"वाढदिवस" या विषयी परमपूज्य गुरुदेवांनी केलेले मार्गदर्शन-
गुरुवाणी पुष्प ७वे
(पृष्ठ क्र.२५)
वाढदिवसाची या देशामध्ये निरनिराळी पद्धत आहे. लहान मुलांचा वाढदिवस साजरा करण्यामध्ये
आयुष्य वृद्धिंगत व्हावे, त्याला सौख्य लाभावे अशी कल्पना केली जाते. राजकीय नेत्यांचे
वाढदिवस साजरे केले जातात त्यात अभिष्टचिंतन केले जाते आणि सत्पुरुषांचे वाढदिवस साजरे
केले जातात ते ईश्वरासमान असलेल्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्या जयंती रुपाने केले
जातात. हल्ली नुसते हर घातले, जे काय द्यायचे असेल ते दिले, शुभेच्छा व्यक्त केल्या
कि झाले. अशा प्रकारे वाढदिवस साजरे केले जातात. पण ही जन्मदिवस साजरा करण्याची आपली
परंपरा नाही. आपणा पाश्चात्य लोकांचे अनुकरण करतो. मग जेवढे वय झाले तेवढ्या मेणबत्त्या
लावून फुकून विझवून टाकतो. नंतर केक कापतो. वास्तविक तेज हे ईश्वराचे स्वरूप आहे. तेच
आपण नाहीसे करतो हे योग्य नाही. हे कोणी जर करत असेल तर ते करू नका. आपली हिंदू परंपरा
अशी कि, त्या दिवशी सकाळी उठल्यावर अभ्यंगस्नान(तेल लावून) घालावे, औक्षण करावे. वाढदिवसाचा
सोहळा अतिशय घरगुती स्वरुपात पार पाडावा. त्याचे जाहीर प्रदर्शन होता कामा नये. त्या
प्रसंगी जेवढे वय पूर्ण झाले असेल तेवढ्या दिव्यांनी ओवाळावे. ओवाळण्यासाठी आई, मावशी,
काकू, बहिण कोणीही चालते. जे गोडधोड आवडेल ते घरी करून खायला घालावे. हॉटेलातून आणू
नये. अधिक आनंद व्यक्त करायचा असेल तर मुलांना कपडे, दागिने करावेत. "आपल्याकडे
काहीजण तारखेने वाढदिवस करतात पण ते चुकीचे आहे. तिथीने वाढदिवस योग्य रीतीने केले
जातात". वाढदिवस साजरा करण्यासाठी वयाची मर्यादा नाही.
सद्गुरूंच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या भावना व्यक्त कराव्यात. त्या अत्यंत आदर भावनेने
व्यक्त करत जा. सद्गुरुंवरची श्रद्धा पुनः पुनः वाढावी, त्यांचे आशीर्वाद पाठीमागे
राहावेत अशी भावना व्यक्त करावी. ही परंपरा अतिशय श्रेष्ठ आहे.
||श्री गुरुदेव दत्त||