।। गुरु साक्षात् परब्रह्म ।।
।। श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ।।
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ॥
गुरु ही कोणी व्यक्ती नसून ते एक तत्त्व आहे. जे विश्वाच्या उत्पत्तीपासून निसर्गाची सर्वोत्तम निर्मिती असणा-या मानवाला मार्गदर्शन करण्यासाठी या भूतलावर अवतरत आले आहे, असं मार्गदर्शन परमपूज्य गुरुदेवांनी अनेकदा केलं आहे. याचं चिरंतन स्मरण रहावं यावर आपण चिंतन करावं आणि त्यातून आपल्याला त्यांचं खरं स्वरुप जाणून घेता यावं म्हणून ह्या श्लोकाने ते प्रत्येक आशीर्वादाच्या आरंभ करतात. गुरु हेच ब्रह्मा गुरु हेच भगवान विष्णू गुरु हेच साक्षात भगवान महेश्वर आहेत. अश्या परब्रह्म स्वरुप गुरुंना मी वंदन करतो. अशी प्रार्थना म्हणणं आणि तसा भाव असणं यात बराच फरक दिसून येतो. यासाठी मुळात आपण अवतार हा शब्द समजून घेऊ.
अवतार हा शब्द अव(खाली) +तृ (उतरणे) अशा अर्थाने असून मूळ शक्ती चैतन्य अबाधित ठेवून निर्गुणातून सगुणात येणे होय. म्हणजेच अव्यक्तातून व्यक्त होणे आणि व्यक्तातून पुन्हा अव्यक्त होणे अशी अनादिकालाची परंपरा आहे. अव्यक्तादीनि भूतानि, मध्य व्यक्तानि भारत। असं श्रीमद्भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. हेच सोपं करुन महाराजांनी परमात्मा हा जीवात्म्याच्या रुपाने येतो आणि जीवात्म्या परमात्म्यात विलीन होतो असं मार्गदर्शन वेळोवेळी केलं. म्हणजेच परमपूज्य गुरुदेवांच्या रूपाने भगवंत प्रत्यक्ष अवतरला म्हणजे अव्यक्तांतुन व्यक्त झाला आपल्या सोबत राहिला मार्गदर्शन केलं आणि पुन्हा अव्यक्त झाला. आपल्याला तो ओळखता आला नाही किंवा आपण ओळखू शकलो नाही आणि अजूनही हे स्वरुप ओळखण्यासाठी प्रयत्न करत नाही हे आपले दुर्दैव!
ही गोष्ट कळल्यानंतर देव असतो का? तुम्ही तो पाहिला आहे का? त्याचा स्पर्श कसा असतो? तो बोलतो कसा? इत्यादी प्रश्न आपल्या बाबतीत निरर्थक ठरायला हवेत. याचं कारण ज्यांना या चरणांचा अद्यापपर्यंत लाभ झालेला नाही त्यांनी ह्या शंका उपस्थित करणे रास्त मात्र परमपूज्य गुरुदेवांची प्रचिती आल्यानंतर खरं तर आपल्या मनात ह्या शंका यायला नकोत.
आपली संस्कृती आणि ग्रंथ इतके थोर आहेत की त्यांनी प्रत्येक गोष्टीची लक्षणें सांगितली आहेत. संत ज्ञानेश्वरांनी भगवंताचे लक्षण सांगताना वर्णन केले आहे की- आईका यश श्री औदार्य । ज्ञान वैराग्य ऐश्वर्य । हे साही गुणवर्य । वसती जेथ ।। अर्थात भगवंत हा ६ गुणांनी युक्त आहे. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे सहा गुण जेथे एकत्र पहायला मिळतात तिथे भगवंताची प्रचिती आल्यावाचून रहात नाही. बरं काळ निराळा तशी लक्षणे निराळी असं कधीच होत नाही.
ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशसः श्रियः।
ज्ञान वैराग्ययोश्चैव षण्णां भग इतीरणा।। (विष्णुपुराण ६-५-७४) जी लक्षणे विष्णुपुराणात सांगितली आहेत तीच संत ज्ञानेश्वरांनी सांगितली आहेत.
