परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण सरस्वती स्वामींनी ११ मार्च १९७४ रोजी "श्री दत्तदेवस्थान ट्रस्टची स्थापना केली." "वेदविद्येचे संरक्षण आणि संवर्धन" हा या संस्थेच्या स्थापनेचा प्रमुख हेतू आहे. परमपूज्य गुरुदेवांनी ईश्वरी आज्ञेने वेदविद्येच्या संरक्षणाचे आणि संवर्धनाचे कार्य हाती घेतले आहे. वेदांचा विस्तार व्हावा, वेदांची महती सामान्य जनाना कळावी, वेद सामान्य जनांपर्यंत पोहोचवावेत, हे महत्वाचे कार्य आहे. या कार्याचे मूळ लक्षात घेतले तर ते हेच की लोकांना सुबुद्धी व्हावी, लोकांना या कार्याचे ज्ञान व्हावे आणि ह्या संगतीत आल्यावर त्यांच्या मनाला शांती लाभावी. वेदमंत्राच्या पठणाद्वारे शक्ती पुन्हा व्यक्त रूपाने दिसायला लागते. गुरुदेवांनी वेदपठणाची परंपरा सुरु करण्याचे मूळ कारण हेच आहे. यामुळेच वेदविद्येचे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जतन करणाऱ्या घनपाठी ब्राह्मणांचा इ.स. १९८१ पासून दत्त जयंतीला महावस्त्र आणि भरघोस दक्षिणा देऊन सत्कार करण्यात येतो.
वेद्कार्याची आज्ञा-
शिवं ज्ञानोपदेष्टारं विष्णुं धर्मोपदेशकम् |
विधिं वेदप्रवक्तारं गुरुमुर्ती त्रयं भजे ||
हे जे त्रैमूर्ती आहेत, हेच मुळात गुरु आहेत आणि याच त्रिमूर्तीनी नाना प्रकारची रूपे धारण करून आत्तापर्यंत धर्म टिकवला आहे. त्याचप्रमाणे आपलं कार्य. मला एकदा असं एक स्वप्न पडलं होतं की मी गाणगापूरमध्ये आहे आणि गाणगापूरात रस्त्याने चाललो असताना एके ठिकाणी एक संन्यासी उभे आहेत. ते तीर्थ देत होते. मी पण तीर्थाला हात पुढे केला. त्यांनी मला काय सांगितलं माहीत आहे का? ते म्हणाले, "मला तुझ्याकडून वेद शास्त्रांचं काम करून घ्यायचं आहे. तेव्हा तुला जास्तीत जास्त जेवढं पावित्र्य टिकवता येईल तेवढं टिकवं," मी जागा झालो...
आमच्या गुरुपरंपरेत असा एक नियम आहे की –
लौकिक मते आम्ही जातो | ऐसे दृष्टांती दिसतो |
भक्तजना घरी वसतो | निर्धार धरा मानसी ||
ह्या दृष्टांताचा विचार केला असता, आपल्या गुरूंनी आपल्याला प्रत्यक्ष आज्ञा दिली नसली तरी स्वप्नात येऊन सांगितलं, हे मला फार आश्चर्य वाटलं पण...
गुरुवाक्य मज कारण | माते न करी निर्वाण |
वेचीन आता आपुला प्राण | गुरुनिरोप करीन मी ||
माझ्या गुरूंनी मला घालून दिलेली आज्ञा. तसा विचार केला तर माझ्या गुरूंची आणि माझी प्रत्यक्ष भेट आहे. पण आजमितीपर्यंतही मी त्यांना कधी विचारलं नाही की प्रत्यक्ष भेटत असताना किंवा तुमची माझी भेट होत असताना देवा तु मला दृष्टान्तरुपी का सांगितलं? तो विषय मी कधीही हाताळला नाही. मला एकच माहीत होतं, त्यांनी स्वप्नात येऊन सांगितलं काय किंवा प्रत्यक्ष येऊन सांगितलं काय, त्यांच्याबद्दल आपल्याला अविश्वास दाखवायचं काय कारण आहे?
काही माणसांनी मला असं सांगितलं की, आपण ह्या विषयात पडू नका. कार्य फार अवघड आहे. पण माझी माझ्या गुरूंवर एवढी निष्ठा आहे की ज्यांनी मला स्वप्नात येऊन सांगितलं की, मला तुझ्याकडून वेदांचं कार्य करून घ्यायचं आहे. वास्तविक त्यांना मी प्रत्यक्ष विचारू शकलो असतो की, "देवा मला हे स्वप्न पडलं हे चूकीचं तर नाही न पडलं?" माझा स्वभाव असा आहे की माझ्या गुरुंनी माझ्या स्वप्नात येऊन ज्या अर्थी मला सांगितलंय की ती आज्ञा मी पाळतोय की नाही हे कदाचित पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन असेल पण मी कशाचाही विचार न करता अखंड प्रयत्न करून वेदविद्येचे कार्य हाती घेतलं आणि वेदविद्या संवर्धनाचं कार्य हाती घेऊन सुरु पण झालेलं आहे. मी माझ्या गुरूंच्या आज्ञेप्रमाणे या कार्याला सुरुवात केली आहे. "शिष्य असे असावेत की एकदा गुरूंनी आज्ञा केली की ती आज्ञा खरंच आहे का हे तपासून पाहू नये." - अमृतकण क्र-१३२, पृष्ठ २, ३
स्थापना- २१ जून १९८८, (शके १९१० – विभवनाम संवत्सर)
१९९० – वेदांत विद्यापीठाची स्थापना
वेदांच्या कार्यासाठी वेदांत ही भव्य वस्तू १९८८ साली उभारण्यात आली. सर्व वेद या ठिकाणी येऊन थांबले आहेत म्हणून या वास्तूचे "वेदांत" असे नामकरण करण्यात आले.
रचना-
वेदांत वास्तूच्या तळमजल्यावर यज्ञमंडप आहे. पूर्वी तेथे याग होत असत. परमपूज्य गुरुदेवांच्या ज्ञानसत्राच्या बैठका येथे होत. नंतर परगावच्या भक्तांच्या व विद्यार्थ्यांच्या प्रसाद भोजनाची व्यवस्था इथे होत असे. तळमजल्याच्या दक्षिणेस "बुकस्टॉल", कर्मचारी कार्यालय व ट्रस्टच्या प्रकाशनाचे भांडार होते. येथूनच ट्रस्टची विविध प्रकाशने परगावी पाठवली जात. पहिल्या मजल्यावर वेदाभ्यास करणाऱ्या छात्रांची शिक्षणाची सोय तथा निवासाची सोय करण्यात आली आहे.
पहिल्या मजल्यावर सुसज्ज ग्रंथालय आहे. दुसऱ्या मजल्यावर अत्याधुनिक सुविधांनी युक्त कार्यालय होते. तेथेच विश्वस्तांशी तसेच विविध सत्संग मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी मोठ्ठा हॉल आहे. या वास्तूत लिफ्टची सोय आहे. वेदाध्ययन कक्षांना वेदांचीच नावे देण्यात आली आहेत. उदा. ऋग्वेद मंडप, यजुर्वेद मंडप, सामवेद मंडप..
सुमारे १०० विद्यार्थ्यांची गुरुकुल पद्धतीने शिक्षणाची तसेच कपड्या-लत्त्यांची, जेवण्याची, राहण्याची व पुस्तकांची विनामूल्य सोय येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. वेदाध्यापन करण्यासाठी विद्वान आणि आचारसंपन्न आचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या वेद पाठशाळेच्या बीजाचे "वेदांत विद्यापीठाच्या" प्रचंड वटवृक्षात रुपांतर होणार आहे. ईश्वरी आज्ञेने सुरु झालेल्या या कार्याला "सरकारी अनुदान" नाही.
वैदिक धर्म -
वैदिक धर्मच सर्वश्रेष्ठ आहे कारण या ईश्वराने स्थापन केलेल्या धर्माला आलेली ग्लानि दुर करण्यासाठी ईश्वरालाच पुनःपुन्हा अवतार घेऊन पृथ्वीवर यावे लागले आहे आणि पुढेही येत राहणार आहे. हे त्याचे वचन आहे. भारताच्या भूमीवर अखंड वेदपठण चालू असल्याने भारत हा शेतीप्रधान व अध्यात्म मार्गाचा देश बनला आहे. वेदोच्चार केल्याने व धर्माचरण केल्यानेच बुद्धीला प्रगल्भता येत असते. मनुष्याच्या मनाला शांती मिळते. त्याच्या वागण्यात, दिसण्यातही बदल होत जातो. वेदविद्या कायम टिकावी व संपूर्ण विश्वाला उपयोगी पडावी यासाठी भगवंतांनी आजपर्यंत अवतार घेतल्याचे दिसून येते.
वेद ही देवांची उत्पत्ती असून ते एक स्तवन आहे. आचारयुक्त ब्राह्मणाने केलेली प्रार्थना भगवंतापर्यंत लवकर पोहोचते म्हणूनच ब्राह्मणांना पूजापाठ करायला, वेदोच्चार करायला परवानगी मिळाली आहे. ब्राह्मणांसाठीसुद्धा शास्त्रात अट सांगितली आहे की, तो ब्राह्मण 'ज्ञानसंपन्न व निष्कलंक' असावा. नुसते ब्राह्मण असून येथे चालत नाही. वाद्य ज्याला वाजविता येते त्यांनीच ते वाजवावे म्हणजे योग्य परिणाम साधला जातो. तसेच वेदोच्चाराचे आहे. ज्या व्यक्तीने वेदाध्ययन पूर्ण केले आहे अशा व्यक्तीलाच नवीन वेदपाठशाळा काढण्याचा अधिकार असतो. अज्ञानाने व केवळ पैशाच्या जोरावर अशी कृत्ये केल्यास या कार्यात कधीही यश येत नसते. वेदांच्या उच्चारणामुळे जी दैत्य शक्ती असते तिचा नाश होतो. ही दैत्य शक्ती अनेक ठिकाणी पहायला सापडते. काही लोकांच्या विचारातून, काही ठिकाणी अपघाताच्या रुपामध्ये, तर काही ठिकाणी नाशाच्या रूपाने पहायला मिळते. खोल विचार केला तर दैत्य शक्तीला नाहीसे करण्याची शक्ती फ़क़्त वेदमंत्रांतच आहे. मंत्रशक्ती कधीही वाया जात नसते, म्हणूनच सर्वांनी या कार्यात सहभागी होणे जरुरीचे आहे. धर्म कधीही कल्पनेने आचरता येत नाही. धर्म ही एक वस्तुस्थिती असून तो कृतीनेच आचरावा लागतो. धर्मरक्षण म्हणजे वेदांना जिवंत ठेवणे, वेदपरंपरा चालू ठेवणे, वेद सामर्थ्याचा अनुभव घेणे.
खरे पाहता, हा धर्म भगवंताने स्थापन केलेला आहे व ऋषीमुनींनी तसे आचरण करून सांभाळला आहे. किंबहुना तसे आचरण करून त्यांनी भगवंताकडे जाण्याची पायवाट दाखविलेली आहे.
धर्मध्वज-
वेदांत वास्तूवरील चंद्र-सूर्याने युक्त धर्मध्वज हा वैदिक धर्म आचंद्रसूर्य राहणार असल्याची साक्ष देतो.
वेदकार्याचे महत्व-
वेदांचे महत्व आम्हीच ओळखलेले आहे. देवांनी आमच्यावर जी कामगिरी सोपविलेली आहे ती चुकीची कशी असेल? वेद हे विज्ञान निर्माण करणारे आहेत आणि तेच मानवांचे कल्याण करतात. वेदांमुळे मानवाचं बुद्धीला चालना मिळते. त्यामुळे त्याला सुखाचे मार्ग शोधता येतात. वेदांमध्ये निरनिराळ्या देवता मानलेल्या आहेत व त्यांची स्तुती सांगितलेली आहे. हे मानवाच्या उपयोगी आहे, हे ज्यांना कळत नाही ते वेदांवर टीका करतात. वेदमंत्रांचे परिणाम शंभर टक्के अनुभवला येतात. तुम्हालाही त्याचा अनुभव येईल. आपण जे आचरतो ते शास्त्राला धरून आहे.
जर वेदांचे उच्चार थांबले तर मात्र कठीण प्रसंग येईल. नंतर त्याला पर्याय शोधणे कठीण जाईल. ह्या भूमीला वसुंधरेचे रुप आले पाहिजे. वेदोच्चारातून ज्या लहरी निर्माण होतात त्यांची शक्ती उपयोगी पडणारी आहे. ज्या लोकांनी भारतदेशावर स्वाऱ्या केल्या त्यांची राज्ये नष्ट झाली. भारतावरील अनेक संकटे नाहीशी झाली ती वेदांच्या उच्चारामुळेच. वेदांच्या उच्चारांचा परिणाम व्हायला वेळ लागतो, परंतु परिणाम निश्चित होतो. तुम्ही कोणत्याही श्रेष्ठ विचारांपासून दूर जाऊ नका. तुम्हाला वेदांचा अर्थ किंवा उच्चार समजला नाही तरी हरकत नाही परंतु फक्त श्रवण केल्याने देखील चांगला परिणाम पहावयास मिळेल.
आमच्या गुरुदेवांनी "वेदशास्त्राचे कार्य करायचे आहे" अशी आज्ञा आम्हाला दिली व त्यानंतर मग घटनाही घडू लागल्या. जागाही प्राप्त झाली व "वेदांत" ही इमारत निर्माण झाली. आपण "वेदांत ही जी वस्तू निर्माण केलेली आहे ती धर्माची मूल्ये सांभाळण्यासाठी आहे."
ज्यांनी आजपर्यंत आपल्यावर टीका केली असेल किंवा विरोध केला असेल त्यांनी पुढील काळात जरी आपल्याला कार्यात मदत केली तरी खूप चांगले होईल. ज्यांना वेदांचे ज्ञान आहे त्यांनी सुद्धा या कार्यात सहभागी व्हावे म्हणजेच त्यांना त्यांच्या जीवनात आनंद मिळेल व आनंद मिळाल्यावरच त्यांना वेदांची महती कळली असा त्याचा अर्थ होईल. वेदकार्य हे काही नुसते पठणकार्य नाही. वेदकार्य अखंड चालू राहिल्यावरच परमेश्वरी अवतार भूमीवर होत असतात.
आपल्याला हे देवस्थान अगदी उच्च दर्जाला नेऊन ठेवायचे आहे. आपल्याला लोक काहीही म्हणू द्यात. अशा लोकांशी आपल्याला काहीही कर्तव्य नाही. आपले कर्तव्य आपल्या कार्याशी आणी धर्माशी आहे. आतापर्यंत वेदांची पाठशाळा सुरु झालेली आहे आणि तिला विद्यापीठाचे स्वरूप द्यायचे आहे.