|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||


आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा।। श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ।।


सद्गुरुदर्शन म्हणजे सर्वसाधारणपणे सद्गुरुंना प्रत्यक्ष भेटणे असा अर्थ घेतला जातो. दर्शन म्हणजे प्रत्यक्ष दृष्टीने म्हणजेच डोळ्यांनी पहाणे हा अर्थ बरोबरच आहे, पण दर्शनाचा अर्थ इतका मर्यादित आहे का हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.
सद्गुरु-दर्शनानंतर प्रत्येक भक्ताला आनंददायी अनुभव येत असतो. भक्त अनुत्साही असेल तर दर्शनानंतर त्याचा उत्साह वाढतो. एखाद्या भक्ताची दर्शन घेतल्यावर काळजी दूर होते. एखाद्याला काही शंका असतात. सद्गुरु-दर्शनाने त्याच्या शंकांचे कधी कधी प्रत्यक्ष सद्गुरुंच्या शब्दांनी किंवा सकृतदर्शनी आपोआप निरसन होते. अशा अनेक त-हेने सद्गुरु-दर्शनाने भक्तांचा सर्व प्रकारे उत्कर्ष होत असतो.
मूलतः सद्गुरु-दर्शनाचा परिणाम भक्ताच्या मनावर होत असतो. एकदा का मन सुस्थितीत असले की माणसाची वर्तणूक योग्य असते, त्याचे निर्णय बरोबर येतात आणि त्या माणसाचे इतरांशी असलेले संबंध सुधारावयास लागतात.
जे भक्त प्रापंचिक असतात त्यांना सतत सद्गुरुंच्या प्रत्यक्ष दर्शनाला जाणे अशक्य असते. अशावेळी ब-याचदा पंचाईत होते. म्हणून सद्गुरु-दर्शनाला अधिक खोल अर्थ आहे का ते पहावे लागेल. भक्तांना सद्गुरुंच्या प्रत्यक्ष दर्शनाने काय परिणाम होतो त्याचा अनुभव असतो. म्हणजेच तसाच अनुभव अन्य दुस-या मार्गांनी येऊ शकतो कां ते तपासणे महत्वाचे आहे.
सद्गुरु-दर्शनामुळे मानसिक स्थिरता येते ती सद्गुरुंच्या शक्तीमुळे आणि भक्ताच्या त्या शक्तीवरील श्रद्धेमुळे !
सद्गुरु हे तत्त्व आहे. ते सर्वव्यापी आहे. अडचण असते ती भक्ताच्या श्रद्धेची. भक्ताची श्रद्धा जर दृढ असेल तर त्या भक्ताला दर्शनाचा आनंददायी अनुभव सद्गुरुंचा फोटो बघूनही येऊ शकतो. फोटो नसेल तर केवळ आठवणीने येऊ शकतो.
सद्गुरुंचा फोटो बघून किंवा त्यांच्या आठवणीने जर मानसिक स्थिरता येत राहिली तर तेही सद्गुरु-दर्शनच म्हणता येईल.

।। श्री गुरुदेव दत्त ।।