आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा



भगवान शंकर


।। श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ।।

शं करोति इति शंकर: । 
शं म्हणजे कल्याण. कल्याण करणारे शंकर भगवान असा खरा या शंकर शब्दाचा अर्थ आहे. देवदेवतांमध्ये भगवान शंकर हीच मुख्य देवता आहे. शिवोपासना करण्याचे विविध मार्ग आहेत. उदाहरणार्थ शिवलीलामृताचे पठण करणे, ॐ नमः शिवाय । या मंत्राचा कमीत कमी १०८ वेळा जप करणे, श्रावणी सोमवार करणे, रुद्राभिषेक करणे इत्यादी. 
भगवान श्री शंकराला पाणी अतिशय प्रिय आहे. म्हणून त्याच्यावर सतत अभिषेक केल्याने तो लवकर प्रसन्न होतो. याच कारणाने जिथे शंकराची पिंड असेल तेथे पाण्याची संतत धार पडावी अशी व्यवस्था करण्यात येते. वनगाय ही पवित्र मानलेली असल्याने पिंडीवर दुधाने अभिषेक करण्यापेक्षा वनगाईच्या शिंगातून पाण्याचा अभिषेक केला तर तो शंकराला जास्त आवडतो. " स्फटिक" हा एक प्रकारचा दगड आहे तो संपूर्ण पारदर्शक असल्याने त्याला शंकराचे रुप मानले जाते. त्यावरही दुधाचा अभिषेक करतात. भगवान शंकराला धोत-याचे फूल हे पांढरे व पारदर्शक असल्याने ते प्रिय असते. तो स्मशानवासी असल्यामुळे त्याला भस्म प्रिय असते. शिवाय रुद्राक्ष पण प्रिय आहे. 
भगवान शिवाच्या आयुधांचा जर विचार केला तर ज्या वेळी तो शिव व्यक्त होतो म्हणजे समजा पृथ्वीचा नाश व्हायची वेळ आली असेल किंवा दुष्टांचं पारिपत्य करायचं असेल त्या वेळी जे रुप तो धारण करतो त्यासाठी ती आयुधं आहेत. त्यालाच रुद्रावतार असं म्हटलं जातं. रौद्र अवताराचं प्रतिक म्हणून त्रिशूल आणि डमरू ही आयुधं हातात धारण केली आहेत. दैत्य प्रवृत्ती असणा-यांचा नाश करताना त्याला तसाच आकार धारण करावा लागतो. त्यावेळी रौद्र स्वरुपच घ्यावं लागतं. रौद्रावतार धारण केला तरच दैत्यांचा नाश होतो. त्रिशूल हे तिन्ही लोकांसाठी आहे.
नृत्य करणारा नटेश्वर - एका हातात अग्निज्वाळा घेतलेला, तर दुस-या हातात डमरू घेतलेला असा तो शंकर आहे. तेही एक प्रकारचं रुपच आहे. मात्र तांडव हे स्वरुप रौद्र ह्या अर्थाने आहे. रुद्र म्हणजे शंकर आणि रौद्र म्हणजे तापलेला, रागावलेला असा अर्थ आहे. म्हणून संहार रुद्र म्हणजे शंकर जेव्हा अवतार घेतो त्याचवेळी त्याच्या मनाची स्थिती ही रौद्र असते व तांडवातून त्यांचं  रौद्र स्वरुप प्रगट होतं. तांडव नृत्य या पाठीमागे सजीवता आहे. 


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy