आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


श्रीगुरुदेवांच्या विभूतिमत्त्वाचे विविध पैलू



प्रा. डॉ. रोहिणी अय्यर 

एम. एस्सी., पीएच. डी.

पदार्थविज्ञान विभाग, पुणे विद्यापीठ, पुणे.


जीवनाचे प्रयोजन, प्रेरणास्थान आणि पद्धती- याबाबत सर्वसामान्य माणूस आणि आध्यात्मिक अधिकारसंपन्न सत्पुरूष यांच्या जीवनशैलीत खूपच वेगळेपण असते. "माती असशी मातीत मिळशी" अशी सर्वसामान्य विकारवश माणसाची गत असते तर सत्पुरूषांचा देह जरी मानवी असला तरी जन्मतःच लाभलेली दैवी गुणसंपदा, तपश्चर्याजन्य तेजस्विता, ईश्वरी शक्तीशी असलेली एकरूपता, लोककल्याणाची विलक्षण तळमळ,ऐहिकाबद्दलची अनासक्ती अशा ठळक वैशिष्ट्यांमुळे त्यांचे विभूतिमत्त्व अलौकिक झालेले जाणवते, अगदी 'अलौकिक नोव्हावे लोकांप्रती' असे सांगणाऱ्या श्रीज्ञानेश्वर माऊलींचेही! स्थूलमानाने भारतातील श्रीगुरुनानकदेव, तुलसीदास, चैतन्य महाप्रभू, शंकरदेव, सूरदास, ज्ञानदेव, तुकाराम, रामदास, नामदेव, एकनाथ, पुरंदरदास, कनकदास, अक्कम्मा महादेवी, त्यागराज, रमण महर्षी, रामकृष्ण परमहंस अशा असंख्य सत्पुरूषांच्या बाबतीत असे म्हणता आले तरी त्या त्या विभूतींच्या स्थळ, काळ, परिस्थितीनुसार त्यातही वैशिष्ट्यपूर्ण विविधता दिसते. त्या प्रत्येकाचे विभूतिमत्त्व एका विशेष प्रकारच्या तेजाच्या विविध रंगछटांनी नटलेले दिसते. गेल्या शतकाच्या अखेरीस देहत्याग केलेल्या व प्रसिद्धीच्या झोतात वावरलेल्यामुळे महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरील जनसामान्यांना अपरिचित राहिलेल्या सद्गुरु श्रीरामकृष्ण क्षीरसागर स्वामी महाराजांच्या विभूतिमत्त्वातील पुढील काही वैशिष्ट्यपूर्ण पैलू, त्यांच्यातील अलौकिकत्वाचा परिचय करून घेऊ इच्छिणाऱ्या जिज्ञासूंना उपयुक्त वाटतील.

     महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील रायतळे या खेडगावी, एका दरिद्री शिक्षकपित्याच्या पोटी जन्मलेल्या या आठव्या अपत्याचे पितृछत्र बालपणीच हरपले. चरितार्थसाधनाच्या शोधात त्याच्या कुटुंबास अहमदनगर या जिल्ह्याच्या ठिकाणी स्थलांतर करावे लागले, तरी आर्थिक स्थिती हलाखीचीच राहिली व त्याचे चटके या बालकासही सोसावे लागले.

     वयाच्या ७ व्या वर्षी ह्या बालकास ईश्वरी साक्षात्कार झाला. आकाशातून एक तेजस्वी व्यक्ती त्याच्याकडे पाहत होती. त्या क्षणापासून ह्या बालकास जीवनाची कृतार्थता कशात आहे, याची कल्पना आली; गुरुंनी त्यास (भगवान श्रीदत्तात्रेयांचे द्वितीय अवतार श्रीमन्नृसिंह सरस्वतींचे स्थान असलेल्या कर्नाटकातील) "श्रीक्षेत्र गाणगापुराला ये" असा आदेश दिला. हे बालक त्या आदेशानुसार तेथे गेले. तेथे श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्याला दर्शन, शिष्यत्व व तपश्चर्या करण्याचे आदेश दिले.

     अहमदनगरला घरी परतल्यावर, या बालकाने आईला सर्व वृत्तांत सांगितला व श्रीगुरुंच्या आदेशानुसार तपश्चर्या करण्याचा निर्धार व्यक्त केला. इतर बालके ज्या वयात औपचारिक शिक्षणासाठी शाळेकडे वाटचाल करीत, त्या वयात हे बालक घराच्या एका भागात गुरुआज्ञेनुसार तपश्चर्या करु लागले; मात्र सर्व कुटुंबीयांचा याला तीव्र विरोध झाला. कुटुंबीयांच्या दडपणामुळे या बालकाला काही काळ शाळेत जावे लागले तरी शालेय शिक्षणात त्याला मुळीच रस वाटत नसे. एका परीक्षेच्या वेळी त्यांनी पेपरात 'श्रीराम जयराम जयजयराम' लिहून ठेवले होते. त्यांच्या वर्गात श्री. एम. टी. कुलकर्णी नावाचे एक सहाध्यायी होते. त्यांच्यापुढे या बालकाचा नंबर परिक्षास्थळी बसण्यासाठी असायचा. हे बालक पेपर लिहित नसूनही त्यांना पैकीच्या पैकी गुण मिळायचे याचे त्यांना आश्चर्य वाटे. एकदा या बालकाच्या पेपरची काॅपी करावी म्हणून त्यांचा पेपर पाहिला तर तो कोरा होता. कोरा पेपर देऊनही याला गुरुजी एवढे मार्क्स कसे देतात, हे कुलकर्णी ह्यांना समजेना.

     एकदा वर्गात शिक्षकांनी अंकलिपीसंबंधी माहिती सांगितल्यावर या बालकाला शुन्याची व्युत्पत्ती सांग, असा प्रश्न विचारताच त्याने पार विश्वाची व्युत्पत्ती सांगायला सुरूवात केली. ते सर्व शिक्षकांच्या डोक्यावरून गेले. ते थक्क झाले. त्यांनी या बालकाच्या आईला येऊन सांगितले, "ह्याला शाळेतील शिक्षणाची आवश्यकता नाही कारण तो काय बोलतो, ते आम्हालाही कळत नाही. ह्याला शाळेत पाठवू नका." तेव्हापासून या बालकाने शाळा तर सोडलीच पण शिवलेले कपडेही घालायचे सोडून दिले. पंचा किंवा भगवे वस्त्र ते वापरू लागले. "बालपणीच सर्वज्ञता तया वरी" असा अनुभव त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांना येऊ लागला. उत्तरायुष्यात अनेक उच्चशिक्षित जिज्ञासूंचे पूर्ण समाधान करू शकणारे व खवचटपणे "परिक्षा" पाहण्याच्या उद्देशाने प्रश्न विचारणाऱ्यांना निरुत्तर करणारे शुद्ध ज्ञान त्यांच्या देहात आश्रयाला आल्याचा अनुभव अनेकांना अनेकदा आला आणि अनेक नामवंत विद्यापीठांच्या कुलगुरूंनाही त्यांच्या दर्शनासाठी येऊन नतमस्तक व्हावेसे वाटले.

 षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळ्यात बोलताना श्रीगुरुंनी या संदर्भात प्रथमच व्यक्त केलेल्या मनोगतात ते म्हणाले, "अत्यंत गरीब कुटुंबात जन्म झाल्यामुळे सगळ्यांच्या अपेक्षा खूप वाढल्या. ह्यांना आता देव प्रसन्न झालेला आहे आणि आता आपल्याला खूप श्रीमंती येईल असे कुटुंबीयांना वाटू लागले; पण श्रीमंती तर आली नाहीच पण ज्यांना ज्यांना हे कळालं त्या प्रत्येकाची माझ्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली. लहान वयात, ह्या मुलाला हे ज्ञान कसे काय झाले असेल असा संशय घ्यायला त्यांनी सुरुवात केली. परिसरातील लोकांनाही वाटू लागले की, या लहान मुलाला असा अनुभव येईलच कसा? त्याला तपश्चर्या करावी लागते, बरेच काही करावे लागते असा संशय घ्यायला सुरुवात केली. त्यात घरातल्या लोकांनी जास्त प्रमाणात संशय घेतला. "पण गुरुंची आज्ञा झालेली होती, ती मी शांतपणे ऐकली" व त्याप्रमाणे तपाचरण सुरु ठेवले. 

     साधारणपणे मनुष्याचा स्वभाव असा असतो की "तुम्हाला दिसलं ना ते आम्हाला दाखवा" अशी प्रत्येकजण अपेक्षा करतो. "पण तसे करणे शक्य नव्हते." त्यातून निंदा व्हायला लागली. चेष्टा, कुचेष्टा होऊ लागली. ज्याला छळ म्हणतात तो होऊ लागला. त्यातल्या त्यात माझे बोलणे कमी, निवांत राहणे, ईश्वरचिंतन करणे हे पाहून लोकांना जास्तच चेव आला व जो तो उठून माझी निंदा करु लागला. *पण गुरुआज्ञा होती. शांत राहीलो. पोलीस कस्टडी मिळाल्यावर निरपराध माणसाला कसे होते, तशी परिस्थिती माझी झाली होती. "निंदा, अवहेलना, उपेक्षा, अपमान या सर्वांचे कडू घोट ह्या बालकाला केवळ गिळायला लागले नाहीत तर ते शांतपणे पचवावेही लागले.

     कालांतराने जसजसा या बालकातील ईश्वरी शक्तीचा अनुभव व प्रचीती कुटुंबीयांना व परिसरातील लोकांना येऊ लागली तसतशी या छळाची तीव्रता कमी होऊ लागली आणि प्रापंचिक समस्यांच्या निवारणासाठी साहाय्याच्या अपेक्षेने येणाऱ्या आपद ग्रस्तांची संख्या वाढू लागली व कोमल अंत:करणाच्या या बालकाकडून त्यांच्याविषयीच्या करुणेपोटी त्यांना मार्गदर्शन व साहाय्य होऊ लागले. दिव्याने दिवा लागावा तशी लाभधारकांकडून या बालकाच्या ज्ञानाची व शक्तीची माहिती परिसरात पसरू लागली. परमपूज्य श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापुराला दिलेल्या आदेशांचे तंतोतंत पालन करीत श्रीगुरुंनी बालवयात तपाचरणाला प्रारंभ केला. त्यांना आधी साक्षात्कार झाला मग त्यांच्या तपश्चर्येला सुरुवात झाली. श्रीगुरुचरित्र पठण व त्याची पारायणे, नामस्मरण, ध्यानधारणा, ॐकार जप, व्रतवैकल्ये, देवपूजा अशा अनेक रितींनी, अत्यंत समर्पित वृत्तीने त्यांची साधना सुरु झाली. त्यासाठी यमनियमांचे काटेकोर रीतीने ते पालन करीत. त्या काळात त्यांना अनेक देवतांची दर्शने झाली. सालंकृत स्वरूपात श्रीविठ्ठलांनी त्यांना दर्शन दिले. तेही पहाटे दोन वाजता! तोपर्यंत त्यांनी पंढरपूर पाहिलेदेखील नव्हते. त्यानंतर हा दैनिक उपासनाप्रारंभकाळाचा संकेत आहे असे समजून त्यांनी रोज पहाटे दोन वाजता उठून उपासना करणे सुरु केले. तसेच प्रतिवर्षी पंढरपूरला जाऊन श्रीविठ्ठलमूर्तीचे दर्शन, महापूजा करणे असा प्रघात सुरु केला.

     एकदा त्यांना स्वप्नात देवीचा दृष्टांत झाला की "केडगावला एका लिबांच्या झाडाखाली मी आहे. मला घेऊन चल. माझी स्थापना कर." पाच सवाष्णींसह मला रस्त्यात न बोलता घरी आणायचं, अशी आज्ञा होती. वडिल बंधू दादा देवीला आणायला गेले. तो तांदळा लहानसा होता. दादा म्हणाले "आपण नेऊ की सहज! त्यात काय मोठे?" त्यांनी तो देवीचा तांदळा घेतला पण ते पाच पावलेही चालू शकले नाहीत. तो तांदळा इतका जड झाला की दादांना घाम फुटला. मग दादांना सुचवण्यात आले "क्षमा मागा त्यांची." मग दादांनी नमस्कार केला; क्षमायाचना केली व ती मूर्ती हलकी झाली व मग ती मूर्ती घरी आणली. श्रीगुरुंनी स्वत: तिची पूजा करून स्थापन केली. त्यानंतर त्यांनी प्ररान्न सोडले. कोणाकडे जावे लागले तर तेथे ते दूध घेत.

     एका संध्याकाळी ते दूध घेऊन येत असताना त्यांच्या पायाला नाग चावला. ते तसेच घरी आले; कुटुंबीयांना त्याबाबत सांगितले व म्हणाले "मला दवाखान्यात नेऊ नका. माझ्या शरीरावर लिंबाचा पाला खालीवर पसरा. तीन दिवस देह हलवू नका मी बेशुद्ध पडेन. माझा वर्ण काळपट होईल. "एवढे बोलून ते बेशुद्ध झाले. सर्व कुटुंबीय त्यांच्या उशाशी ३ दिवस बसून राहिले. डॉक्टरांना न बोलावण्याची त्यांनी सक्त सूचना दिली होती. चौथ्या दिवशी गावात जे दत्तमंदिर होते तेथून ३ पितळी बादल्यांइतके दुधासारखे पांढरे तीर्थ वाहू लागले. ते तीर्थ वाहण्याचं जेव्हा पूर्ण बंद झालं त्यावेळी श्रीगुरुंना शुद्ध आली. त्यांचा वर्ण काळपट श्यामल झाला तो या नागदंशामुळे.

     कुटुंबीयांना वाटायचं की त्यांनी अर्थार्जन करावे. घरी खूप गरिबी होती. थोरल्या बंधूंनी त्यांना आयुर्वेदिक औषधे तयार करणाऱ्या एका कारखान्यात काम मिळवून दिले. पण तेथे ते आठच दिवस टिकले. एका सायंकाळी आसवं तयार केलेल्या पिंपात सापाने गरळ ओकले. ते दृष्य त्यांनी प्रत्यक्ष पाहिले आणि आता हे औषध विषारी झाले म्हणून त्यांनी ते औषधाने भरलेल पिंप ओतून टाकलं. ते मालकाने पाहिले. त्याला खूप राग आला व त्याने या बालकाला कामावरून काढून टाकले. या प्रकारानंतर महाराजांनी कोणाकडेही नोकरी केली नाही. फक्त श्रीहरदास यांच्याकडे ते देवपूजा करण्यासाठी जात. तेथेही एकदा ते प्रत्यक्ष जाऊ शकले नाही तरी त्यांच्या रूपाने कोणीतरी जाऊन त्या घरची देवपूजा केली. याचा अर्थ एकापेक्षा अधिक रूप ते धारण करू शकत.

     दर्शनार्थी, मार्गदर्शनार्थी आणि व्यावहारिकदृष्ट्या लाभार्थी संख्या वाढू लागल्याने १९७४ साली त्यांनी श्रीदत्तात्रेय निवासात स्थलांतर करून तेथेच कायमचे वास्तव्य केले. त्यापूर्वी खडतर तपश्चर्येचा, निंदा, चेष्टा, टिंगल टवाळी शांतपणे सोसण्याचा २५ वर्षाचा काळ लोटल्यावर त्यांना पुन्हा त्यांच्या गुरुंचे दर्शन झाले. त्यांनी सांगितले की, "मला तुझ्याकडून वेदांचे कार्य करून घ्यायचे आहे. तू आता वेदाकार्याला लाग." त्यानुसार त्यांनी खूप परिश्रम करून गुर्वाज्ञेचे पालन केले. देशभरातील नामवंत वेदमूर्तींना नगरला पाचारण करून प्रतिवर्षी ५ जणांचे भव्य सत्कारसमारंभ आयोजित केले. त्यानिमित्त त्यांच्याशी वेदविद्यासंवर्धन कार्यासाठी विचारविनिमय करता आला आणि वेदान्त विद्यापीठाची योजना तयार करता आली. त्याचा एक भाग म्हणून त्यांनी वेदपाठशाळा सुरू केली. चारही वेदशाखांच्या अध्यापनासाठी योग्य त्या अध्यापकांची नियुक्ती केली. या कार्यासाठी एक भव्य वास्तु उभारली, त्या वेदविद्या अध्ययन करू इच्छिणार्‍या १०० विद्यार्थ्यांच्या निवास - भोजन इ. ची नि:शुल्क व्यवस्था केली. या कार्यासाठी लागणारा निधी उभारण्यासाठी श्रीगुरूंनी भक्तांना धर्मभिक्षा मागण्यासाठी घरोघरी जाण्याचा आदेश दिला व पूर्णत: लोकाश्रयावर हे कार्य संपन्न करून आपल्या गुरुदेवांच्या आदेशाचे पालन केले.

     वक्तशीरपणा हा श्रीगुरूंचा एक अनुकरणीय गुणविशेष होता. साधनेची, देवपूजेची, बैठकीची, आरतीची, फिरायला जाण्याची वेळ ठरलेली असे व ती अगदी काटकोरपणे पाळली जात असे. प्रसिद्ध बासरीवादक श्री. केशव गिंडे ह्यांनी श्रीगुरूंशी बोलण्यासाठी एक तास मिळावा, अशी प्रार्थना केली. ती मान्य करून श्रीगुरु त्यांच्याशी बोलत राहिले. दोघातील बोलणे संपताच तास संपल्याचा घड्याळातील टोल पडला. श्रीगुरूदेव हे भगवान श्रीकृष्णाप्रमाणे जन्माने आठवे व त्यांचा जन्मही रात्री १२ वाजताचा! विशालकाय देह, पांढुरका श्यामवर्ण, पाठीवर रूळणार्‍या घनदाट जटा, शुभ्र दंतपंक्ती, दोन्ही हातांच्या आकारात व रंगात किंचितसा फरक, हातांचे तळवे आरक्त व त्या हातांवर अनेक शुभचिन्हे असे त्यांचे बाह्यरुप होते. त्यांच्या पायावरही शुभचिन्हे होती. सोमनाथच्या मुक्कामात श्री. अशोक काळे व श्री. अनिल पाटणकर ह्या भक्तांना त्यांनी आपले पाय दाखवले व म्हणाले, "पायाची बोट नीट बघा. माझ्या दहाही बोटांवर चक्र आहेत. माझ्या एका पायावर त्रिशूल आहे. दुसर्‍या पायावर चक्र आहे." ते दोघे ती शुभचिन्हे पाहून गुरुचरणांवर नतमस्तक झाले. त्या शुभंकर गुरुचरणांवर अनेक आर्तजनांनी अश्रूंचा अभिषेक केलेला आहे व मनाला शांतता अनुभवलेली आहे. सगळे दु:ख त्या चरणांवर अश्रुरूपात अर्पण  केले की तापदायक विषय मिटला, असा त्यांना अनुभव येई.

     त्यांची चर्या हसरी होती. स्वत: हसत व इतरांना हसवत. ते हसत तेव्हा त्यांच्या हास्याचा आवाज मोठ्या दरीतून वाहणार्‍या मंजुळ झर्‍याच्या आवाजासारखा वाटे ते म्हणत, "मनुष्याच्या मनोवृत्तीत शुद्धता आल्याशिवाय तो मनमोकळेपणाने हसू शकत नाही." व ते हसण्याच्या अनेक बर्‍यावाईट प्रकारांची व त्यांच्या प्रभावाची माहिती देत असत. त्यांना विनोद प्रिय असे. दर्शनास येणार्‍या भक्तांना ते, अनपेक्षितपणे विनोद करून हास्यरसाचे कारंजे उंच उडवीत. त्यामुळे खिन्न मनोवृत्ती असलेल्या भक्तांच्या मनातील खिन्नता नाहीशी होऊन तिची जागा प्रसन्नता घेत असे. आलेल्या प्रत्येकाच्या मनातील मोगर्‍याच्या प्रत्येक कळीची प्रत्येक पाकळी पुर्णपणे उमलत असे आणि 'कळी खुलणे' या मराठी वाक्यप्रचाराचा सुखद अनुभव त्यांना येत असे.

