सवाष्ण सांगू नये. न कळत तिलाही
त्या अन्नाबद्दल वासना निर्माण होते. जसे आपण अगदी पोटभर जेवलो आणि कांद्याच्या भज्यांचा
तळणाचा वास आला तरी आपण म्हणतोच कांदा भजी चालतील. वास्तविक आपले पोट तुडुंब भरलेले
असते. पण तरीही आपल्याकडून हे उद्गार निघतात. एवढी वासनासुद्धा नैवेद्याबदल चालत नाही.
हे वासना शास्त्र फार अवघड विषय आहे. म्हणून नैवेद्याच्या ताटावर मोठे फडके झाकण म्हणून
घालतात. त्यामुळे नजरेतील वासनांना पाणी शोषून घेते व नैवेद्य निर्लेप राहतो.
बऱ्याच स्त्रिया कथा-किर्तनाला जातात. पण कितीजणी भक्तीरसात रमतात. बऱ्याचजणी
वार्ता करतात. तेव्हाही प्रपंचाच्या गोष्टीच करतात. या गोष्टी प्रपंचापासून दूर जाण्यासाठी
करायच्या. हार करतानाही नामस्मरण करावे. स्तोत्रे म्हणावीत. स्वयंपाक करतानाही नामस्मरण
करावे. स्तोत्रे म्हणावीत. प्रत्येकीने अन्नपूर्णा होण्याचा ध्यास धरावा. आपण सु-संस्कारीत
व उत्तमोत्तम अन्न बनवावे. म्हणजे खाणा-याच्या तोंडून सहज उद्गार निघतात, 'अन्नदाता
सुखी भव.'
पूर्वीच्याकाळी स्त्रिया फारशा घराबाहेर पडत नसत. घरातच रांधावाडा चाले.
मुलीला जेवढे खटल्याचे घर मिळेल तेवढे मुलीकडचे लोक निवांत होत. कारण मुलीचे वय लहान
असल्याने सासरचे संस्कार होत. घरात खूप माणसे असल्याने मुलगी सहजा सहजी कुटुंबात सामावली
जात असे. मुली उपवर झाली की घराबाहेर फार पडत नसत. त्यांना सूर्यापासून आणि चंद्रापासून
मिळणारी शक्ती उर्जा मिळत नसे म्हणू त्यांना सोने आणि चांदीचे दागिने घालत. सोन्याचे
सौर शक्तीप्रमाणे उर्जा देण्याचा गुण आहे तर चांदीमध्ये चंद्राची उर्जा देण्याचा गुण
आहे. चांदी ही चंद्राप्रमाणे मनाची कारक आहे.
।। श्री गुरुदेव दत्त ।।