|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||


आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवागुरुस्वरुप आपण ओळखे । ऐसे ज्ञान देई सुखे।
या परते न मागे आणिके । म्हणोनि चरणी लागला ।।
(श्रीगुरुचरित्र.अ.२,ओवी २५१)


Shivswarup


जन्म आणि जन्मासाठी क्षीरसागर घराण्याची निवड- भगवंत जेव्हा विशिष्ट कार्य करण्यासाठी पाठवितात, तेव्हा घराण्याची व कुटुंबाची निवड करणे आवश्यक ठरते. ज्या कुटुंबाची निवड करुन जन्म घेतला जातो, तेव्हा त्या कुटुंबातील सर्वांचा उद्धार निश्चित होतो. परंतु हे केव्हा? जेव्हा ती व्यक्ती संन्यास घेईल तेव्हाच कुटुंबातील सर्वांचे दोष साफ केले जातात. ह्या घराण्यात देखील एक श्रेष्ठ पुरुष होऊन गेले आहेत. एकदा एका ज्योतीषाने माझी कुंडली पाहून सांगितले होते की ह्या घराण्यात एक श्रेष्ठ व्यक्ती- साधुपुरुष होऊन गेली आहे. त्या व्यक्तीला ज्योतीषाचे ज्ञान उत्तम होते. तेच ज्ञान घेऊन व इतर चांगल्या गोष्टी सोबत घेऊन आपण जन्म घेतला आहे. ह्या घराण्यात पुढेही श्रेष्ठ व्यक्ती जन्माला येण्याची परंपरा चालू राहणार आहे. ही साखळी चालू राहणार आहे आपल्या सारखेच संत व महान व्यक्ती पुन्हा पुन्हा जन्म घेणार आहेत. (अमृतकण, बैठक क्र- ३५/दि- १८-१२-१९८२, पृष्ठ क्र-१९२०)


Tarunvayatil Photo


साक्षात्कार-
१) मला वयाच्या ७ व्या वर्षी साक्षात्कार झालेली मूर्ती आहे ही. ह्या गोष्टीला ४६ वर्षांचा काळ लोटलेला आहे. मी तुम्हा लोकांशी जे बोलतो ते कधीही खोटं सांगणार नाही. अहो मला तुम्हाला खोटं सांगून काय मिळवायचं आहे. (अमृतकण- बैठक क्र-२१ /दि ५-१-१९९०)

२) कोणत्याही व्यक्तीला वयाच्या १० व्या वर्षांनंतर ईश्वरी अनुग्रह होत नाही. याचाच अर्थ ती व्यक्ती वयात येण्याच्या अगोदर ईश्वरी अनुग्रह झाला तर होतो. नाहीतर पुढे शक्यता जवळजवळ नाहीच. ईश्वरी अनुग्रह प्राप्त झाल्यावर आपोआपच सर्व विषयांचे ज्ञान प्राप्त होते. मनाला सतत आनंद मिळतो व ईश्वरी सेवा करण्याची वृत्ती होते. मनातील सर्व विषय निघून जातात. परमेश्वराला विवाहबद्ध झाल्याचे चालते. पूर्व जन्माचे ऋणानुबंध फक्त जोडले जातात परंतु पुढे संसार, प्रपंच मात्र होत नाही. ज्यांचे संसार व्यवस्थित चालू आहेत त्यांना ईश्वरी अनुभूती होत नाही. (अमृतकण-बैठक क्र-१५३ / दि- १७-१०-१९९२ पृष्ठ-७)

परमपूज्य श्री गुरुदेवांना वयाच्या ७ व्या वर्षी ईश्वरी साक्षात्कार झाला आणि त्या क्षणापासून त्यांचे अलौकिक आयुष्य घडायला प्रारंभ झाला. आजवरच्या बहुतांशी साक्षात्कारी पुरुषांची परंपरा पाहिली तर आधी तपश्चर्या मग ईश्वरी दर्शन अशी आहे. मात्र परमपूज्य श्री गुरुदेवांच्या बाबतीत मात्र हे उलट घडलेले दिसते. आधी ईश्वरी दर्शन मग तपश्चर्या आणि त्यानंतर वेदकार्य! सूर्य एकदा प्रगट झाला की प्रकाश उत्पन्न व्हायला जसा वेळ लागत नाही त्याचप्रमाणे एकदा साकात्कारी व्यक्तींनी जन्म घेतला की ज्ञान प्रकट व्हायला त्यांना वयाची आणि दशेची वाट पहावी लागत नाही.

मोटकी देहाकृती उमटे |
मग निजज्ञानाची पहाट फुटे |
सूर्यापुढेप्रगटे | प्रकाशुजैसा || ज्ञानेश्वरी अ६-४५२
ज्याप्रमाणे सूर्यापुढे प्रकाश प्रकट व्हावा तसे अशा विशिष्ट कार्यासाठी जन्मलेल्या व्यक्तींना आत्मज्ञान जन्मतःच असते त्यांना वयाची वाट पहावी लागत नाही!

