आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


विजयादशमी – दसरा

|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||

आश्विन महिन्याच्या पहिल्या ९ दिवसात नवरात्र उत्सव साजरा झाल्यानंतर, दहावा दिवस हा विजयादशमी, दसरा या नावाने साजरा होतो. पार्वतीने दुर्गासुराशी (महिषासुराशी) सतत दहा दिवस युद्ध करून दहाव्या दिवशी त्याला ठार मारून विजय मिळवला, त्या आनंदाप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. पार्वतीने “विजया” हे नाव धारण करून त्या राक्षसावर विजय मिळवला, म्हणून या दिवसाला “विजयादशमी” हे नाव पडले.
प्रभू रामचंद्रांनी आश्विन शुद्ध १० याचं दिवशी रावणाची “दहा शिरे हरण करून” त्याच्यावर विजय मिळवला, म्हणून या दिवसाला दसरा नाव पडले.
पांडवांनी १२ वर्षांचा वनवास व अज्ञातवासाचे तेरावे वर्ष संपल्यावर, शमीच्या झाडावर लपवून ठेवलेली आपली शस्त्रे बाहेर काढून धारण केली व शमी वृक्षाची पूजा केली, तो हाच दिवस.
नवरात्रीचे ९ दिवस आणि त्यानंतर दसरा, या दहाही दिवसांत शारदेची, महालक्ष्मीची आणि दुर्गेची पूजा होते. ही तीनही रूपे आदिशक्ती पार्वतीची रूपे आहेत. मातृस्वरुपात तिला “अंबा भवानी” म्हणतात. हीच महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती (शारदा) अशी तीन रूपे धारण करते.
कौत्सराजाच्या १४ कोटी सुवर्णमुद्रा मिळवण्यासाठी रघुराजा इंद्रावर आणि संपत्तीचा देव कुबेर यांच्यावर स्वारी करण्यासाठी आला. रघुराजाच्या सामर्थ्यापुढे आपला टिकाव लागणार नाही हे ओळखून इंद्राने कुबेराकडून रघुराजाच्या राजधानीच्या बाहेरील शमी वृक्षावर सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडविला. रघुराजाचे काम झाले, त्यामुळे त्याने इंद्रावरची स्वारी रद्द केली. रघुराजाने त्या मोहरा कौत्साला घेऊन जाण्यास सांगितले. कौत्स १४ कोटींपेक्षा जास्त मुद्रा घेईना. आणि दिलेले दान परत घ्यायचे नाही. म्हणून राहिलेल्या मुद्रा रघुराजादेखील घ्यायला तयार होईना. शेवटी कौत्साने शमी वृक्षाखाली असलेल्या त्या मुद्रा लुटून नेण्यास सर्व नगरवासियांना सांगितले. तेव्हापासून दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने लुटण्याची व त्यांच्या रूपाने एकमेकांना सोने देऊन आनंद व्यक्त करण्याची प्रथा पडली.
पेशव्यांच्या काळात दसऱ्याचा हा दिवस “सीमोल्लंघन” किंवा “शिलंगणाची स्वारी” ह्या नावाने अत्यंत थाटात साजरा होत असे. उत्तर भारतीय लोक दसऱ्याच्या दिवशी रावणाची भव्य प्रतिमा करून ती जाळतात. पार्वतीचे रूप “शारदा” हे असल्यामुळे या काळात “शारदोत्सव” देखील साजरा केला जातो आणि विद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. भारतीय उत्सवांच्या दिवसांमध्ये या विजयादशमीच्या उत्सवाला एवढे महत्त्व आहे की जे साडेतीन मुहूर्त अत्यंत पवित्र मानले जातात, त्यापैकी हा एक मुहूर्त.

कोजागिरी पौर्णिमा
आश्विन महिन्यातील पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात. या पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हणतात. या पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मीदेवी भूतलावर रात्री १२ वाजता अवतरतात. यावेळी चंद्र माथ्यावर जेव्हा येतो तेव्हा त्याचे अमृत किरण दुधात घेऊन ते अमृतपेय म्हणून सर्वांनी ग्रहण करावे अशी प्रथा आहे. त्यामुळे असाध्य व्याधी नाहीश्या होतात. लक्ष्मी बरोबरच या रात्री इंद्रादी देवगण भूतलावर येऊन सर्वत्र फिरत असतात. ते “को जाग्रति?” असा प्रश्न विचारून जे लोक जागे असतील त्यांच्यावर कृपा करून द्रव्यादी ऐश्वर्य देतात.


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy