वर्धापन दिन श्रीगुरुदेवांचा !!!
।।श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नमः।।
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।।अ-४,श्लोक७।।
अर्थातच जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल तेव्हा धर्माचे अभ्युत्थान घडवून आणण्यासाठी
मी स्वतःला प्रकट करेन!
हे गीता वचन सर्वश्रुत आहे! कलीयुगात धर्माच्या नावाने जी
संभ्रमाची वादळ उठली आहेत ती मती गुंग करुन टाकणारी आहेत! कोणत्याही सामान्य माणसाला
खरं काय? आणि खोटं काय? या विवंचनेत टाकणारी आजची परिस्थिती आहे! धर्म म्हणजे काय?
तो कसा आचरावा? आपले व्यावहारिक जीवन सांभाळून त्याची अध्यात्माशी सांगड कशी घालावी?
खरा धर्म कोणता? असे एक ना अनेक प्रश्न मनुष्याच्या बुद्धीला छळताना दिसतात. मग यांची
उत्तरे तो मिळेल त्या माध्यमातून शोधू लागतो. ह्या गोंधळात तो जी मनःशांती शोधत असतो
ती मात्र त्याला कुठेच मिळताना दिसत नाही. माणसाची अध्यात्मिक प्रगती होण्यासाठी त्याला
योग्य मार्गदर्शक हवा असतो! आपली संस्कृती ही ज्ञानावर आणि ज्ञानोपासनेवर आधारलेली
आहे. आणि ज्ञान मिळवण्याचे एकच ठिकाण आहे ते म्हणजे गुरुस्वरुप!
परमेश्वर हा कार्यकारणास्तव अवतार घेतो आणि तो जेव्हा सामान्य जनांना शिकवण्याच्या
आणि उद्धाराच्या हेतूने येतो तेव्हा तो गुरुस्वरुपात येतो. आपल्या संस्कृतीला हजारो
वर्षांची गुरुपरंपरा लाभली आहे! याच गुरुपरंपरेतील एक विभूतीमत्त्व धर्मरक्षणासाठी
आणि सामान्य जनांना आधार देण्यासाठी फाल्गुन शुद्ध तृतीया शके १८५५ रोजी या भूतलावर
गुरुस्वरुपात परमपूज्य श्रीरामकृष्ण क्षीरसागर हे व्यावहारिक नाव धारण करुन अवतरले!
वयाच्या अवघ्या सातव्या ईश्वरी दर्शन झालेले आणि वयाच्या दहाव्या वर्षी ६०० वर्षांपूर्वी
श्रीशैल्य येथे गुप्त झालेल्या परमपूज्य श्रीनृसिंह सरस्वती स्वामी यांनी साक्षात मानव
रुपात दर्शन देऊन अनुग्रहीत केलेले हे गुरुस्वरुप आजही चैतन्यरुपाने अहमदनगर येथील
वेदांतनगरात श्रीदत्तात्रेय निवासात विराजमान आहे! परमपूज्य गुरुदेवांवर जेव्हा परमपूज्य
श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांनी अनुग्रह केला तेव्हा त्यांच्याकडे जे कार्य आले ते
म्हणजे धर्म सांभाळणे, धर्म समजावून सांगणे आणि वेदांत विचारांवर आधारित धर्माची स्थापना
करणे! आपली संस्कृती ही वेदांवर आधारित आहे. पृथ्वी आणि वेद हे एकाचवेळी निर्माण झालेले
आहेत! वेदांचा उच्चार चालला तर पृथ्वीवर सर्व जीवांचे पोषण होते, निसर्गातील प्रदूषण
कमी होते, पर्जन्यवृष्टी वेळेवर होते, अन्नधान्य मुबलक प्रमाणात पिकते!! एकूणच सृष्टीचा
समतोल साधला जातो! या करिता वेदांचे रक्षण आणि त्यांचे संवर्धन ही सद्यस्थितीत काळाची
गरज आहे! परमपूज्य गुरुदेवांनी या करिता "वेदांत" ही भव्य वास्तु त्याकरिता
उभारली असून चारही वेदांचे मोफत शिक्षण(कोणत्याही सरकारी अनुदाना शिवाय) देण्याची सोय
उपलब्ध करुन दिली आहे. ईश्वरीशक्ती एकदा प्रकट झाली की तिच्या छायेत येणा-या सर्वांचे
ती कल्याणच करते असे गुरुमार्गदर्शन आहे! अशाच सहिष्णू विचारांमुळे परमपूज्य गुरुदेवांचे
सर्वच जातीतील आणि धर्मातील भक्त आहेत! परमेश्वर हा सर्वत्र एकच आहे व तो केवळ शुद्ध
भावनेने अनुभवता येतो अशी गुरुदेवांची शिकवण असल्याने त्यांचा खरा भक्त जातीभेदाच्या
वा धर्मभेदाची कुंपणे स्वतःच्या व्यावहारिक जीवनात पाळत नाही.
परमपूज्य गुरुदेवांच्या मार्गदर्शनात संदिग्धता नाही, तर्ककर्कशता नाही, मोठमोठे ग्रांथिक
संदर्भ नाहीत! "धर्म" म्हणजे चांगले विचार धारण करणे आणि ते प्रत्यक्ष आचरणात
आणणे. सद्यस्थितीत धर्माची इतकी सोपी व्याख्या केवळ गुरुचरणीच अनुभवास येऊ शकते! सामान्य
जनांची मनाची अवस्था ओळखून सोप्या आणि सहज भाषेत ईश्वराचे स्वरुप परमपूज्य गुरुदेवांनी
नेहमीच वर्णन केले. यामुळे त्यांचा कोणताही भक्त भगवंताबद्दल भीती न बाळगता भक्तीयुक्त
अंतःकरणाने भगवंताला शरण जाऊन कृपा अनुभवू लागतो!
परमपूज्य गुरुदेवांच्या अविश्रांत आणि खडतर तपश्चर्येच्या प्रभावाने श्रीदत्तात्रेय
निवासात "चिंतामणी पादूकांच्या रुपाने" त्यांच्या परमगुरुंनी श्री नृसिंह
सरस्वती स्वामी यांनी निवास केलेला आहे. याची प्रचिती म्हणून या क्षेत्रात दर्शनाला
येणारा प्रत्येक जण चिंतामुक्त जीवन अनुभवतो. प्रपंच करणा-यांना प्रपंच कर्तव्य भावनेने
करा, वर्णाश्रम धर्म पाळा अशी शिकवण मिळाल्याने येणारा प्रत्येक भक्त हा कलीच्या गोंधळात
सुद्धा उत्तम प्रकारचे मानसिक समाधान मिळवतो! भक्तांनी विचारलेल्या प्रापंचिक प्रश्नांचे
तसेच दैनंदिन जीवनात कळत नकळत होणा-या चूकांवरील अचूक मार्गदर्शन परमपूज्य गुरुदेवांनी
नेहमीच सहज सोप्या भाषेत आपल्या सत्संगाचा लाभ घेणा-या प्रत्येकालाच केले. हे मार्गदर्शन
काही भक्तांनी लिहून घेतले आणि यातूनच गुरुवाणी, अमृत कलश, धर्मदर्शन आणि सद्गुरु संवाद
यांसारख्या ग्रंथसंपदेने गुरु मुखातील निघालेल्या ज्ञानपुष्पांचा आकार धारण केला. गुरुमुखातून
निघालेल्या वाणीला वेदवाणीचा अधिकार आहे! तिच्यात तिचे तंतोतंत पालन करणा-याचा उद्धार
करण्याचे सामर्थ्य आहे.
सर्वसामान्यपणे "मंत्र दिला म्हणून गुरु, दिक्षा दिली म्हणजे गुरु अशी प्राथमिक
कल्पना प्रत्येकाची असते. पण गुरु ही व्यक्ती नसून ते एक तत्त्व आहे. ते आज आहे उद्या
नाही अशी नश्वर गोष्ट नाही. ते केवळ स्मरणाने सुद्धा संतुष्ट होतात. तुम्ही कुठेही
असा! आपल्या मनात शुद्ध अंतःकरणाने जरी त्यांची गुरु म्हणून प्रतिष्ठापना केली तरी
त्या क्षणापासून ही तुम्हाला अनुभव द्यायला प्रारंभ करते" ह्या अशा विश्वासपूर्ण
मार्गदर्शनामुळे साधक कोणत्याही प्रतिकूल प्रसंगाला धैर्याने सामोरा जाण्यास सक्षम
होतो! धर्माचरण करु लागल्याने विवेक ओघानेच येतो आणि एक सुजाण नागरिक बनतो. अर्थातच
अध्यात्माद्वारे देवभक्ती आणि देशभक्ती करु लागल्याने वेगळे समाजकार्य करण्याची आवश्यकता
परमपूज्य गुरुदेवांना कधीही भासली नाही! गुरुदेव सांगत की-
"मनुष्याचे मन अंतःकरण सद्धर्मनिष्ठ होणे, तसा सतत प्रयत्न करणे, स्वतःच्या प्रयत्नाने
ते इतरांच्या अनुभवाला आणून देणे हे खरे समाजकार्य आहे."
"धर्म सांभाळणा-यांना धर्म सांभाळायला मदत करणे हे देखील धर्म सांभाळल्या सारखेच
आहे."
"सर्वांमधे सामावून सर्वांना सामावून घेणे म्हणजे सहिष्णूता"
"तुमचा प्रपंच तुमच्या प्रारब्धाने होतो, पण अध्यात्मिक प्रगती मात्र तुमच्या
कृतीने होते. त्यासाठी सद्गुरूंचे मार्गदर्शन आवश्यक आहे." ते सांगत कि, “मी
तुमचा अध्यात्मगुरु आहे. कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसून कुरमुरे मागू नका तर पूर्व सुकृताने
मिळालेल्या संधीचा फायदा घ्या व आत्मोन्नती साधा”
"संकटकाळी आपद्ग्रस्तांना मदत करणे हे पुण्य नसून ते कर्तव्य आहे मदत केली नाही
तर ते पाप ठरते"
अशा मार्गदर्शनामुळे भक्त चमत्काराच्या नादी न लागता स्वतःची अध्यात्मिक पात्रता वाढवण्याकडे
लक्ष देतो.
गावोगावी स्थापन केलेली सत्संग मंडळे ही सभासदाला अध्यात्मिक प्रगती बरोबरच आपण एका
मोठ्या कुटुंबाचे सदस्य असल्याची भावना दृढ करतात.
भगवंतांनी या भूमीवर चिंतनीय श्रीकृष्ण आणि अनुकरणीय श्रीराम म्हणून नरदेहात जन्म घेतला.
धर्म रक्षणासाठी पुन्हा पुन्हा अवतार धारण केला. याच वचनपूर्तीसाठी कलीयुगात "श्रीरामकृष्ण"
या रुपात तो पुनश्च याच म्हणजे फाल्गुन शुद्ध तृतीयेला अवतरला. जीवनात सद्गुरुंचा लाभ
होणे हे परीसस्पर्श होण्यासारखे आहे. हे चिंतामणी आपल्या आत्मज्योतीच्या स्वरुपात आजही
श्रीदत्तात्रेय निवासात विराजमान आहेत. परमपूज्य गुरुदेवांच्या संकल्पनेतून साकार झालेले
व भक्तांकरवीच धर्मभिक्षेतून उभे राहीलेले भगवान श्री दत्तात्रेयांचे त्रिभूवन सुंदर
मंदिर सर्वांसाठी मोठे आधारस्थान आहे. श्री दत्तात्रेय निवासातील चिंतामणी पादूका,
गुरुदेवांना नीलवर्णकांतीने पूर्णत्त्व आलेले अधिष्ठान व कल्पवृक्ष या ईश्वरी अस्तित्त्वाच्या
चिह्नांमुळे श्रीगुरुंचे चरित्र आणि आदिनाथांपासून सुरु झालेली श्रीगुरुपरंपरा
आजमितीपर्यंत अव्याहत सुरु असल्याची साक्ष आहे. हा कल्पवृक्ष सर्वांना आधार देण्यासाठी
अखंड उभा आहे. याच्या सावलीत येणा-याला तो कृपाछाया देईलच यात शंका नाही.
"साखर गोड आहे हे सांगता येतं पण तिची गोडी ज्याची त्यानेच अनुभवायची असते"
।।श्रीरामकृष्णार्पणमस्तु।।
-"श्रीरामकृष्ण"चरणरज