तैसी दशेची वाट न पाहता |
वयसेचिया गावा न येता |
बाळपणीच सर्वज्ञता | वरी तयांते || ज्ञानेश्वरी अ६-४५३
समग्र शास्त्रेही ओठांवर येऊन उभी राहिलेली असतात! वाणीतून सारस्वत पाझरत असते! त्यांची दृष्टी देखील सात्विक आणि देह हा केवळ दर्शनातून समाधान देणारा असतो!

३) साक्षात्कारी लोकांचे महत्त्व लोकांना कळले नाही तर तो दोष त्या समाजाचा आहे. त्या श्रेष्ठ व्यक्तींचा नव्हे. ज्या समाजात ते जन्म घेतात त्या समाजाला त्यांना समजावून घेता आले पाहिजे. तशी त्यांची क्षमता असावयास पाहिजे.
-परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज (गुरुवाणी पुष्प २)

अर्थात् परमपूज्य श्री गुरुदेवांचे स्वरुप आपण जर ओळखले नाही अथवा सर्वोच्च गुरुपरंपरेतील गुरुंचरणांचा लाभ होऊन जर आपणास त्या स्वरुपाची ओळख करुन घेता आली नाही तर तो दोष आपला आहे परमपूज्य श्री गुरुदेवांचा नव्हे!

तेणे कारणे मी बोलेन । बोली अरुपाचे रुप दावीन ।
अतिंद्रिये भोगवीन । इंद्रियाकरवी ।।
अमूर्त, अव्यक्त अशा गोष्टी मूर्त स्वरुपात आणून ज्या गोष्टी केवळ अतिंद्रियशक्तीनेच अनुभवणे शक्य आहे त्या सामान्य इंद्रियाकडून अनुभवणे ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सहज करेन! असे उद्गार संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीबद्दल स्वतः काढले आहेत आणि ते सत्य करुन दाखवलेले आहेत. परमपूज्य श्री गुरुदेवांनी देखील विदेही अवस्था, प्रज्ञाजागृती या सारख्या सर्वसामान्य माणसांना केवळ कल्पनातीत असणा-या अवस्थांचे दर्शन तर घडविलेच पण नीलवर्णकांती देहात प्रकट करुन दैवदूर्लभ असे प्रत्यक्ष परब्रह्म तत्वाचे दर्शन याचि देही याचि डोळा घडविले! ही गुरुतत्वाची परमोच्च अवस्था असते. परब्रह्म तत्वाचे दर्शन साक्षात्कारी व्यक्तींना होणं ही त्यांची पूर्णावस्था असते मात्र त्या तत्वाचे दर्शन शिष्यांना घडणं ही गुरुपरंपरेतील गुरुंची साक्ष असते. आणि हे सर्व आपल्या डोळ्यांदेखतच घडले इतकंच नव्हे तर आपल्या प्रत्येक अवस्थेची कल्पना परमपूज्य गुरुदेवांनी भक्तांना वेळोवेळी दिली. पण आपली ही अवस्था अजूनही भक्तांनी ओळखावी अन्यथा भविष्यात पश्चातापाची वेळ येईल याचे सूतोवाच गुरुदेवांनी अनेकदा केले. परमपूज्य गुरुदेवांनी भक्तांशी केलेली हितगूज म्हणजेच अमृतकण हे अमृतकण वेचताना ज्या गोष्टी परमपूज्य गुरुदेवांनी स्वतःच स्वतःच्या अवस्थेबद्दल सांगितल्या त्या अशा-

गुरुवाक्य मज कारण । मातें न करी निर्वाण ।
वेंचीन आतां माझा प्राण । गुरुनिरोप करीन मी ।। -श्रीगुरुचरित्र

गुरुवाक्य हेच प्रमाण मानून जर आपली मार्गक्रमणा असेल तर प्रगतीला वेळ लागत नाही! आपल्याला साक्षात्कारी गुरुंची भेट झाली, त्यांचं मार्गदर्शन लाभलं! तरीही मनाची स्थिती दोलायमान का होते तर...

संशय धरोनि मानसी । श्रीगुरु काय देईल म्हणसी ।
त्यागुणें हा भोग भोगिसी । नाना चिंते व्याकूळित ।। -श्रीगुरुचरित्र

४) श्री दत्तात्रेय निवास येथील अनुभव किंवा श्री दत्तात्रेय निवासाकडून येणारे आदेश हे आपण शिरसावंद्य मानून त्या आशीर्वादाच्या द्वारे आपण अतिशय प्रभावित होऊन कार्य करावे असे मला वाटते. (अमृतकण-बैठक क्र-२४/अहमदनगर/१३-२-१९८३)

श्रीदत्तात्रेय निवास, श्री महालक्ष्मी मंडप आणि वेदांत वास्तू ह्या ३ वास्तूंचे महात्म्य वर्णावे तेवढे थोडे! श्री दत्तात्रेय निवासातील ईश्वरी अधिष्ठान व श्रीनृसिंह सरस्वतींनी प्रसादपावलांच्या रुपाने केलेला निवास हा श्री दत्तात्रेय निवास हे नाव सार्थ करतो तर वेदांत वास्तूंत सुरु असलेले वेदकार्य हे वेदांचे निवासस्थान असल्याची साक्ष देते. तर परमपूज्य श्री गुरुदेवांना आलेली विदेही अवस्था व नीलकांती याची साक्ष देणारी वास्तू म्हणजे श्रीमहालक्ष्मी मंडप होय! परमपूज्य गुरुदेवांचे स्वरुप समजून घेताना या गोष्टींचा उल्लेख टाळणं शक्यच नाही. कारण आजवर जे आदेश आले, जी ज्ञानगंगा अवतरली, जो संवाद घडला तो ह्याच स्थानात! त्यामुळे येथून आलेला परमपूज्य श्री गुरुदेवांचा प्रत्येक शब्द आम्हास शिरसावंद्य तर आहेच पण प्रसंगी गुरुपदेशाचा प्रसार करताना प्राणत्याग करावा लागला तरी हाचि नेम आता न फिरे माघारी असा दृढभाव राहीला तरच श्रीगुरुंची प्रसन्नता लाभण्याची शक्यता आहे.

विदेही अवस्थेकडे होणा-या वाटचालीची पूर्वकल्पना -
१) १९८८ ऑगस्ट पासून ह्या कार्याला सुरुवात होईल आणि आज जे सद्गुरु तुमच्याशी बोलतात, तुम्हाला मार्गदर्शन करतात, तुम्हाला शिकवतात हे सद्गुरु पुढे फक्त दर्शन देतील, मार्गदर्शन करणार नाहीत, सांगणार नाहीत, बोलणार नाहीत. याचा अर्थ असा घेवू नका मी ऑगस्ट उजाडल्याबरोबर हे बदल होतील असा त्याचा अर्थ नाही पण थोड्या कालावधीमध्ये ह्या देहाला विदेही अवस्था येण्याची शक्यता आहे आणि विदेही अवस्थेमध्ये न सांगण्यात सांगण असतं, न बोलण्यात बोलणं असतं. अशा प्रकारची ती अवस्था आहे पण ही स्थिती आपल्याला समजण्यास आपण पात्र होण्याची गरज असते. आपण कोण पात्र आहोत, कोण अपात्र आहोत याचा विचार करण्याची आवश्यकता नाही पण ज्यावेळेला ह्या देहाला विदेही अवस्था येईल त्यावेळेला आपली पात्रता आपल्या लक्षात येईल. (अमृतकण-बैठक क्र-६०/ ४-१-१९८५)

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्यूत्थामधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।।
(श्रीमद्भगवद्गीता अ.४, श्लोक ७) या वचनाची साक्ष-
भगवान श्रीकृष्ण या पूर्णावतारानंतर भगवंताला वाटलं की आपण मानवाची सर्वोत्तम प्राणी म्हणून उत्पत्ती तर केली. त्या देहाबरोबर मन आणि बुद्धी दिली,विवेक दिला! तरीही तो हळूहळू शिकणारा प्राणी आहे. षड्रिपू हे त्याच्या देहाबरोबरच येतात. या षड्रिपूंबरोबर कसा सामना करायचा हे त्याला कोण शिकवणार? त्याला आधार कोण देणार? त्याला आत्मोन्नतीचा मार्ग कोण दाखवणार? त्याला सनातन म्हणजे नित्य नवीन असलेल्या धर्माचं रक्षण करण्याची शिकवण कोण देणार? भगवंताला समस्त मानवजातीची दया आली आणि त्यानं मानवी देह धारण करुन गुरुस्वरुपात अवतार घेण्याचं ठरवलं!

जवळ जवळ १०० वर्षे काळ उलटल्यावर पुनः असे येणे होत असते. पुढील जन्म महाराष्ट्रातच होईल असे नाही, जे शिष्य या जन्मीचे आहेत तेच शिष्य पुढील जन्मात असतील असे काहीही नाही. सर्वसाधारण ज्या क्षेत्राचा, परिसराचा उद्धार करायचा असतो अशाच ठिकाणी आमचा पुढील जन्म होत असतो. नगरचा उद्धार होण्यासाठीच हा जन्म या परिसरात झालेला आहे. (अमृतकण क्र-१५८, दि-२७-३-१९९३)

आम्ही वैकूंठवासी । आलो याचि कारणासी । - संत तुकाराम!
परमेश्वर हा कार्यकारणास्तव अवतार घेतो.
परमात्मा हा जीवात्म्याच्या रुपाने येतो व जीवात्मा परमात्म्यात विलीन होतो.
जो राम होऊ आला होता जो कृष्ण होऊन आला होता तोच रामकृष्ण होऊ आला आहे
जिथे माझे चित्र आहे तेथे मी आहेच
अशा वचनांचा पुनरुच्चार परमपूज्य गुरुदेवांनी अनेक वेळा केला आहे.