     वैदिकांचा, विद्वानांचा सत्कार करताना, कलावंतांचे, गुणवंत विद्यार्थ्याचे कौतुक करताना, निरनिराळ्या उत्तम कार्य करणार्‍या सामाजिक/ शैक्षणिक संस्थांना साहाय्य करताना, दुष्काळपीडित, पूरग्रस्त, भूकंपग्रस्त अशा नैसर्गिक आपत्तींना पीडितांना साहाय्य करताना त्यांचे दातृत्व व मोठ्या मनाची विशालता प्रत्ययास येई. त्यांच्या हस्ते देणगीचा कृपाप्रसाद स्वीकारण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नामदार श्री. शंकररावजी चव्हाण, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. गुप्ते ह्यांच्यासारखे मान्यवर त्यांच्याकडे आलेले होते. भागवत सप्ताहाची दक्षिणा, महावस्त्र व सुवर्णदान पाहून श्री. डोंगरेशास्त्री म्हणाले, "मी एवढं दातृत्व अन्यत्र कुठेच अनुभवलं नाही." स्वत:चे निवासस्थान सोडून सभा, समारंभ, चर्चासत्रे, उत्सव असलेल्या ठिकाणी ते सहसा जात नसत. पण तेथे घडणार्‍या घटना ते पाहू शकत. ऐकूही शकत. एकदा त्यांनी पं. नेहरू, स्वातंत्र्यवीर सावरकर, स. का. पाटील ह्यांच्या व्याख्यानांचे व बोलताना ते करीत असलेले हावभाव, त्यांच्या लकबी ह्यांचे वर्णन ऐकवले होते. प्रत्यक्ष त्या जागी नसतानाही.

     प. पू. सद्गुरुंना पाहिल्यावर अनेक भक्तांच्या मनात उच्च भाव येत. काहींना रडूही येई. एकदा एक स्त्री भक्त आल्या व प. पू. सद्गुरुंना पाहून खूप रडू लागल्या. प. पू. सद्गुरुंनी आशीर्वाद दिले आणि म्हणाले, "हे नाटक होते, अहो मी इथे बसलोय पण मी तुमचे अनेक जन्म पाहिलेत. तुम्ही मला आताच पाहातया, मला सगळ्यांचा भूतकाळ माहीत असतो. वर्तमानकाळही मी पाहत असतो व भविष्य घडवत असतो. मी एक देणार, त्याचे अधिक १०० करायचे की उणे १०० करायचे हे तुमच्या हातात. त्यामुळे ह्यांच पुढे काय होणार हे मला माहीत असते. गुरूंच्यासमोर नाटके नकोत. निर्लज्ज होऊन राहा. काही भक्तांना मला पाहिल्यावर इतका भाव येतो की ते नि:शब्द होतात. त्यांच्या ओठांच्या, डोळ्यांच्या व गळ्यांच्या शिरा बोलतात. काही भक्तांना गत आयुष्यातील कुकर्म बोलू देत नाहीत. भाव उत्कट असतो. पण पश्चात्तापात जळत असतात. त्यामुळे नेमके शब्द सुचत नाहीत. काही मोकळ्या भांड्यात नाणे टाकून वाजविले की कसा आवाज होतो, तसे बडबडत असतात. त्यांचा असा समज असतो की सद्गुरु मला आत्ताच ऐकतात, पाहतात! काही नुसते रडतात पण आतून ओलावा नसतो. जेव्हा खरा भाव उत्पन्न होतो, रडू येते तेव्हा डोळ्यातून तर पाणी येतेच पण नाकातूनही येते, त्याला कसलेच भान राहत नाही की किती पाणी गळतय, हृदय फुटत असते. त्यामुळे आतूनही हुंडके बाहेर येऊन मोठे आवाज येतात. मी आणि तो एवढेच भान असते. त्याला इतरांची जाणीवही राहत नाही. तेव्हा नकळत आम्हीही भारावतो. आम्ही भक्तांच्या अवस्था बरोबर जाणतो. आम्ही असा वेष घेऊन येथे बसतो तर भक्तांना वाटते हे येथे बसलेत, ह्यांना बाहेरचे काय समजतेय? पण आमच्या शक्तीची ताकद तुम्ही ओळखू शकत नाही, तुम्ही दर्शनासाठी येता तेव्हा तुमच्या सगळ्या बारीच हालचालीकडे माझे लक्ष असते. तुम्ही काय बोलणार हेही आम्हाला समजते. कोणाला बोलू द्यायचे, बोलू द्यायचे नाही हे आमच्या हातात असते. तेव्हा तुम्हाला सगळे समजते असे नाटक करू नये. "पुढे सद्गुरुंनी असे सांगितले की" काही भक्तांना कधीतरी आम्ही शब्द दिलेला असतो. त्यासाठी आम्हाला त्यांच्याकडे लक्ष द्यावेच लागते. आम्ही जे आशीर्वाद देतो ते या जन्मीच काय अनेक जन्मी तुम्हाला साहाय्य करतात. काही लोकांना असेही वाटते की अमुक एक व्यक्ती चोर आहे. राजकारणी आहे. दुराचारी आहे पण ती येथे दर्शनाला कशी? पण मी सर्वांचा आहे. सात्विक लोकांपेक्षा अशा इतर अवगुणी लोकांना दर्शनाची जास्त आवश्यकता असते आणि कधीतरी दिलेला शब्द पाळून मी त्यांचे वागणे सहन करीत असतो."