आता यातील एकेक लक्षण परमपूज्य गुरुदेवांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते की नाही ते पहा! आणि जर ही लक्षणे तंतोतंत जुळतात तर भगवंताचे दर्शन झाले नाही असं किमान आपण तरी म्हणता कामा नये. नव्हे कोणत्याही शिष्याने आपल्या सद्गुरुंच्या बाबतीत अशी शंका उपस्थित करता कामा नये. परमपूज्य गुरुदेवांनी याबाबतीत मार्गदर्शन करताना अतिशय सोपं उदाहरण दिलं आहे. डोळे दोन असले तरीही त्याने वस्तू एकच दिसते तसं कार्यकारणास्तव शक्ती दिसायला वेगळी असली तरीही तिचे मूळ स्वरुप हे एकच आहे. परमात्मा हा भिन्न नाही तो सर्वत्र एकच आहे. अवताराचं प्रयोजन सांगताना प्रा. व. दि. कुलकर्णी सांगतात - भगवंताने श्रीराम, श्रीकृष्ण इत्यादी अवतार घेतले त्याला धर्मसंस्थापना हे प्रयोजन होतं आणि आपला अवतार कसा असतो तर आपण निष्प्रयोजन जन्माला आलेलो असतो. आला आणि गेला.
या सगळ्यात एक महत्वाचा विषय जो अजूनही दुर्लक्षित आहे तो म्हणजे वैयक्तिक उपासना आणि त्यातून आत्मोन्नती! आपल्याला अनेकदा अनेक गोष्टी अनुभवास येत नाहीत याचं महत्वाचं कारण म्हणजे संशय! गुरुवाक्याचे महत्त्व सांगताना परमपूज्य सद्गुरु मार्गदर्शन करतात - "दानात अन्नदान श्रेष्ठ. मंत्रात गायत्री मंत्र श्रेष्ठ तसेच वाक्यात गुरुवाक्य श्रेष्ठ आहे." गुरुवाक्य मज कारण । मातें न करी निर्वाण । वेंचीन आतां माझा प्राण । गुरुनिरोप करीन मी ॥ श्रीगुरुचरित्रातील या ओवीची परमपूज्य गुरुदेवांनी अनेकदा पुनरावृत्ती केली आहे याचं कारण एकच ! अध्यात्मिक प्रगतीसाठी हवी असते ती गुरुनिष्ठा व अढळ श्रद्धा!
मग श्रद्धा म्हणजे काय? तर गुरु आणि वेदांत वाक्यांवर दृढ विश्वास होय! असं श्रीमद्आद्य शंकराचार्य सांगतात. याचाच अर्थ जे जे म्हणून परमपूज्य गुरुदेवांनी मार्गदर्शन केलेले आहे त्या सर्वांवर अतिशय विश्वास ठेवणे ! त्यावर अविश्वास न दाखविणे. गुरुवाक्य हेच प्रमाण मानून जर आपली मार्गक्रमणा असेल तर प्रगतीला वेळ लागत नाही! आपल्याला साक्षात्कारी गुरुंची भेट झाली, त्यांचं मार्गदर्शन लाभलं! तरीही मनाची स्थिती दोलायमान का होते तर- संशय धरोनि मानसी । श्रीगुरु काय देईल म्हणसी । त्यागुणें हा भोग भोगिसी । नाना चिंते व्याकूळित ।। -श्रीगुरुचरित्र
श्रीगुरुचरित्र अवतरणिका ही उपासना आणि गुरुसेवा म्हणून भक्तांना देण्यामागचं सविस्तर मार्गदर्शन गुरुवाणी पुष्प ११ च्या शेवटच्या पानावर दिलं आहे. आपल्या सारख्या सामान्य भक्तांना आत्मोन्नती करता यावी याकरिता भक्तांना अवतरणिका वाचनाची परवानगी मिळावी अशी प्रार्थना गुरुदेवांनी देवांकडे मागितली. आधी देव परवानगी देत नव्हते मात्र परमपूज्य गुरुदेवांनी देवांशी भांडून आपल्या करिता ही अवतरणिका पठणची परवानगी मिळवली. हे अवतरणिका सिद्धमाला। श्रीगुरु भेटती जपे त्याला। होय जे अवतरणिका वाचतील त्यांना पुन्हा गुरुभेट शक्य आहे. आपल्या ६५ व्या वर्धापनदिनाच्या आशीर्वादात महाराजांनी ह्या गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला की ह्याच देहात तुम्हाला पुन्हा दर्शन होईल याबाबत कोणीही शंका ठेवू नका. याला ईश्वराची साक्ष आहे. इतकं स्पष्ट सांगून देखील आपल्याला क्लेश का होतात? तर जैसा भावार्थ असे आपुला । तैशी कार्ये संपादिती।। आपला जसा भाव असेल तसा भगवंत अनुभवाला येतो. याबाबतीतही महाराजांनी मार्गदर्शन केले आहे की- भगवंत जेव्हा व्यक्त स्वरुपात येतो तेव्हा तो लवकर प्रसन्न होतो जेव्हा तो अव्यक्ततात असतो तेव्हा कठोर परीक्षा घेऊन प्रसन्न होतो.
भारतात अत्यंत प्राचीन अशी गुरुशिष्य परंपरा आहे. याबाबत परमपूज्य सद्गुरु मार्गदर्शन करतात- "येथे गुरु हे जन्माला येतात आणि शिष्य हे तयार करावे लागतात." अर्थातच गुरु आणि शिष्य ही परंपरा अशी आहे की गुरु परंपरेतील व्यक्ती या उपजत ज्ञान घेऊन जन्माला आलेल्या असतात आणि शिष्य घडविण्याचे कार्य ते करत असतात. आपली मर्यादित बुद्धी ही वय, भौतिक उपलब्धता आणि गुरुंच्या अवतीभवती असणारा जनसमुदाय यांवर गुरुंची अथवा कोणत्याही व्यक्तीची परीक्षा करते. मात्र वयासहित सर्वच गोष्टी अश्या विभूतींच्या बाबतीत अर्थशून्य ठरतात. याबद्दल संत ज्ञानेश्वर म्हणतात-
दशेची वाट न पाहता ।
वयसेचिया गावा न येता ।
बाळपणीच सर्वज्ञता मिळे तेयाचे।। (ज्ञानेश्वरी अ. ६)
या विभूतीमत्वांना दशा आणि वय यांची वाट पहावी लागत नाही. त्यांना बालपणीच सर्वज्ञता प्राप्त असते.
ते या सिद्ध प्रज्ञेचे नि लाभे।
मनची सारस्वते दुभे ।
मग सकळ शास्त्रे स्वयंभू ।
निघती मुखे ।।(ज्ञानेश्वरी अ. ६)
सगळी शास्त्रे ही त्यांच्या मुखातून प्रकट होण्याच्या तयारीत ओठांवर येऊन प्रतीक्षा करत असतात. ही खरी नररत्ने! यांच्या वाणीतून विश्वास आणि कृपादृष्टीतूनच अमृत पाझरत असते.
जनसमुदाय, भौतिक ऐश्वर्य इत्यादी गोष्टी अश्या गुरुंची योग्यता ठरवत नसून त्यांच्या दर्शनाने येणारे अनुभव आणि केवळ आर्त स्मरणातून येणारी प्रचिती हीच त्यांच्या ईश्वरी ऐश्वर्याची साक्ष असते. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची रचना करताना प्रतिज्ञा केली होती- तेणे कारणे मी बोलेन । बोली अरुपाचे रूप दावीन । अतींद्रिय परि भोगवीन । इंद्रियांकरवी॥ -ज्ञानेश्वरी-३६/६ ज्या गोष्टी सामान्य व्यक्तीच्या इंद्रियांना जाणवतही नाहीत त्यांची प्रचिती मी गुरुंच्या कृपेने माझ्या वाणीद्वारे करवून देईन! आणि ज्ञानेश्वरीच्या रुपाने त्यांनी ती प्रतिज्ञा पूर्ण केली.
हीच परंपरा पुढे कायम ठेवत परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांनी त्यांच्या श्रीगुरुकृपेने नीलवर्ण कांती प्रकट करुन हजारो जन्माचे पुण्य आणि कठोर उपासनेद्वारे योग्यांना देखील प्राप्त होण्यास अतिशय दुर्लभ असे परब्रह्म तेज हे भक्तांना याची देही याची डोळा अनुभवास आणून दिले. परमपूज्य गुरुदेवांच्या देहत्यागानंतरही श्री महालक्ष्मी मंडपात ह्या नीलवर्ण कांती दर्शनाची परंपरा कायम आहे. आद्य शंकराचार्य सांगतात अश्या गुरुंना परीसाची उपमा देणे देखील अयोग्य ठरते कारण परीस हा फक्त लोखंडाचे सोने करतो! असे श्रेष्ठ गुरु मात्र आपण कसेही असलो तरीही दयाबुद्धीने आपल्या आयुष्याचे सोने करतात यात शंकाच नाही!
मनुष्य ही निसर्गाची सर्वोत्तम निर्मिती! भगवंताने त्याला मन, बुद्धी, वाचा आणि विवेक दिला आहे. ज्यामुळे तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरतो. तरीही तो हळू हळू शिकणारा प्राणी आहे. षड्रिपू (काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर) हे त्याच्या देहासोबतच येतात. त्यामुळे तो अज्ञानाच्या अंधारात चाचपडत राहतो. मायामय अशा या जगात सत्ता, संपत्ती, खोटी प्रसिद्धी, शारीरिक सुखासिनता यांनाच तो सर्वस्व मानू लागतो. या सर्वातून मार्ग दाखविण्यासाठीच व हे शाश्वत सुख नसून मधूर सुखाच्या यातना आहेत याचा अनुभव देण्यासाठी परमेश्वर स्वतः "गुरुस्वरुपात" अवतार घेतो. जो श्रेयस्कर मार्ग आहे तो आहे हिताचा आणि जो प्रेयसाचा मार्ग आहे तो सुखाचा! याची जाणीव केवळ सद्गुरु चरणी होते. समर्थ रामदास म्हणतात आपण भगवंताला आपले हित करण्याची विनवणी करावी मात्र आपण देवाकडे सुखाची मागणी करतो. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता कधी सांगितली? जेव्हा त्याने शिष्यभाव प्रकट केला तेव्हाच! यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेSहं शाधि मां त्वां प्रपन्नम् ॥ (भ.गी.२.७) अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना शरणागत होऊन प्रार्थना केली- मी आपला शिष्य आहे, त्यामुळे जे माझ्यासाठी श्रेयस्कर असेल त्याचाच मला उपदेश करा. सल्ले अनेक जण देतील, मतं व्यक्त अनेक जण करतील मात्र हिताचा सल्ला देणारं एकमेव शाश्वत तत्त्व- श्रीसद्गुरु!
दृधश्रद्धेविषयी मार्गदर्शन करताना परमपूज्य सद्गुरु मार्गदर्शन करतात- ईश्वराचे सार्वभौमत्व मान्य करून त्याला शरण जावे. त्याची सत्ता मान्य करावी नाहीतर आपले, आपल्या वर्तणुकीवर नियंत्रण राहणार नाही. एक प्रकारचा अंकुश असला म्हणजे गैरवर्तणूक होत नाही. यासाठी दृढ श्रध्दा ठेवावी लागते. त्यातूनच माणसाला आनंद मिळतो. भक्ती आणि श्रध्दा या अशा गोष्टी आहेत की त्याला संकल्पाची जरूर लागत नाही, कर्माचीही जरूर लागत नाही. श्रद्धेच्या जीवावर अनेक लोकांना निरनिराळ्या प्रकारचे अनुभव येतात परंतु अनुभव यावा म्हणून श्रध्दा ठेवली असेल तर अनुभव येणार नाहीच व श्रध्दाही कनिष्ठ प्रकारची राहील. आपण फक्त संपूर्ण श्रध्दा ठेवावी. कारण दृढ श्रध्देमुळे जीवनात निर्धास्तपणा येतो आणि निर्धास्तपणा हाच आनंद आहे. भक्ति करावी दृढतर । गंभीरपणे असावे धीर । तरीच उतरिजे पैलपार । इहपरत्री सौख्य पावे ॥- (श्रीगुरुचरित्र अ.१०) आध्यत्मिक परंपरेचे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कालखंड किती लोटला? किती अवतार झाले? तरीही कोणाच्याही मार्गदर्शनात कुठेही विसंगती आढळत नाही. जे गीतेत सांगितले तेच श्रीगुरुचरित्रात, तेच दासबोधात! गीता तरी कुठे वेगळं सांगते? अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥ [भ.गी.अ९.२२] जे अनन्य प्रेमी भक्त मला निरंतर चिंतन करीत निष्काम भावाने भजतात, त्या नित्य माझे चिंतन करणाऱ्यांचा योगक्षेम, चरितार्थ मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो. हे भगवंताचे वचन आहेत. ते त्रिकालाबाधित सत्य आहेत. ते भक्त उद्धाराच्या हेतू प्रेरित आहेत. यावर शंका घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण भगवंत खोटं सांगेलच कसं?