प्रज्ञाजागृती-
तिये सिद्धप्रज्ञेचेनि लाभे । मनचि सारस्वते दुभे ।
मग सकळ शास्त्रे स्वयंभे । निघती मुखे ।। - ज्ञानेश्वरी (अध्याय ६वा)

ज्यांची प्रज्ञा सिद्ध झालेली असते. सकलशास्त्रे त्यांच्या वाणीतून प्रकट होण्याची वाट पहात उभी असतात! तेव्हा अशा मूर्तींच्या वाक्याला ईश्वरीशक्तीची साक्ष असते.

१) आम्हासारख्यांची प्रज्ञा जागृत झाली की हळूहळू बोलण्याला वेग येत असतो. एकदा वेग आला की मनात काही शिल्लक ठेवावेसे वाटत नाही. समोरची माणसे कोण आहेत हे ही पहात नाही. काही वेळेला कोणी नसतांनाही झोपेतही प्रज्ञा जागृत होते. प्रज्ञा जागृत झाली की ती समजून घेणारी माणसे जवळ हवी असतात. प्रज्ञा जागृत झाल्यावर समोर नुसता टेपरेकॉर्डर ठेवून एकट्याने बोलून ते ध्वनिमुद्रित करता येत नाही. प्रज्ञा जागृत झाली की समोर भक्त किंवा श्रोता असण्याची खुप गरज असते. जवळ असतील त्यांना आशीर्वाद मिळतील. या देहाची अवस्था समजणारी माणसे हवी आहेत. अत्यानंद झाल्यावर बोलता येत नाही हे जाणणारी ही माणसे हवी आहेत. (अमृतकण क्र-१५८, दि-२७-३-१९९३)

२) आमच्यासारख्या सिद्ध पुरुषांची प्रज्ञा केव्हाही जागृत होत असते. सर्वसामान्य माणसांना प्रज्ञा जागृत होण्यासाठी खुप काळ जावा लागतो. सर्वांचीच प्रज्ञा जागृत होत असते असे काही नाही. केवळ अभ्यासू माणसांचीच महत्प्रयासाने त्याला जेव्हा एकाग्रता लाभू लागते तेव्हाच त्याची प्रज्ञा जागृत होत असते. आमच्यासारख्या सिद्ध पुरुषांना समाधी अवस्था प्राप्त झालेली असते. प्रज्ञा ही समाधी अवस्थेनंतरची पायरी असल्यानेच ती आम्हाला प्राप्त झालेली आहे. ती प्राप्त झाल्यानेच आम्ही कोणत्याही विषयासंबंधी तुमच्याशी अधिकारपणे बोलू शकतो. (श्री आद्यशंकराचार्य जन्मोत्सव-१९९३)


Shivaswarup 2


शिवस्वरुप-
इ. स. १९९७ ते २००७ काळ अत्यंत महत्वाचा व अविस्मरणीय आहे. तुम्ही बहूदा सगळेच हा काळ पहायला असाल अगदी एखाद्याचे दैव फिरले तर वेगळेच पण तशी शक्यता कमी वाटते. मी पूर्वी सगळ्यांना नगरला सांगून ठेवले आहे की, जर कधी तुम्हाला या देहात शिवस्वरुप दिसले तर कोणीही घाबरुन जाऊ नका, मनावर ताबा ठेवा. ते दर्शन तुम्हाला केव्हाही होऊ शकेल. (याच काळात अनेक भक्तांना शिवस्वरुपात झालेली आहेत.) (अमृतकण क्र-१५८, दि-२७-३-१९९३)

सिद्धपुरुष-
१) ही व्यक्ती या शतकातील अधिकारी व्यक्ती आहे. मी जन्मानेच पूर्ण पुरुष आहे म्हणजेच सिद्धपुरुष आहे. आम्हासारख्या सिद्धपुरुषांना जे मार्गदर्शन करीत असतात त्यांना सिद्धांत अवधूत असे म्हणतात. तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनीच आमची नेमणूक केलेली असते. तुम्ही आमच्या मार्गदर्शनाप्रमाणे जीवनात बदल केलेत तर तुमचा निश्चितच उद्धार होईल.- (अमृतकण क्रमांक १८४/ २०-०५-१९९५)

नीलवर्णकांती-
समाधिसुखी केवळ । जै बुद्धी होईल निश्चळ ।
तै पावसी तूं सकळ । योगस्थिति ।।
आता या देहात अतिशय शास्त्रपूर्ण जीवन जगल्यानेव अखंड तपश्चर्येमुळे, ईश्वरी शक्ती प्रगट झालेली आहे. हे ज्ञान तुम्हाला या देहाला नीलवर्ण प्राप्त होऊ लागल्याने लक्षात आले असेलच. परंतु ज्यांना या नीलवर्ण देहाचे दर्शन होऊ शकले नाही त्यांनी स्वतःचा दर्जा वाढविणे आवश्यक आहे. ज्यांनी हा देह नीलवर्णाचा झालेला पाहिला आहे, त्यांनी मनात कोणताही संशय न आणता या देहात देवाचा-वास आहे, हे जाणलेच पाहिजे. (अमृतकण क्र-२११/दि-२-८-१९९७)