     "भगवंताच्या दारात सर्व प्राणिमात्रांना प्रवेश आहे. आम्ही अशा लोकांना ओळखतो. त्यांना जवळ बसवून का ठेवतो तर इतर लोकांपेक्षा त्यालाच ह्या चरणांची गरज आहे म्हणून! आमच्या सहवासाने त्या व्यक्तीत बदल होतोच आणि समाजात जाऊन त्याने इतर उद्योग करण्यापेक्षा येथे त्यांच्या पापग्रहाला मी रोखून ठेवतो म्हणून! अशाच लोकांना बांधून ठेवण्याची गरज असते. त्यांच्यावाचून माझे काही अडत नाही पण त्यांच्यामुळे तुमचे अडू नये ही चिंता असते एवढेच!" केवढा मोठा अर्थ आहे त्यांच्या या सांगण्यामध्ये. म्हणजे समाजातील दुष्ट प्रवृत्तींना रोखून धरावे लागते, तेव्हा कोठे सत्प्रवृत्त माणसांचे रक्षण होते हे त्यांना सुचवायचे होते. श्रीगुरूंदेवांनी भक्तांसमोर गुरुभक्ती कशी करावी, गुरुसेवा कशी करावी, भगवतभक्ती कशी करावी याचे उत्तुंग आदर्श उभे केले आहेत. ते दरवर्षी कार्तिक महिन्यात श्रीगाणगापूरला त्यांच्या श्रीगुरूंच्या दर्शनासाठी व सेवेसाठी जात असत. तेथे ७ दिवस वास्तव्य करून समप्रित वृत्तीने श्रीगुरुचरणाचे दास म्हणून सेवा करीत. गुरूदक्षिणा म्हणून अर्पण करून सेवा करीत. शिवाय, तेथील पुजारी, सेवेकरी, ब्रह्मवृंद या सर्वांचा सत्कार करून त्यांना दक्षिणा देत.

     अशीच सेवा ते प्रतिवर्षी तुळजापूरची भवानीदेवी, कोल्हापूरची महालक्ष्मी, पंढरपूरला श्रीविठ्ठल रूक्मिणी, नृसिंहवाडीला श्रीगुरुपादुका या दैवतांची करीत असत. प्रत्येक भक्तातील चांगल्या गुणांचे ते कौतुक करीत व त्यांचा देवस्थानच्या कार्यासाठी उपयोग करून घेत. मात्र, भक्तांनी देवस्थानातील सर्व कामे शिस्तीत, नियम न मोडता करावीत यावर त्यांचा कटाक्ष असे व ही शिस्त ते स्वत:ही पाळत. त्यांचे व्यवस्थापनकौशल्य अनुकरणीय व प्रशंसा करण्यासारखे होते. त्यांनी देवस्थानात लावलेल्या एका मुळीतून वड, पिपंळ व औदुंबर हे तीन वृक्ष वाढले असून तो देववृक्ष भक्तांसाठी कल्पवृक्षच ठरला आहे. तसेच श्रीगुरुंची साधना, त्यांची गुरुभक्ती, गुरुसेवा यांवर प्रसन्न होऊन, त्यांचे दत्तावतार सद्गुरु श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी, त्यांच्या आपोआप उमटलेल्या चिंतामणी पादुकांच्या रुपाने, देवस्थानात वास्तव्य केले आहे. पीठाधीश जगद्गुरू श्रीशंकराचार्य स्वामी महाराजांनी या देवस्थानास भेट देऊन उमटलेल्या पादुकांचे दर्शन घेऊन, श्रीगुरुदेवांचा सत्कार व गौरव केला आहे. रामेश्वरच्या मंदिराच्या गाभाऱ्यात, पुजारी, पीठाधीश श्रीशंकराचार्य यांनाच प्रवेश असतो. श्रीगुरुदेवांच्या आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकार लक्षात घेऊन श्रृंगेरी पीठाधीश श्रीशंकराचार्यांनी गुरूदेवांना स्वत:बरोबर गाभाऱ्यात नेऊन त्यांच्याविषयीचा आपुलकीयुक्त आदर व्यक्त केला.

     श्री. दशरथ मुरलीधर गुंजाळ (सेवानिवृत्त अधिकारी, व्होल्टास कंपनी, ठाणे) ह्यांनी प्रत्यक्ष पाहिलेल्या श्रीगुरुदेवांच्या विभुतिमत्त्वातील एका वैशिष्ट्याबद्दल कळविले आहे ते असे, "१९९९ साली श्रीगुरूदेव विश्रांतीसाठी तीन महिने श्रीक्षेत्र महाबळेश्वर येथे आयोना बंगल्यात होते. त्यावेळी ठाणे सत्संग मंडळातर्फे श्रीगुरूसेवेसाठी गेलो होतो. श्रीगुरूदेव रोज संध्याकाळी पाच वाजता फिरण्यासाठी जात असत व त्यावेळी आम्हालाही त्यांच्याबरोबर जाण्याची संधी मिळे. आम्हाला एका जागी श्रीगुरूंदेवांनी त्यांच्या देहाची सावली पडत नव्हती, हे दाखविले. संध्याकाळी सहाची वेळ असेल. त्यांच्याबरोबरच्या आम्हा सर्वांच्या सावल्या पडत होत्या परंतु श्रीगुरुदेवांची सावली पडत नव्हती. ह्याचा अर्थ माझ्या मते, त्यांच्या देहातून बाहेर पडणारे तेज हे सूर्याच्या तेजात विलीन होत असेल. म्हणून त्यांची सावली पडत नसेल व त्यांचे तेज, आपल्याला वेगळी दृष्टी नसल्याने ते आपण बघू शकत नाही, असे मला वाटले." सद्गुरुंच्या दूर (दिव्य) दृष्टीचा अनुभव अनेक भक्तांनी घेतला आहे. एक भक्त नगरला दर्शनासाठी गेला. सोमवार होता म्हणून त्याच्या मनात विचार आला की आज सोमवार आहे, तेव्हा श्रीगुरूंसमोरील पादुकांवर बेल अर्पण करावा. मंदिराच्या आवारात बेलाचे झाड आहे. त्या भक्ताने मंदिरातील सेवेकर्‍याकडून त्या बेलाचे पान मिळविले व वरच्या मजल्यावर आसनास्थ असलेल्या सदगुरूंच्या दर्शनासाठी तो गेला व त्यांच्या समोरच्या पादुकांवर बेल अर्पण केला. त्यावेळी पादुकांवर फुले, हार वैगेरे काहीच नव्हते. त्या भक्ताने बेल अर्पण केल्यावर सद्गुरु म्हणाले, "मंदिरातीलच बेलफुले देवाला अर्पण होतात." या अनुभवावरुन श्रीगुरूंकडे दिव्यदृष्टी असल्याची प्रचीती त्या भक्ताला आली व त्याला जाणीव झाली की श्रीगुरू जरी मानवी देहात दिसत असले तरी ते प्रत्यक्ष ईश्वर अवतारी पुरुष आहेत. त्यामुळे ते सर्व विश्व पाहू शकतात; संकटसमयी ते त्यांना साहाय्य करतात, ते सर्वज्ञ, सर्वशक्तीमान आहेत.