परमपूज्य सद्गुरुंनी त्यांचे खरे स्वरुप वेळोवेळी उलगडून सांगितले ! ते भक्तांशी संवाद साधताना मार्गदर्शन करतात-"हल्ली समाजात खरे साधूत्व कोठेही पहायला सापडत नाही आणि त्याचमुळे यांच्यापैकी कोणाच्याही देहावर ईश्वरी खुणा दिसून येत नाहीत की, यांच्यापैकी कोणाच्याही शब्दामध्ये, स्पर्शामध्ये दैवी सामर्थ्यही आढळून येत नाही. खरे पाहता, त्यामुळेच आमच्यासारख्या ख-याखु-या "अधिकारी पुरुषांची" समाजात निंदा, टिंगल- टवाळी केली जाते. तसे पाहिले तर ईश्वरी शक्तीने स्वतःच तुमच्यासाठी नेमलेली ही स्थानापन्न व्यक्ती आहे. व या माझ्या देहावरची सर्व लक्षणे ईश्वरी अवतारी पुरुषांची आहेत. माझ्या या हाता-पायांवर शंख, पद्म, त्रिशूळ, चक्र, ध्वज इ. चिह्ने आहेतच शिवाय माझ्या दातांची ठेवणही खास वैशिष्ट्यपूर्ण व भक्कम आहे. या माझ्या मस्तकावरील केस पांढरे दिसत असले तरी पाठीमागचे केस खालच्या बाजूने पुनः काळे होऊ लागलेले आहेत. माझी देहयष्टी व उंची ही सुद्धा खास वैशिष्ट्यपूर्ण तर आहेच शिवाय दोन्ही हातांची लांबी वाढून गुढघ्यापर्यंत होण्याकडे सुरुवात झालेली आहे. तसेच या देहाला नीलकांती व दिव्यतेज प्राप्त झाले आहे. उजवा हात निळसर होऊन त्याचा तळवा डाव्या हाताच्या तळव्यापेक्षा मोठा झालेला आहे तर डावा हात व त्याचा तळवा श्वेत म्हणजे पांढ-या रंगाचा होऊ लागला आहे. म्हणजेच एकप्रकारे या देहाला लक्ष्मी-नारायणाचे रुप प्राप्त झालेले आहे. आणि असे असूनही जर कोणी या देहावर निष्कारण संशय घेत असेल तर त्याला या देहाच्या दर्शनातून काहीच लाभ होणार नाही, हे पक्के लक्षात ठेवा. ईश्वरी शक्तीच्या अस्तित्वाची जाणीव झाल्याशिवाय तुम्हाला ईश्वराची प्रचिती, अनुभूती कधीच येऊ शकणार नाही. तेव्हा, प्रथम या शक्तीवर व ही शक्ती धारण केलेल्या व्यक्तींवर कोणताही संशय न घेता, अगदी पूर्ण अंधश्रद्धा ठेवून त्यांचे दर्शन घ्या व पहा पुढे काय होते ते? या शतकातील ही अशी एकच व्यक्ती आहे. ती लोपली गेली की सर्वच अवघड होऊन जाणार आहे. हे लक्षात ठेवा! (अमृतकण २७४/दि-१७-११-२००२/पृष्ठ क्र-४) ऐसा स्वामी पुन्हा होणे नाही हे परमपूज्य सद्गुरुंनी वारंवार बजावून सांगितले, त्याचे महत्त्व त्यांच्या अव्यक्तात जाण्यानंतर अधिक जाणवू लागले आणि पुन्हा एकदा व्यक्त-अव्यक्तांचा खेळ सुरु झाला. ह्यातून सुटण्याचा एकच मार्ग-
गुरुस्वरुप आपण ओळखे। ऐसें ज्ञान देई सुखे। या परते न मागे आणिके। म्हणोनि चरणी लागला।।
सद्यस्थिती चिंतन आणि मननासाठी अनुकूल आहे. गुरुचरणी अनन्य शरणागत भाव आणि त्यांच्यावरच दृढ विश्वास हाच एकमेव तरणोपाय सर्वार्थाने!