Neelkanti


या देहात ४ ऑगस्ट १९९६ रोजी कृष्णाष्टमीच्या दिवशी ईश्वरी शक्ती प्रगट झाली आहे. सर्वसामान्यांच्या लक्षात या गोष्टी येणे फारच अवघड आहे. त्या दिवसापासून या देहाला नीलवर्ण प्राप्त झाला आहे. जे भक्त भाग्यवान आहेत त्यांनाच तो दिसू शकतो. कालांतराने या देहाला तांबूस व नीळसर असा एकत्र रंग म्हणजेच शामवर्ण प्राप्त होईल. हा देह मानवाचा असल्याने देहाची प्रगती एकदम होत नाही. परंतु शक्ती या देहात प्रगट झालेली असल्याने अमृमय दृष्टीने अनेकांची दुःखे, काळज्या तसेच असाध्य रोगही बरे झाल्याचे तुम्ही पाहिलेच असेल. (अमृतकण क्र-२११/दि-२-८-१९९७)

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ।। - पसायदान

संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मकदेवाकडे जेव्हा पसायदान मागितलं तेव्हा एक दान हे देखील मागितलं होतं की- तू नेहमीच सर्वांना सज्जन आणि सोयरा हो! याचं कारण ही तसंच आहे! आपला नित्याचा असा अनुभव असतो की जो आपला सोयरा असतो तो सज्जन कधीच नसतो आणि जो सज्जन असतो तो सोयरा कधीच नसतो. पण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या बाबतीत मात्र हा अनुभव जरा निराळा आहे. ते सज्जनही आहेत आणि आपल्या सोय-याहून जवळचे देखील वाटतात नव्हे आहेतच! या चरणांशी आल्यावर तुमचे नातेवाईकांशी असलेले ऋणानुबंध कमी व्हायला सुरुवात होते व गुरु-भक्तांचे, गुरु-शिष्यांचे नाते दृढ होऊ लागते. गुरुदेवांचे दर्शन हे चंद्राप्रमाणे शीतल आहे, चंद्रावर डाग आहेत पण गुरुदेव मात्र निष्कलंक आहेत. त्यांचे तेज हे सूर्याप्रमाणे तेजस्वी तर आहे मात्र ते तापविरहीत आहे. ज्या तेजाच्या प्रकाशाने दाह न होता अज्ञानाचा अंधार दूर होतो.

वरदपिंड गुरुदेव-
सामान्य माणसाचा पिंड अनेक जन्म घेऊन प्रत्येक जन्मात निरनिराळे संस्कार घेऊन मोक्षाकडे म्हणजेच मुक्तीकडे जात असतो. परंतु अधिकारी व्यक्तीचा पिंड हा वरदपिंड असतो व ईश्वरानेच तो निर्माण केलेला असतो व तो सामान्यांच्या प्रमाणे एकसारखा जन्माला येत नसतो तर तो एकदाच जन्माला येत असतो व ताबडतोब कार्य करण्यास सुरुवात करत असतो. सामान्यांचे बाबतीत त्यांचे कार्य अर्धे आयुष्य संपल्यानंतर सुरु होत असते. सुरुवातीचे अर्ध आयुष्य अज्ञान, नास्तिकपणा, अहंकार, संशय यामुळे खर्ची पडत असते. प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण हे वरदपिंड च होऊन गेले आहेत ते पुनःपुन्हा येथे जन्माला येत नसतात. अनेक सामान्य जीव जन्माला आल्यानंतर अनंतकाळाने एखादाच वरदपिंड जन्माला येत असतो. आजच्या काळात या भूमीवर हिमालयातील पकडून ५-६ फक्त वरदपिंड असतील. ते कधीही प्रसिद्धीच्या- संपत्तीच्या मोहात अडकत नसतात, त्यामुळे त्यांची माहिती व त्यांचे श्रेष्ठत्व कोणालाही माहित नसते. (पृष्ठ क्रमांक ५)

[सध्याच्या काळात केवळ पाचच व्यक्ती या भूतलावर शिवस्वरुपामध्ये आढळतील. त्यातील चार हे पीठाधिपतीच आहेत व पाचवी व्यक्ती ही तुमच्यासमोरच आहे. - (अमृतकण क्र-२१८ / दि- १४-३-१९९८)]

तुम्ही सर्व भक्त भाग्यवान असल्याने तुम्हाला योग्य गुरु लाभले आहेत की ज्यांनी ईश्वरी शक्ती प्रत्यक्ष अनुभवेली आहे. तसेच गेल्या वर्षीच म्हणजेच १९९७ सालातील कृष्णाष्टमीपासून या देहाला नीलकांती आलेली आहे. नीलकांती याचाच अर्थ या देहात ईश्वरी शक्ती प्रगटलेली आहे. मानवी देहात ईश्वरी शक्ती प्रगटली की ती व्यक्ती हळूहळू मौनावस्थेकडे जाण्यास सुरुवात करते व त्या व्यक्तीचा देह अन्न स्वीकारणेही कमी करतो, देहाला जी नीलकांती येते त्या नीलकांतीच्या प्रभावानेच त्या मानवी देहाचे पोषण होत असते व त्यामुळेच त्या पवित्र देहाचे एकीकडे पारमार्थिक, अवतारी कार्य अखंडपणे चालूच असते. अशा महापुरुष व्यक्ती अव्यक्तातून व्यक्त रुपात येत असतात, व अशा पद्धतीने ते कार्यही करीत असतात. त्यांना त्यांचा जीवनकाळ- जीवनातील कर्तव्य या सर्वांचे ज्ञान असते. अशा महापुरुषांना पुनर्जन्म नसतो. (अमृतकण क्रमांक, २२०/पृष्ठ-५/ २३-०५-१९९८)

वरदपिंड गुरुदेव व ईश्वरी शक्तीशी एकरुपता-


Panduranga Darshan


१) पंढरपूरच्या यात्रेचेवेळी जेव्हा पांडूरंगाची पूजा चालू होती तेव्हा त्याला माझ्याकडे एक डोळा उघडून मिष्किलपणे प्रत्यक्ष पाहतांना खूप भक्तांनी पाहिले आहे. योगायोगाने त्यावेळी फोटोही काढलेला आहे.
२) कोल्हापूरची श्रीमहालक्ष्मी सुद्धा दुधाचा अभिषेक चालू असताना अनेकांनी तिला हसताना पाहिले आहे.
३) पंढरपूरलाही माता श्री रखुमाईलासुद्धा अभिषेकाच्यावेळी अनेकांनी हर्षभरित झालेली पाहिली आहे.
४) पूर्वी सुरुवातीच्या काळात श्रीक्षेत्र गाणगापूरलाही पूजेच्या वेळी निर्गुण पादूकांवर जेव्हा मी एकदा डोके टेकवण्यासाठी गेलो तेव्हा त्या पादूका चांदीच्या पेटीतून हर्षभराने वर उचलल्या गेल्या होत्या.


Ranga Panchami


५) श्री क्षेत्र नाथाद्वारला जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीवर गुलाल उधळण्याची प्रथा आहे. परमपूज्य गुरुदेव तेथे गेले असताना तेथील पुजा-याला श्री गुरुदेवांचे भगवान श्रीकृष्ण रुपात दर्शन झाले व त्याने परमपूज्य श्री गुरुदेवांवरव गुलाल उधळला.
६) द्वारकेला गेल्यावर तपोवनातील गाईंप्रमाणे तेथील गाई हंबरायला लागल्या आणि मोकळ्या सोडल्यावर धावत येऊन परमपूज्य श्री गुरुदेवांचे भोवती जमा होऊन अंग चाटू लागल्या. (गाय ही सुलक्षणी मानली जाते. तिला सत्पुरुषांची जाण असते. तिला माता म्हणण्यामागे हाच उद्देश आहे. वास्तविक परिचया शिवाय त्या कुणालाही जवळ येऊ देत नाहीत.)

ईश्वरी शक्तीला भक्ताचे भाव बरोबर ओळखता येत असतात. आता ती शक्ती या देहात प्रगटली असल्याने मलाही तुम्हाला पाहिल्याबरोबर तुमच्या मनांतले भक्ती-भाव ओळखता येतात. (अमृतकण क्रमांक, २२०/ २३-०५-१९९८)

विदेही अवस्था-
१) आता इ. स. १९९५, ते २००७ हा काळ तुमच्या सर्वांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. या काळात हळूहळू हा माझा देह विदेही अवस्थेत जाऊ लागेल. माझ्या देहाला एक प्रकारचे वेगळेच चैतन्य प्राप्त होईल व त्यांतून तुम्हाला ईश्वरी चैतन्यच लाभल्याचा आनंद मिळेल. हा काळ माझ्या आयुष्यातील उत्तरार्धाचाच काळ काळ समजा. या पुढील काळात विदेही अवस्था हळू हळू प्राप्त झाल्यावर हा देह अन्न व पाणी स्वीकारायचे कमी करेल व केवळ या देहाच्या दर्शनाने तुमची प्रगती होत जाईल. विदेही अवस्था यायला आता थोडी थोडी सुरुवात झालेलीच आहे. ही अवस्था येऊ लागली की ती व्यक्ती मौनावस्थेकडेही वळू लागते. बोलणे अगदी कमी कमी होत जाते. कमी बोलणे झाले तरी भक्तांना त्यातूनही मार्गदर्शन होत असते. (अमृतकण बैठक क्र-१८१/ दिनांक- १८-०२-१९९५ / पृष्ठ- ३)

२) ईश्वरी शक्ती या देहात प्रगटली असल्याने या मूळदेहातील- स्थूलदेहापासून सूक्ष्म देह हा पार निराळा झाला आहे. ही सध्याच्या विश्वातील एकमेव घटना आहे. त्यामुळे सूक्ष्मदेहाचे कार्य सतत एकीकडे चालूच असते. हे कार्य करताना ती शक्ती कोणताही जातीयवाद ठेवीत नाही. - (अमृतकण क्र-२२९ दि-१३-२-१९९९)

३) गुरुंचा देह तपश्चर्येने विकलांग झाला तरी त्यांच्यामधील प्रगट झालेली ईश्वरी शक्ती कधीही विकलांग होत नाही उलट ती सदैव कार्यरत असते. गुरुंच्या जीवनातील ठरलेले कार्य पूर्ण होईपर्यंत हे सतत दिसून येत असते. आजपर्यंत खूप अधिकारी पुरुषांच्या बाबतीत हेच घडत आले आहे. त्या प्रत्येकाचे कार्य असेच त्यांनी अनंत यातना सोसल्यानंतर पूर्ण झालेले आपल्याला दिसून येईल. माझ्याहीबाबत आता तोच काळ आला आहे. मनुष्य जन्म असल्याने व भक्तांची दुखणी स्वीकारल्याने अनंत यातना मला सोसाव्या लागल्या आहेत. एक प्रकारे माझे उरलेले महत्वाचे कार्य पूर्ण करण्यासाठी माझा पुनर्जन्मच झाला आहे. या देहाला कसलीच अपेक्षा नसल्याने पूर्ण वैराग्य प्राप्त झाले आहे व त्यामुळेच श्रेष्ठत्व म्हणजेच देवपण आले आहे. देवाने या देहात कायाप्रवेश केलेला आहे. त्यामुळेच या देहाला संजीवनी प्राप्त झाली आहे. (अमृतकण क्र- २३०/ २०-०३-१९९९)

४) देहाचे जे सूक्ष्मदेह, कारणदेह, स्थूलदेह प्रकार आहेत. त्यातील आमचा सूक्ष्मदेह हा फार पूर्वीच स्थूलदेहापासून पार निराळा झालेला असतो. त्यामुळे आमच्या स्थूलदेहाला होणा-या भोगांचा त्रास तेवढ्यापुरताच मर्यादित राहतो. कारणदेह आमच्या बाबतीत नसतोच म्हणायला पाहिजे. कारण म्हणजे इच्छा. अशा कोणत्याही वैयक्तिक इच्छा, आशा-आकांक्षा आमच्या जीवनात नसतातच. त्यामुळे आम्ही तुमच्यासमोर स्थूलदेहाने प्रत्यक्ष असलो तरी अव्यक्त सूक्ष्म स्वरुपात फार लांबव असतो. या देहाला विश्वव्यापकत्व आल्यानेच असे घडू शकते. (अमृतकण क्र-२५३, दि-२१-०१-२००१)

५) आमच्यासारख्या गुरुंच्या केवळ दर्शनानेही भक्ताचा उद्धार होत असतो. कारण अशा श्रेष्ठ गुरुंचे दर्शन होणे हाच भक्ताच्या दृष्टीने फार मोठा साक्षात्कार व संस्कार ही असतो. आमच्या नित्याच्या दर्शनातून, भक्तांना शांती-समाधान तर मिळतेच शिवाय त्यांचे मानसिक व शारीरिक दोषही हळूहळू नाश पावून उद्धार होत असतो. किंबहूना, यातूनच भक्ताच्या दोन्ही कुळांचा म्हणजेच माता-पित्यांच्या कुळांचाही उद्धार होत असतो, हे लक्षात घेण्यासारखे आहे. अशा अधिकारी पुरुषांचे 'दर्शन' हे 'केवळ दर्शन' कधीच नसते आणि नेमके त्याचकारणासाठी मी तुम्हाला सर्वांना येथे 'नित्य दर्शनासाठी' वरचेवर येण्यासंबंधी सांगत असतो. परंतु त्याच्यामागचे गुह्यातले गुह्य अजूनही तुमच्या कोणाच्याही लक्षात आलेले मला दिसत नाही. त्याचमुळे येथील अनेक भक्त आजही ८-८ दिवस दर्शनाला तर येत नाहीतच शिवाय बाहेरगावचेही खूप भक्त अनेक महिन्यानंतर दर्शनाला येत असतात. (अमृतकण २७४/दि-१७-११-२००२/पृष्ठ-२)


Shyam Varna Kanti


Gurudev Hand


वरदपिंड देहावरील शुभचिह्ने-
हल्ली समाजात खरे साधूत्व कोठेही पहायला सापडत नाही. आणि त्याचमुळे यांच्यापैकी कोणाच्याही देहावर ईश्वरी खुणा दिसून येत नाहीत की, यांच्यापैकी कोणाच्याही शब्दामध्ये, स्पर्शामध्ये दैवी सामर्थ्यही आढळून येत नाही. खरे पाहता, त्यामुळेच आमच्यासारख्या ख-याखु-या अधिकारी पुरुषांची समाजात निंदा, टिंगल- टवाळी केली जाते. तसे पाहिले तर ईश्वरी शक्तीने स्वतःच तुमच्यासाठी नेमलेली ही स्थानापन्न व्यक्ती आहे. व या माझ्या देहावरची सर्व लक्षणे ईश्वरी अवतारी पुरुषांची आहेत. माझ्या या हाता-पायांवर शंख, पद्म, त्रिशूळ, चक्र, ध्वज इ. चिह्ने आहेतच शिवाय माझ्या दातांची ठेवणही खास वैशिष्ट्यपूर्ण व भक्कम आहे. या माझ्या मस्तकावरील केस पांढरे दिसत असले तरी पाठीमागचे केस खालच्या बाजूने पुनः काळे होऊ लागलेले आहेत. माझी देहयष्टी व उंची ही सुद्धा खास वैशिष्ट्यपूर्ण तर आहेच शिवाय दोन्ही हातांची लांबी वाढून गुढघ्यापर्यंत होण्याकडे सुरुवात झालेली आहे. तसेच या देहाला निलकांती व दिव्यतेज प्राप्त झाले आहे. उजवा हात निळसर होऊन त्याचा तळवा डाव्या हाताच्या तळव्यापेक्षा मोठा झालेला आहे तर डावा हात व त्याचा तळवा श्वेत म्हणजे पांढ-या रंगाचा होऊ लागला आहे. म्हणजेच एकप्रकारे या देहाला लक्ष्मी-नारायणाचे रुप प्राप्त झालेले आहे. आणि असे असूनही जर कोणी या देहावर निष्कारण संशय घेत असेल तर त्याला या देहाच्या दर्शनातून काहीच लाभ होणार नाही, हे पक्के लक्षात ठेवा/ ईश्वरी शक्तीच्या अस्तित्वाची जाणीव झाल्याशिवाय तुम्हाला ईश्वराची प्रचिती, अनुभूती कधीच येऊ शकणार नाही. तेव्हा, प्रथम या शक्तीवर व ही शक्ती धारण केलेल्या व्यक्तींवर कोणताही संशय न घेता, अगदी पूर्ण अंधश्रद्धा ठेवून, त्यांचे दर्शन घ्या व पहा पुढे काय होते ते? या शतकातील ही अशी एकच व्यक्ती आहे. ती लोपली गेली की सर्वच अवघड होऊन जाणार आहे. हे लक्षात ठेवा! (अमृतकण २७४/दि-१७-११-२००२/पृष्ठ क्र-४)

आजपर्यंत फक्त पीठाधिपती शंकराचार्यांनीच मला ओळखलेले आहे. कारण त्यांना त्याचे ज्ञान व तशी दिव्य दृष्टी आहे. अर्थात् त्याच कारणाने ते येथे नित्य येत असतात.

विश्वव्यापक गुरुदेव-
माझा हा जन्म तुमच्या सर्वांचा उद्धार करण्यासाठीच असल्याने मी आजपर्यंत ईश्वरीशक्ती प्राप्त झालेली असूनही साधे- सरळ जीवन जगत आलो आहे. बालवयातच सर्व ज्ञान, ईश्वरीशक्तीचा साक्षात्कार झालेला आहे. मी आजवर त्यामुळेच तपस्वी जीवन जगत आल्याने या देहाला शिवस्वरुप प्राप्त झालेले आहे. समाजात अविवाहित माणसे खूप दिसतील पण माझ्यासारखा ब्रह्मचारी शोधूनही सापडणार नाही. हे कडक ब्रह्मचर्य पाळत आल्यानेच या देहाला तापटपणा खूप आला आहे परंतु मी त्यावरही आवर घेतलेला असल्याने या देहाला सौम्यरुप झालेले आहे व त्यामुळेच तुम्ही आज माझ्यासमोर अशा त-हेने बसू शकत आहात. मनुष्यदेहाला अशा प्रकारे प्राप्त झालेली ईश्वरी अवस्था तुमच्या दृष्टीने खरोखरीच भाग्याची आहे. येथे येणारे सर्वजण या देहाला आलेल्या ईश्वरी कांतीने, प्रथमदर्शनाने तृप्त होतात व पुनःपुन्हा दर्शनासाठी येत राहतात. असा देह कधीही नाशवंत होत नसतो. स्थूलदेह सोडला तरी सूक्ष्मदेहाने त्याचे कार्य चालूच असते. या देहाची ब्रह्मचर्य अवस्था पाहूनच शृंगेरी पीठाचे श्रीशंकराचार्य मला ब्रह्मचारी महाराज म्हणू लागले आहेत. (अमृतकण क्रमांक २८०/१८-०५-२००३)

पूर्णत्त्व-
आमच्यासारख्या गुरुंना जे या जन्मात मिळवायचे असते; ते आम्ही साध्य करीत असतोच. आमच्या पश्चात कावळा शिवणे हा प्रकार नसतो. पुन्हा जन्म नसतो. - (अमृतकण क्र-१५८/ दि-२७-३-१९९३)

लौकिक मते आम्ही जातो । ऐसे दृष्टांती दिसतो।
भक्त जनां घरी वसतो । निर्धार धरा मानसी ।।


Chintamani Paduka


।। श्रीरामकृष्णार्पणमस्तु ।।

*लेखासंदर्भातील अधिक माहितीसाठी संपर्क श्रीरामकृष्णचरणरज - 9763776339*


।। श्री गुरुदेव दत्त ।।