     अध्यात्ममार्ग हा केवळ शुष्क पांडित्यपूर्ण चर्चा, कोरडे निरूपण वा कर्मकांड ह्यांचा मार्ग नाही. तो प्रत्यक्ष ईश्वरी शक्तीचा अनुभव घेण्याचा व त्यासाठी लागणारी पात्रता प्रयत्नपूर्वक संपादन करण्याचा मार्ग आहे. ज्यांनी त्या मार्गाने वाटचाल करण्याची तयारी दर्शवली त्यांना श्रीगुरूंनी सर्व प्रकारचा आधार देऊन प्रगतीपथावर सतत पुढे नेले आणि त्यांचे जीवन सुखीसमाधानी व खर्‍या अर्थाने संपन्न व कृतार्थ केले. "जो मोकळ्या मनाने दर्शनाला येईल, येथे स्थिर होईल त्या प्रत्येकाला अनुभव येईल," असे ते म्हणत. आपुलकीने जवळ केलेल्या भक्तांवर श्रीगुरुदेवांनी नि:स्वार्थी प्रेमाचा, अविस्मरणीय आनंदाचा व असीम कृपेचा वर्षाव केला आणि त्यासंबंधीचे, तसेच भक्तरक्षकाची व भक्तशिक्षकाची भूमिका करतानाच्या अनुभवांचे त्यांनी भक्तांना मोठेच पसायदान दिलेले आहे. शब्द, मौन, स्पर्श, दृष्टिक्षेप, प्रसाद, स्वप्नदृष्टांत अशा विविध माध्यमांद्वारे भक्तांना हे अनुभव श्रीगुरूदेवांकडून मिळत असत व त्या अनुभवांचा लाभार्थी भक्तांवर मोठाच प्रभाव पडत असे. त्या अनुभवांवरून श्रीगुरूंचे दैवी गुणविशेषच कळत होते असे नसून त्यांचे भक्तांवरील नि:स्वार्थी, निरपेक्ष प्रेम, दु:खी-कष्टी जीवांविषयी वाटणारी करुणा, भक्तांच्या उद्धाराविषयी वाटणारा कळवळा तसेच चराचर सृष्टीवरील त्यांचा अधिकारही लक्षात येत असे. श्रीगुरुकृपेने अशक्य गोष्टी शक्य होतात आणि अवघड समस्याही सोप्या होतात, असाही भक्तांना अनुभव येत असे.

     श्रीगुरुपौर्णिमा, श्रीदत्तात्रेयजयंती या उत्सवप्रसंगी जमणार्‍या भक्तांच्या मेळाव्यास आशीर्वाद देताना ते ह्या दिलेल्या अनुभवांच्या पसायदनाची जाणीव करून देत असत. "या देहातील ईश्वरी शक्तीने तुमच्यापैकी प्रत्येकाला अनुभव दिलेला आहे. ज्याला अद्याप अनुभव आला नसेल त्याने सरळ हात वर करावा न घाबरता!" असेही वस्तुस्थिती सांगताना ते आवाहन करीत असत. विशेष म्हणजे ते ऐकणार्‍या शेकडो श्रोत्यांमधून एकही हात वर होत नसे; कारण प्रत्येकाला त्याच्या आवश्यकतेनुसार व पात्रतेनुसार अनुभव आलेला असेच. आलेल्या अनुभवांमुळे भक्तांची श्रीगुरूचरणांवरील श्रद्धा विशेष दृढ तर होत असेच पान श्रीगुरूंना अभिप्रेत असलेल्या भगवतभक्तीच्या मार्गावरील त्याची वाटचालही अधिक उत्साहाने होत असे.

     अनुभवांचे हे पसायदान श्रीगुरु भक्तांना कशासाठी देत होते? भक्तांत हितकारक परिवर्तन घडविण्यासाठी! त्या अनुभवांमुळेच विकारी व्यक्ती हळूहळू विचार करू लागे. हितकारक विचार प्रबळ झाल्यावर तिच्या आचारात व उच्चारातही अनुकूल सुधारणा होत असे. व्यसनी व्यक्ती निर्व्यसनी, नास्तिक व्यक्ती आस्तिक व आस्तिक व्यक्ती साधक होताना दिसत असे. हे क्रांतिकारक परिवर्तन आश्चर्यकारक असे (आणि विशेष असे की देहत्याग केल्यानंतरही त्यांच्याकडून मिळणाऱ्या अनुभुतीचा लाभ अद्यापही अनन्यशरण भक्तांना होत असतो.) अशा आश्चर्यकारक अनुभव घेतलेल्या काही मान्यवर व्यक्तींचे अनुभव या संग्रहात समाविष्ट केले आहेत. त्यावरूनही श्रीगुरूंच्या अलौकिक अधिकाराचे व शक्तीचे दर्शन वाचकांना घडेल. या अनुभवांचे आणखी एक वैशिष्ट्य असे की अनुभव घेतलेली व्यक्ती, त्यांच्या दर्शनाच्या वा अन्य निमित्ताने प्रत्यक्ष संपर्कात आलेली असेच असेही नाही. अलिकडचे श्रीगुरूंच्या भक्तपरिवारात दाखल झालेल्या असंख्य भक्तांना त्यांचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचा योग कधीच आला नव्हता. तरीही त्यांना स्वप्नदर्शनाच्या वा अन्य माध्यमातून या अलौकिक शक्तीचे अनुभव येत आहेत.

     श्रीगुरुदेवांना ६६ वर्षांचे आयुष्य लाभले. आयुष्यात शेवटच्या दशकात, त्यांच्या देहात तपस्येचे तेज मावेनासे झाले. ते ओसंडून बाहेर पडू लागल्याने त्यांचा देह आतून-बाहेरून प्रकाशमान झाला होता. निळ्या रंगाचे प्रकाशकिरण त्यांच्या देहातून बाहेर पडत. त्यांचा सर्व देह या नीलकांतीने उजळून निघे. तसेच त्यांची सर्व खोली या निळ्या रंगाने भरून जाई. हा अनुभव गुरुदेवांचे अत्यंत अदभूत आणि अलौकिक स्वरूप दर्शवणारा असे. अनेक गुरुभक्तांनी व अधिकारी शास्त्रज्ञांनी हा भारावून टाकणारा नीलकांतीचा अदभूत अनुभव घेतला आहे. त्यांच्या देहाचे देहपण संपून त्याला देवपण आले आहे, अशी प्रत्यक्षदर्शी भक्तांची भावना होत असे. श्रीगुरुदेवांनी ८ सप्टेंबर १९९९ ला श्रावण कृष्ण चतुर्दशीस संध्याकाळी ७.३४ ला आपले अवतारकार्य संपवले व ते अनंतात विलीन झाले. त्यांची अंत्ययात्रा १० सप्टेंबरला माध्यान्हसमयी निघाली व तपोवनात अंत्यसंस्कारासाठी दोन-अडीच तासांनी पोहोचली. शेकडो शोकाकुल गुरुभक्त त्या यात्रेत सहभागी झाले. माथ्यावर असलेल्या सूर्याच्या भोवती कंकणाकृती इंद्रधनुष्य सर्वांनी पाहिले. इंद्रधनुष्य माथ्यावर सहसा दिसत नाही. ते सामन्यात: अर्धगोल आकारात क्षितिजावर दिसते व ते सूर्याभोवती नसते, भगवंताच्या लाडक्या भक्ताला निर्गुण निराकार परमेश्वराने वाहिलेली ती श्रद्धांजली होती, असा भाव गुरुभक्तांच्या अंत:करणात निर्माण झाला. हा योगायोग होता का? नव्हता. कारण १२ तारखेला जेव्हा त्यांच्या अस्थी गोळा करण्याचे काम सुरू होते, तेव्हाही मागीलप्रमाणे माथ्यावर सूर्याच्या भोवती पुन्हा कंकणाकृती इंद्रधनुष्य दिसले. हे योगायोगाने घडणे अशक्य आहे. एका अलौलिक विभूतीचे समर्पित लौकिक जीवन संपले. त्या जीवनाला वाहिलेली ही दैवी श्रद्धांजली म्हटली पाहिजे. श्रीगुरुदेवांच्या मानवी देहरूपातील अस्तित्व दृष्टीआड झाले तरी अदृश्य चैतन्यरूपातील त्यांचे अस्तित्व त्यांच्या भक्तांना सतत जाणवत असते. मानवी देहरूपातील गुरुदेवांकडून भक्तांना ज्या स्वरूपाचे अनुभव येत असत, जवळपास त्याच स्वरूपाचे अनुभव या अदृश्य चैतन्यरूपातील सदगुरूंच्या शक्तीकडून भक्तांना येत असतात. त्यात स्वप्नदर्शनापासून प्रत्यक्ष दर्शंनापर्यंत, तसेच भक्तरक्षणापासून भक्तशिक्षणापर्यंत अनेक प्रकारचे अनुभव भक्तांना येत असतात. त्यामुळे श्रीगुरुदेवांच्या अव्यक्त अदृश्य चैतन्यरूपातील अलौकिक विभूतिमत्वाच्या कृपाछत्राखाली असल्याचा त्यांना विश्वास वाटतो व ते कृतज्ञतेने श्रीगुरुचरणी नतमस्तक होतात.


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy